Login

नकळत सारे घडले - भाग ३९

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ३९


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीरा आणि मल्हारच्या हळद उतरविण्याचा कार्यक्रम झाला. सगळ्या बायका घोळका घालून त्यांच्या भोवती उभ्या होत्या. नुसती मजा मस्करी चालू होती. आता मल्हारने मीराला उचलून घरात घेऊन जावं असं सगळ्या जणी म्हणत होत्या, मग काय मल्हारला नाही म्हणता आले नाही.


"अरे उचल लवकर तिला, बिचारीला थंडी वाजत असेल. मीरा वाट बघत केव्हाची उभी आहे."
सविता काकू मल्हारकडे बघून बोलल्या.


मल्हारला आता तिला उचलून घेऊन घरात जायचे होते. किमान पाच पाऊले तरी न्यावे लागतील. हा विचार करूनच मल्हारला थंडी भरली. सगळ्या समोर त्या दोघांनाच बघत उभ्या होत्या; त्यामुळे त्याला आता कोणतेही कारण देता येणार नव्हते.

जसे मल्हारने मीराला उचलले तसे सगळ्या जणी खूप खुश झाल्या. कोणी टाळ्या वाजवत होते तर कोणी वाह शाब्बास म्हणत होते. गणेश आणि दुर्गेश तर अक्षरशः शिट्ट्या वाजवत सुटले होते. मल्हारने त्यांच्याकडे बघून एक किलर लूक दिला तेव्हा दोघेही शांत झाले.


"मल्हार, तू जा आता आंघोळीला."
आईने त्याला जायला सांगितले.


हळदीने भिजलेला तो. सावळा रंग पण तरीही सगळ्यांमध्ये उठून दिसेल असा. जीम न लावताही त्याने चांगली बॉडी बनवली होती. शिक्षणात हुशार, घरात सुद्धा सगळ्यांचं ऐकणारा, वडिलांना बीपीचा त्रास; त्यामुळे घरातली सगळ्या कामाची जबाबदारी घेणारा, सगळ्यांना सांभाळून घेणारा असा मल्हार.. कितीतरी पोरी त्याच्यावर फिदा असतील, पण आता तो मीराचा नवरा होता. तो मीराचा नवरा म्हणून तिला सांभाळून घेत होता. मीरा त्याला बघून एकदम हरखून जात होती. मल्हारने तिला उचलले तेव्हा तिच्या ओल्या अंगावरून साडी निसटत होती आणि मल्हारला ते समजताच तो तिचा पदर सुद्धा नीट करून देत होता हे तिला देखील कळतं नव्हते. ती फक्त त्याला डोळ्यात साठवत होती.


"मिनू, मीराला तुझ्या रुममध्ये घेऊन जा आंघोळीला आणि तिचं आवरून दे."
आईने सांगताच मिनल मल्हार आणि मीराच्या मागे पळाली.


पाच पाऊल चालून होत नाही तोवर मल्हारने मीराला खाली उतरवले. मीरा तर जणू हवेत तरंगत होती. त्याचा स्पर्श होताच तिच्या ओल्या अंगावर देखील शहारे आले होते. मल्हारला पण ते जाणवले आणि म्हणूनच त्याने तिला खाली उतरवले. तो तसाच पुढे निघून गेला आणि मीरा त्याच्या मागून मिनलच्या रुममध्ये गेली.


"मीरा, आईने छान आवरायला सांगितले आहे."
मिनल वरती सांगायला आली होती.


"अग आईने बाजूच्या मुलीला मेहेंदीसाठी बोलवलं आहे."
मिनल तिला हात दाखवून सांगत होती.


"मेहेंदी.. माझ्या हातावर?"
मीरा तिला तशीच उभी राहून प्रश्न विचारू लागली.


"हो मग, आमच्या मल्हारची नवरी ना तू! मग त्याच्या नावाची मेहेंदी तर लावलीच पाहिजे ना!"
मिनल अगदी हसून बोलत होती.

"बरं तू पटकन आवरून ये खाली. मी खालीच वाट बघते तुझी."
इतकं बोलून ती खाली निघून गेली.


मीरा मनातल्या मनात खूप खुश होतं होती. आज पहिल्यांदा मल्हारचा तिला स्पर्श झाला होता. याआधी पण ते भेटायचे, पण तेव्हा आत्याचा मुलगा म्हणजे भाऊच.. या अनुषंगाने. पण आज ती त्याच्याकडे नवरा म्हणून बघत होती. तिच्या मनात खूप विचार येत होते आणि ती स्वतःच एकट्यात लाजायची काय हसायची काय! असे होते म्हणा नवीन नवीन नवरी असल्यावर.


"आई, अग ही हळद लवकर जात नाही का?"
मल्हार खाली येत बोलत होता.

"जाईल एक दोन दिवसात."
आई सगळ्यांना चहा देत होती आणि सविता काकू उपिट बनवत होत्या.


"आई मला वेगळं बनव काहीतरी, खूप भूक लागलीय."
उपिट बघूनच मल्हारने वाकडं तोंड केलं.

"काकू, आम्हाला चालेल उपिट."
गणेश आणि दुर्गेश लगेच मल्हारकडे बघून म्हणाले.

"तुला फोडणीची पोळी बनवून देते."
आईने लगेच कांदा चिरायला घेतला. मुलासाठी वेगळा नाश्ता.


"ये मीरा, गरमागरम चहा आणि उपिट खाऊन घे म्हणजे मेहेंदी काढायला बरं."
मिनलने तिला तिच्याजवळ बसवले.


"आत्या, मेहेंदी तर आहे माझ्या हातावर मग त्यावरच गिरवली असती मी!"
मीरा तिचे हात दाखवत बोलली. तिच्या हातावर तिने स्वतःच अरेबियन पट्टा काढलेला होता.


"नवरीला कशी मोठ्ठी हातभर मेहेंदी काढतात तशी मेहेंदी काढून घे. तुमचं लग्न घाईत जरी झालं असलं तरी मी तुझी सगळी हौस पूर्ण करणार."
कल्पना ताई मीराकडे बघून बोलत होत्या.

मीराला खूप छान वाटतं होते. तिची आत्या म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणारी होती. मीराबाई तिची लाडकी एकुलती एक भाची. तिचे नखरे माहिती होतेच आधीपासून; त्यामुळे त्यांनी तिची सगळी हौस पुरवायची असे ठरवले होते. जे जे लग्नात करता आले नाही ते ह्या दोन दिवसात म्हणजेच पूजेच्या दिवसापर्यंत पूर्ण करायचे ठरवले.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.