Login

नकळत सारे घडले - भाग ४३

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ४३

दीर्घकथा लेखन डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीराला पूजेसाठी तिच्या आत्याने छान साडी घेतली. संध्याकाळच्या रिसेप्शनसाठी मात्र मिनल घागरा घे म्हणून सांगत होती, पण मीराला काय आवडते ते सुद्धा बघायला पाहिजे असे आईचे म्हणणे होते.

"तुम्ही म्हणाल तसे, मला काहीही चालेल."
असे म्हणून मीरा आत्याकडे बघू लागली.


"नाही, मीरा तू घागरा घे. आजकाल सगळ्या घागराच घालतात आणि तू शालू लग्नात नेसलाच होता ना! मग आता रिसेप्शनला घागरा घालून छान मेकअप होईल."
मिनल तिला समजावून सांगत होती.


"हो मीरा वहिनी, घागरा छान दिसेल तुम्हाला."
श्वेता पण मिनल सारखेच बोलू लागली.


"बरं घागरा आवडला असेल तर घ्या तुम्ही, आता मी उठते. सविता तुला कुठली साडी आवडली असेल तर बघ ग!"
आई सविता काकूकडे बघून बोलली.


"नको बै मला साडी, ढीग झालाय साड्यांचा. आताच लग्नासाठी म्हणून दोन नवीन साड्या घेऊन आले आहे मी.. अजून किती घेऊ?"
सविता काकू पण नको म्हणून उठल्या.


"बरं तुमच्याकडे आणखी घागरे असतील तर दाखवता का?"
मिनल तिच्या फोनकडे बघून बोलली.


"एक काम करा, तुम्ही चला आता माझ्या बरोबर दुकानात. तिथे बरेच छान छान घागरे आहेत. पसंत करून तुम्ही व्हिडिओ कॉल करून ह्यांना दाखवून द्या."
साडीवाली बोलली तसे मिनल लगेच तयार झाली.


"बरं ठीक आहे. मीरा चालेल ना तुला!"
मिनल मीराला बोलली तसे मीराने तिला एक क्यूट स्माईल दिली.


"हो, तुला आवडेल ते मला नाही आवडणार असे होईल का कधी. तू फोटो पाठव मला किंवा व्हिडिओ कॉल करून दाखव."
मीरा पण हो ला हो करत बोलली.

"बरं मी आधी ह्यांच माप घेते मग जाऊ आपण दुकानात."
साडीवाली मीराचे माप घेऊ लागली. बरेच ब्लाऊज पण शिवायचे होते.

"बरं मी काय म्हणते, आता घेतलेली तुझ्याकडची साडी त्यावरचे ब्लाऊज मला परवा सकाळी लवकर पाहिजे. घागरा घेतला की तो पण तयार करून पाहिजे त्याच दिवशी. होईल ना सगळे वेळेत पूर्ण?"
आईने तिला खात्रीने विचारून घेतले.


"हो काकू, मी देते वेळेत. तुम्ही काही काळजी करू नका. मी स्वतः घरपोच द्यायला येईन."
साडीवाली पण ओळखीची होती; त्यामुळे काळजी नव्हतीच म्हणा, पण तरीही त्यांनी खात्री करून घेतली. वेळेवर गडबड नको व्हायला.


साडीवाली बाई म्हणजे तिचे बुटिकच होते; त्यामुळे तिला सगळे जमत होते आणि वेळेत पूर्ण करून देण्याची जबाबदारी पण तिने घेतली होती; म्हणून सगळे निवांत होते. मीरा तर खूप खुश होती. तिला चांगली सासू तर मिळालीच होती, पण मिनलसारखी नणंद म्हणजे मैत्रीणच मिळाली होती. हे घर परके कधी नव्हतेच तिच्यासाठी, पण लग्नानंतर थोडे वेगळे वाटणे साहजिक आहे.


मिनलने घागरा पसंत करून मीराला फोटो पाठवला. तिलाही घागरा खूप आवडला. तिचे माप तर आधीच घेतलेले होते; त्यामुळे लगेच घागरा पण तयार करून होईल. हे एक मोठे काम झाल्यासारखे वाटतं होते, कारण नवरीचे ब्लाऊज आणि साडी तयार व्हायला वेळ लागतो आणि टेलर पण चांगला मिळत नाही.


"आई, मी दुकानात जाऊन सगळं करून आले आहे. बिल सगळं झाल्यावर देऊ असे सांगून पण आले."
मिनल आणि तिची मैत्रीण श्वेता घरी आल्या आल्या सांगत होती.

"बरं वहिनी, मी मेकअपचे फोटो पाठवून देते मिनूच्या फोनवर ते बघून घ्या एकदा. नाही म्हणजे आता तुमची साडी आणि घागरा तर बघितला आहेच मी, त्यानुसार करणार म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळे."
श्वेता मीराकडे बघून बोलली.


"मेकअप म्हणजे मला जास्त काही नको. मला अगदी नॅचरल लूक हवाय."
मीरा, मल्हार बसलेला त्याच्याकडे हळूच बघून बोलत होती.


"अहो, संध्याकाळी थोडा तरी मेकअप करावा लागेल. सकाळी पूजेला जास्त काही नाही केल तरी चालेल."
श्वेता तिला समजून सांगू लागली.

"हो, सकाळी तर मी स्वतः करेन फक्त संध्याकाळी मेकअप करावा लागेल. पण तो ही जास्त नकोय मला."
मीराला आता टेन्शन आले होते.

"मीरा, अग लग्नाचे रिसेप्शन आहे तुमच्या. थोडा तरी मेकअप करावा लागेल. बाकीच्या बघ किती जास्त करतात.. आणि तू नको नको म्हणतेय."
मिनल तिला समजून सांगत बोलत होती.


"हो ना, माझ्या बाजूची मैत्रीण तर दिवसातून चार वेळा मेकअप बदलत होती. साखरपुडा, हळद, वैदिक आणि सप्तपदी.. असे सगळे लूक ठरवलेले. तुम्ही तर किती साध्या आहात."
श्वेता पण मीराकडे बघून बोलत होती.


"ठीक आहे, करा तुम्ही मेकअप ह्यांच्याकडून, पण फक्त जास्त पांढर भूत दिसेल असे नका करू म्हणजे झालं."
गणेश मधेच त्यांचं बोलणं ऐकून बोलला तसे सगळे हसायला लागले.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.