Login

नकळत सारे घडले - ४६

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ४६

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


लाल चुटुक पैठणी आणि पदरावर नाचणारे मोर.. ती साडी खूप सुंदर दिसत होती मीराला. मेहेंदी भरल्या हातात हिरवा चुडा, भांगेत कुंकू, कपाळावर नाजून चंद्रकोर, नाकात मोत्याची नथ, ओठांवर हलक्या लाल रंगाची लिपस्टिक. गळ्यात सोन्याचे जाड मंगळसूत्र उठून दिसत होते. केसांचा अंबाडा बांधून त्यावर मल्हारने दिलेले गजरे लावले होते. जास्त काही न मेकअप करता ही मीरा खूपच सुंदर देखणी दिसत होती. मुळातच ती दिसायला गोरीपान आणि नाजूक होती; त्यामुळे ती अशी छान आवरून खाली आल्यावर सगळे जण तिच्याकडे बघतच राहिले.


खुद्द मल्हार सुद्धा तिला बघून शॉक झाला होता. आज पहिल्यांदाच तो मीराला असे बघत होता. ती फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच इतके आवरून आली होती. मल्हार तिच्याकडे एकटक बघत होता; त्यामुळे तिला ओशाळल्यासारखे झाले होते. मीराने नजरेने त्याला काय झाले म्हणून विचारले तेव्हा त्यानेही मानेने नकार दिला. मीरा उगाच खुश होतं होती. तिच्या मनात फुलपाखरे बागडत होती. तिला ही समजत होते, की मल्हार फक्त तिलाच बघत आहे; त्यामुळे ती खाली मान घालूनच त्याच्यासमोर बसलेली.


"ओए होए, क्या बात है! दादा बघ केव्हापासून तुझ्याकडेच बघतोय."
मिनल मीराच्या कानात कुजबुजत होती तशी मीरा लाजून इतके तिकडे बघत होती.


सगळ्यांना माहिती होते, की मीरा ही मामाची मुलगी आहे; त्यामुळे शेवटी मामाचीच केली; म्हणून सगळे बोलत होते. आलेल्या नणंदा मुद्दाम खालून वरपर्यंत तिच्याकडे बघत होत्या. सविता काकूंना हे अजिबात आवडले नव्हते. त्यांनी लगेच तिला खाली आत्त्याच्या रुममध्ये नेऊन बसवले.


"अग मीरा, बाहेरच येऊन बैस. आत खोलीत काय बसतेस."
आत्त्याने तिला पुन्हा बाहेर आणून बसवले.


"ताई, ह्या सगळ्या जणी बघा कशा बघताय आपल्या मीराला; म्हणून मी तिला आत नेऊन बसवले होते. उगाच कुणाची दृष्ट नको लागायला."
सविता काकू हळूच बोलत होत्या.

"अग आपली मीरा दिसतेच इतकी छान तर बघणारच ना तिला! असू दे. आज तिलाच बघायला तर येणारं सगळे; त्यामुळे आपण काही करू शकत नाही." 
कल्पना ताई मात्र कोणाला घाबरत नव्हत्या.


"गुरुजी येतीलच थोड्या वेळात. तोपर्यंत तुम्ही दोघे हे खाऊन घ्या. दुपारपर्यंत तुम्हाला उपवास असणार."
सविता काकूंनी मल्हार आणि मीराला फराळ दिला. मीरा तर नको नकोच म्हणत होती, पण तरीही तिला बळजबरी खायला सांगितले.


"मीरा, जरा बघ बरं तुझे आई वडील कुठंपर्यंत पोहोचले ते."
सविता काकूंनी तिला आठवण करून दिली. तिनेही लगेच फोन लावून विचारले. ते पण येतीलच तासाभरात असे समजले. इथे गुरुजी अजून आलेले नव्हते; त्यामुळे मीराला आता इतके आवरून कसेतरी व्हायला लागले होते.


"चला, आवरले का सगळे?"
असे म्हणतच गुरुजी घरात आले.


"मग काय गुरुजी, आम्ही अर्धी पूजा मांडून बसलो. उगाच पुन्हा उशीर व्हायला नको म्हणून."
विलासराव बोलले तसे गुरुजी हसले आणि कामाला लागले.


"चला, नवरा नवरी इथे येऊन बसा. मग आपण पूजेला सुरुवात करुया."
गुरुजींनी लगेच राहिलेली पूजा मांडून पूजेला सुरुवात केली. आतमध्ये लगबग सुरू झाली.

"सविता, गुरुजी आले. आता पूजेला सुरुवात झाली आहे. तू लगेच प्रसाद बनवायला घे, म्हणजे तासाभरात होऊन जाईल."
कल्पना ताईंनी प्रसादाचे साहित्य सगळे काढून ठेवले होते.


"चला ह्यांची गाठ बांधायला सुवासिनी या कोणीतरी."
गुरुजी बोलले तसे कल्पना ताईंनी सविताला पुढे पाठवले.


मीराच्या साडीचा पदर आणि मल्हारच्या उपरण्याची गाठ बांधून झाली. गुरुजींनी हाताला हात लावून बसायला सांगितले तसे मीराने मल्हारकडे पाहिले. त्यानेही लगेच त्याचा हात तिच्याजवळ नेला. त्याच्या ह्या छोट्याशा कृतीने मीरा मनोमन सुखावली होती.




क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.