नकळत सारे घडले - भाग ३६
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
देवदर्शन करून मीरा आणि मल्हार संध्याकाळी उशिराने घरी आलेले.
मीराचे डोके खूप दुखत होते; त्यामुळे तिला काहीच कळत नव्हते.
"मीरा, देवदर्शन छान झाले ना तुमचे! गर्दी नव्हती ना मंदिरात?"
पोहोचल्या बरोबर आत्याने लगेच विचारायला सुरुवात केली.
"हो, दर्शन छान झाले आणि जास्त गर्दी पण नव्हती."
मीरा अगदी थकलेली दिसत होती.
"ते सगळं नंतर विचारत बस. आधी मला जेवायला वाढ. ह्या पोरांनी कुठे जेवायला थांबवलेच नाही. आता खूप भूक लागली."
मिनल किचनमध्ये येत आईला बोलत होती.
"काय रे! म्हणजे तुम्ही कोणीच जेवले नाही दुपारपासून. धन्य आहात. भूक लागली तर थांबून काहीतरी खाऊन घ्यायचे ना!"
आईंनी पटकन वाढायला घेतले.
"थांबलो होतो ना काकू, मस्त चहा आणि भजी हादडली की तिने आणि तरीही म्हणते थांबवले नाही."
गणेश मिनलकडे बघत बोलू लागला.
"नुसत्या चहा आणि भजीने काय होते."
मिनल पण त्याला वाकडं तोंड करत बोलू लागली.
"बरं हातपाय धुवून घ्या मी लगेच जेवायला वाढते तुम्हाला सगळ्यांना. जा रे पोरांनो."
आईने म्हणायचा उशीर फक्त, तिघेही उठून वरती मल्हारच्या रुममध्ये निघून गेले.
"मीरा, तू पण जा वरती फ्रेश हो आणि जेवायला ये."
आत्या मीराकडे बघत बोलली आणि मिनल तिला घेऊन वरती तिच्या रुममध्ये गेली.
"आई आई ग! ह्या पोरांनी नुसतं पळवलच पळवल. जरा सुद्धा दम खायला वेळ दिला नाही. पाय दुखायला लागले माझे."
आजी पायाला चोळत बोलत होती.
"आजी तुम्ही पण या बसा जेवून घ्या. नंतर तुमच्या पायाला तेलाने मॉलिश करून चोळून देते."
आजींना सहन होत नाही प्रवास, पण तरीही त्यांनाच जायचे होते म्हणून सगळ्यांनी पाठवले.
"अग, पण तू आज हळद उतरवलीच नाही ह्या पोरांची."
आजी सासूने बोलून दाखवले.
"हो ताई, आज सकाळी करायला पाहिजे होते."
मल्हारची काकू सविता बोलली.
मल्हारची काकू सविता बोलली.
"हो ना, सगळं घाईत झालं त्यामुळे लक्षात आलेच नाही. सकाळी पण पोरं उशिराने उठली. आता उद्या हा कार्यक्रम उरकून घेऊ आपण. सविता आणि मी उद्या करून घेऊ."
कल्पना ताईला खरंतर टेन्शन आले होते. सासूबाई ओरडतील म्हणून, पण त्या जास्त काही बोलल्या नाहीत.
कल्पना ताईला खरंतर टेन्शन आले होते. सासूबाई ओरडतील म्हणून, पण त्या जास्त काही बोलल्या नाहीत.
घरात म्हातारी माणसं असणे गरजेचे असते. लग्नाच्या घाई गडबडीत अशा चुका होतच असतात किंवा काही पद्धती विसरायला होतात. घरातली जुनी जाणती म्हातारी माणसं आठवणीने सगळं सांगत असतात. त्यांना बरोबर सगळे लक्षात असते. अगदी बारकाईने त्या सगळीकडे लक्ष ठेवून असतात. आताच्या काही गोष्टी त्यांना आवडत नसल्या तरी आपल्या मुलांसाठी त्या हौसे खातर करू देतात. बडबड मात्र खूप करतात, कारण त्या प्रत्येक पद्धतीमागे काहीतरी कारणे असतात ती समजून घेतली पाहिजे, पण आताच्या मुलांना त्या जुन्या चालीरीती आवडत नाही. मॉर्डन म्हणत जुन्या पद्धती विसरत चाललेली ही आजची पिढी काही भलत्याच नवनवीन कल्पना बाजारात आणत असतात. काहींना त्या पटतात पण काहीना बिलकुल आवडत नाही, म्हणून त्यावरून पण बडबड सुरु असते. पण खरचं, आधीच्या काळी प्रत्येक गोष्टीला महत्व होते आणि त्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील लपलेली होती. म्हणून जुनी माणसं सांगतात ते नीट लक्ष देऊन ऐकणे गरजेचे असते. अगदी सगळेच नाही पण काही गोष्टी ह्या त्यांचे ऐकून नक्कीच केल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना पण वाईट वाटणार नाही आणि आपण सुद्धा नवीन पद्धती स्वीकारु शकतो. नवे जुने असे सगळेच यांच्यात ताळमेळ साधने गरजेचे आहे. यालाच तर घराला एकसंध बांधून ठेवणे म्हणतात.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा