Login

नकळत सारे घडले - भाग ३७

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ३७


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


सासूबाई काय काय करायला पाहिजे ते बोलत होत्या आणि कल्पना ताई त्यांच्या हो ला हो करत होत्या. कल्पना आणि सविता दोघी जावा जावा सगळं ठरवून करत होत्या. त्यांना सगळं माहिती होतं, पण वेळेवर विसरल्यासारखे व्हायचे; त्यामुळे दोघी एकमेकींना आठवण करून द्यायच्या. ह्या दोघी जावा म्हणजे जणू काही बहिणीच होत्या. खूप सांभाळून घ्यायच्या एकमेकींना, कोणाला काही अडचण आली की दुसरी लगेच मदतीला तयार असायची.


देवदर्शन करून दमलेले सगळे लवकर जेवून झोपायला गेले, पण इकडे कल्पना ताईंना काही झोप लागेना. पूजेची तयारी बरीच करायची होती. सकाळी पूजा करायची आणि संध्याकाळी रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम करायचा असे ठरवले होते; त्यामुळे सगळे पाहुणे पुन्हा जमणार होते. त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था आधीच करून ठेवायची होती. बाजूचा रिकामा बंगला होता तिथे आधीच सांगून ठेवले होते; त्यामुळे राहण्याची व्यवस्था झाली होती. आता फक्त दोन तीन दिवस जेवण बनवायला मदतीला दोघी तिघी मावश्या पाहिजे होत्या. हे सगळे बोलणे दोघींमध्ये झोपताना पडल्या पडल्या होतं होते.


"ताई, तुम्ही काही काळजी करू नका. कोणी नाही मिळाले तर मी आहेच की आणि सगळ्या पोरी पण येतीलच मदतीला."
सविता त्यांना दिलासा देत बोलू लागली.


"अग ह्या पोरींचा सगळा वेळ फक्त नट्टा पट्टा करण्यात जातो. आपल्याला मदत राहायची बाजूला आधी त्यांचं त्यांनी वेळेवर मेकअप करून तयार झाल्या म्हणजे मिळवलं."
कल्पना ताई पडल्या पडल्या बोलल्या आणि दोघी पण हसू लागल्या.


"झोपा आता ताई, आपण उद्या बोलू. नाहीतर हे दोघं भाऊ म्हणतील रात्री दिवस उगवला वाटतं दोघींना."
सविता बोलली तसे दोघी पण झोपायचा प्रयत्न करू लागल्या.


सकाळी सविता आणि कल्पना ताई लवकरच उठून आवरत होत्या. हळद उतरवायची म्हणजे पुन्हा पाट मांडून सुत गुंडाळून ठेवावे लागणार हे माहिती होते त्यांना. सविताने ती सगळी तयारी करून ठेवली होती.
सासूबाई होत्याच लक्ष द्यायला.


"अरे त्या पोरांना बोलवून आणा आता लवकर."
सासूबाई बोलल्या तसे सविता काकू घरात गेल्या सगळ्यांना उठवायला.


मीरा आज लवकर उठून तयार झाली होती. ती खाली येतच होती की जिन्यात सविता काकू दिसली.

"अग मी तुम्हालाच बोलवायला येत होते. बरं झालं तू लवकर आवरले."
काकू बोलल्या तशी मीरा हसली.


"हो काकू, मी लवकर आवरून घेतले आज. खाली मदत पण होईल ना."
मीरा साडी सावरत बोलत होती.

"बरं तू मल्हारला पण उठव आणि तयार होऊन खाली बोलव. आंघोळ नाही केली तरी चालेल म्हणावं."
काकू इतकं बोलून खाली निघून गेल्या. आता मीराला टेन्शन आलं होतं. मल्हारला उठवायला जायचं म्हणजे त्याचे मित्र पण असणार रूममध्ये. काल दमून आलेले सगळे जेवून इथेच झोपले होते. मीरा दारा बाहेरच उभी होती. तिला समजत नव्हते नेमके काय करावे.


"काय ग मीरा, अशी का बाहेर उभी आहेस?"
मिनल तिला असे बघून विचारते.


"ते ह्यांना खाली बोलवलं आहे; म्हणून मी उभी होते."
मीरा खाली बघूनच बोलत होती.


"अग मग जा की आत, अशी बाहेर का उभी आहेस? तो काय खाणार थोडीच आहे तुला!"
मिनल मुद्दाम हसत हसत बोलत होती.

"नाही त्यांचे मित्र पण असतील ना रुममध्ये; म्हणून जाऊ की नको जाऊ विचार करत होते."
मीरा अडखळत बोलली.

"अग मग त्यात काय इतकं, बिनधास्त जा. ते नेहमीचच आहे. ह्यांच सगळ्यांचं कायम असच असतं. कुठे बाहेर फिरून आले की इकडे येऊन सगळे जेवतात आणि इथेच झोपतात."
मिनल बोलत बोलत रुममध्ये गेली.


सगळे अजूनही गाढ झोपलेले होते. गणेश दुर्गेश तर एकमेकांच्या पायावर पाय टाकून झोपलेले. आख्खा बेड तर त्या दोघांनीच व्यापून टाकला होता. मल्हार बिचारा बेडच्या कोपऱ्यावर झोपला होता. त्यांना असे बघून मीराला खूप हसू येत होते.

"हे बघ, सकाळचे नऊ वाजले तरी हे सगळे अजून ढाराढूर झोपलेले आहे."
मिनल त्यांच्याकडे बघत बोलली.

"दादा, आई आजी सगळे खाली बोलवताय. चला उठा पटकन. दहा वाजून गेलेत."
मिनल बोलली तसे तिघे पण डोळे चोळत उठले. मीराला समोर बघून गणेश आणि दुर्गेश ताडकन उठून उभे राहीले. बिचारे झोपेतच होते. मल्हार उठला आणि दोघींना जायला सांगितले तेव्हा कुठे तिघे निवांत बसले.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.