Login

नकळत सारे घडले - भाग ४२

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ४२


दीर्घकथा मालिका डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मिनलने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावले होते. खास मीरासाठी.. परवा सत्यनारायण पूजा आणि संध्याकाळी रिसेप्शन होते; त्यामुळे मेकअप तर पाहिजेच. किचनमधले काम येवो न येवो, पण घरातल्या पोरींना हे बाकी छान जमते.

मिनलने तिच्या मैत्रिणीची आईला ओळख करून दिली तशी ती सुद्धा बोलायला लागली.

"हो काकू, मी कोर्स केला होता पार्लरचा. तसे मी फक्त मैत्रिणीसाठी येते, बाकी माझे काही पार्लर वगैरे नाही. हे मी आवड म्हणून करते."
श्वेता पण लगेच गप्पा मारत बसली.


"ही माझी वहिनी मीरा, हिच्यासाठी बोलवलं आहे मी तुला."
मिनल ओळख करून देत बोलली.


"खूप सुंदर आहे तुझी वहिनी, त्यांना मेकअपची तर काहीच गरज नाही."
श्वेता मीराकडे बघून बोलली.


"हो मग, वहिनी कुणाची!"
मिनल अगदी मीराला जवळ घेऊन बोलू लागली.


"बरं मला ह्यांची साडी दाखव आधी मग मेकअपसाठी काय काय लागणार ते बघू."
श्वेता बॅग दाखवत बोलली.


"आई, अग तू बोलवणार होतीस ना!"
मिनल लगेच आईकडे बघू लागली.


"अग हो हो, बघ तिला फोन करायचा राहिलाच. बघू फोन दे तर माझा."
आईने लगेच फोन मागितला.

आई मीरासाठी जी ब्लाऊज शिवणारी बोलणार होती तिचं दुकान होतं साड्यांच. ती येताना काही साड्या सुद्धा सोबत घेऊन येणार होती. तिला फोन केला आणि लगेच बोलवून घेतले.


"ती येईलच आता दहा मिनिटांत, तोपर्यंत तुम्ही बसा गप्पा मारत. सविता, जरा चहा ठेव पोरींना."
आईने आणि त्या आतमध्ये निघून गेल्या. मिनल आणि श्वेता पण वरती गेल्या. मीरा मात्र तिथेच तिच्या आत्याजवळ बसून होती.


"काकू आहे का घरात?"
साडीवाली बाई पण गाडीवरून मोठी पिशवी घेऊन आली होती.

"अग ये ये, तुझीच वाट बघत होते मी सकाळपासून. आता नवीन साडी घेतल्यावर ब्लाऊन पण शिवून झाले पाहिजे ना तुझे दोन दिवसात."
आईने आल्या आल्या तिला बोलायला सुरुवात केली.


"मीरा, ये इकडे बाहेर. बघ तुला काही आवडतेय का?"
आईंनी मीराला खूप लाडात बोलावले.


"दाखव बाई साड्या, मी सांगितल्या त्यातल्याच आणल्या ना!"
आई तिच्याकडे उत्सुकतेने बघू लागल्या.


ती पिशवीतून एक एक साडी काढून मीराला दाखवत होती. त्यात दोन पैठण्या होत्या, दोन कांजीवरम, एक बनारसी, पेशवाई आणि काही प्यूअर सिल्क साड्या होत्या. सगळ्या साड्या छान होत्या आणि रंग ही मस्त होते. मीराला त्यातली कुठलीही एक साडी निवडायची होती, पण तिला कळत नव्हते; म्हणून मिनलला सुद्धा खाली बोलवून घेतले.


"आई ग, ही लाल रंगाची साडी मीराला खूप छान दिसेल."
मिनलने ती साडी हातात घेऊन मीराच्या खांद्यावर टाकून पाहिली.


"हो.. छानच दिसतेय मीरा. ताई हीच साडी घ्या तुम्ही."
सविता काकूंना पण आवडली ती साडी.


"बरं हीच साडी असू दे. मीरा, आवडली ना तुला?"
आईंनी तिला विचारले तसे तिने हसून मान डोलावली.


"आत्या, पण आईने मला पाच साड्या दिल्यात त्या आहेत माझ्याकडे आणि तू पण मला आजच तर साड्या दिल्यात, मग पुन्हा नवीन साडी कशासाठी?"
मीराने साडी बघत बोलले.

"अग पूजेला बसताना भारीतली नवीन कोरी साडी पाहिजे ना! मी सकाळी दिल्या त्या अगदी साध्या साड्या होत्या आणि मला नवीन साडी घ्यायचीच होती तुझ्यासाठी दुकानात जाऊन, पण तुला पूजा झाल्याशिवाय बाहेर नाही घेऊन जाता येणार म्हणून. बाकी तुझ्याकडे आहे त्या साड्या पण घालून होतीलच."
आईने सांगितले तसे मीरा हसली.


"मीरा, अग सासू इतक्या हौसेने घेऊन देतेय तर नाही म्हणू नको. तुला वाटले तर आणखी एखादी घे."
सविता काकू मुद्दाम हसत हसत बोलल्या.


"हो मग काय, घे मीरा तुला आवडेल ती साडी."
मिनल पण लगेच बोलून मोकळी झाली.


"काकू, सकाळी पूजेला साडी झाली मग संध्याकाळसाठी घागरा घेता का?"
साडीवाली पण लगेच फोनमध्ये बघून बोलली.

"हो हो.. आणलेत का घागरे पण. दाखव बघू."
मिनल लगेच हो हो करत पुन्हा खाली बसली.


"सोबत नाही आणले मी, पण तुम्ही येऊन बघू शकता किंवा मग मी तुम्हाला फोटो दाखवले तर चालेल का?"


"असं कसं फोटो बघून घागरा घेता येईल?"
मिनल लगेच बोलली.


"थांबा, मी व्हिडिओ कॉल करते दुकानात ते दाखवतील."
त्या साडीवालीने लगेच फोन लावून सगळ्यांना दाखवू लागली.


"आई घागरे पण चांगले दिसताय, आपण संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी घागराच बघुया ना! मी पण तर घागरा घेतलेला आहे."
मिनल बोलली तसे सगळ्यांना ऐकावेच लागले.


"बरं बघ तुला कोणता आवडला तर, आधी मीराला तर विचारा. तिला काय पाहिजे ते ठरवा मग तुमचं बघा."
आई बोलली तसे सगळे मीराकडे बघू लागले.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.