Login

नकळत सारे घडले - भाग ४१

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ४१



मल्हार मितालीबद्दल ऐकून खूप निराश होतो. सगळे तिला दोष देत होते. आता त्याला काय बोलावे काहीच कळतं नव्हते. सगळ्यांना माहिती होते, की मल्हारला ती मिताली आवडली होती आणि म्हणूनच लगेच लग्न ठरवले होते. चांगली शिकलेली नोकरी करणारी मिताली, अशी कशी वागू शकते म्हणून सगळे नवल करत होते. मल्हारला तर खरचं वाटतं नव्हते, की लग्नाच्या दिवशी मिताली पळून गेली. त्याला चांगलाच मोठा धक्का बसला होता. तिचं नाव काढलं तरी आताही तो गप्पच होता.


"दादा, मीराची मेहेंदी बघ. किती छान रंग चढला आहे."
मिनल मधेच विषय बदलत बोलली. त्याला बरे वाटावे म्हणून, पण तो काहीच न बोलता तसाच उठून वरती खोलीत निघून गेला. मीराकडे तर त्याने बघितले सुद्धा नाही. मीराला पण या गोष्टीचे वाईट वाटले.


गणेश आणि दुर्गेश तिथेच होते. पूजा झाल्यानंतरच ते त्यांच्या घरी जाणार होते. तोपर्यंत मल्हार सोबत थांबणार होते. त्याला सांभाळून घ्यायला. गणेशला समजताच तो मल्हारच्या मागे वरती गेला आणि त्याच्या पाठोपाठ दुर्गेश पण गेला. तिघांची चांगली जोडी जमत होती.


"मल्हार, दरवाजा उघड."
मल्हार दरवाजा लावून बसलेला. त्याला बळजबरी उघडायला लावला.


"मल्हार, काय चाललंय तुझं अजूनही. का त्या मितालीच नाव ऐकताच तू इतका हायपर होतो. किती वाईट वाटलं असणार मीरा वहिनींना, तू त्यांच्याकडे बघितल पण नाही. सरळ वरती निघून आला."
गणेश अगदी हळू आवाजात बोलत होता, कारण घरात सगळेच होते.


"अरे मग काय करू? पहिल्यांदा मला कोणीतरी आवडले होते. जिच्याशी फोनवर मी तासनतास बोलत होतो. तिला दोन तीनदा भेटायला सुद्धा गेलो होतो."
मल्हार आता त्याच्या मनातले बोलू लागला होता.


"अरे पण आता विसर तिला."
दुर्गेश पण मधे बोलत होता.


"दादा, आई बोलवतीय खाली. चहाला या सगळे खाली."
मिनल त्यांना तिघांना बोलवायला वरती आली तसे तिघेही शांत झाले.


"हो आलो आलो, तू जा आम्ही येतोच आम्ही थोड्या वेळात."
गणेश मिनलला आवाज सांगतो.


"हे बघ, आता मीरा तुझं भविष्य आहे आणि मिताली भूतकाळ; त्यामुळे तू तिला विसरून जा. भविष्याचा विचार कर. मीरा खूप चांगली आणि साधी मुलगी आहे. तू वेळ घे आणि मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर."
गणेश इतकं बोलून खाली निघून जातो. त्याच्या मागोमाग दोघेही जातात.

"मीरा वहिनी, मेहेंदी तर खूपच छान रंगली आहे."
गणेश खाली आला तसे मीराने त्याला चहा दिला तेव्हा तो तिच्याशी बोलला. तिला वाईट वाटू नये म्हणूनच तो नॉर्मलपणे बोलत होता. मल्हार सुद्धा तिथेच होता, त्याला पण तिने त्याचं मेहेंदी भरल्या हाताने चहा दिला. त्याला तिच्या हाताकडे बघून काय बोलावे तेच कळतं नव्हते. तो फक्त तिच्याकडे बघत होता.


"अरे चहा घे, की बघतच बसणार आहे."
दुर्गेश बोलला तसे मल्हारने तिच्या हातातून चहा घेतला.


"हम्म्म.. वहिनी तुमच्या मेहेंदीला रंग अजून चढणार आहे बरका."
गणेश मीराकडे बघून बोलला तसे ती लाजून आतमध्ये निघून गेली.


"आई ग! मी माझ्या मैत्रिणीला बोलावले आहे. ती येईलच थोड्या वेळात तेव्हा आवाज दे मला."
मिनल आईला इतके बोलून वरती निघून जाते.


मीरा खाली किचनमधे तिच्या आत्या बरोबर बसलेली होती. तिची आत्या तिच्यासाठी बरच काय काय करत होती. आत्याने तिला घरात घालायला म्हणून चार पाच नवीन साड्या काढून दिल्या होत्या. ब्लाऊज शिवणारी पण घरीच बोलवून घेतली होती. ती पण येणारच होती; त्यामुळे आत्याने मीराला खालीच थांबवून ठेवले होते.


"काकू, मिनल आहे का?"
मिनलची मैत्रीण हातात मोठी बॅग घेऊन आली होती.


"मिनू, खाली ये तुझी मैत्रीण आली बघ."
सविता काकूने तिला आवाज देताच मिनल खाली पळत आली.

"अरे श्वेता, ये ना वरती. मीरा तू पण ये."
मिनलने खाली यायचं सोडून त्यांना दोघींना वरती बोलवून घेतलं होतं.


"अग तू खाली तर ये, आधी तिला पाणी दे."
आईने तिला खाली बोलवले तशी मिनल खाली आली.


"आई अग ही माझी मैत्रीण पार्लरवाली आहे. तिला सगळं येत. परवा आपल्याकडे पूजा आहे; त्यामुळे मीरासाठी मी तिला घरी बोलवून घेतलं."
मिनल बोलली तसे त्या मैत्रिणीकडे मीराचे लक्ष गेले.


"अग बाई हो का! ये ये बैस. बरं झालं हे काम वाचलं आमचं. मी तुला सांगणारच होते बघ."
सविता काकू लगेच मिनलच्या मैत्रिणीकडे बघून बोलली.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.