Login

नकळत सारे घडले - भाग ४७

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ४७

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


पूजा सुरू होऊन बराच वेळ झाला होता. गुरुजी सत्यनारायण कथा सांगत होते. कथा संपत आली होती आणि मीराचे आई वडील, काका काकू, सगळे भाऊ.. हे सर्व जण घरी आले. त्यांनी पाहिले मीरा पूजेला बसलेली होती; त्यामुळे तिला जाऊन लगेच भेटता येत नव्हते.

"अरे तात्या, आलात तुम्ही. अगदी वेळेत आलात. आता आरती होईलच."
कल्पना ताई सगळ्यांना भेटून त्यांना चहा पाणी देत होत्या. सुनिता बाई आणि निवेदिता काकू तर आल्या आल्या त्यांच्या पाया पडत होत्या. आता हे फक्त नणंदेचे घर नाही तर आपल्या लेकीचे सासर पण आहे. आणखी एक नाते जोडल्या गेले; त्यामुळे त्यांना जास्त छान वाटतं होते.


"गुरुजी, आम्ही हे नवीन देव आणले आहेत. त्यांची पण लागलीच पूजा करून घ्या."
नानांनी बॉक्समधुन सगळे देव काढून गुरुजींच्या हातात दिले.


गणपती, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा.. मोठ्या ठसठशीत आणि अगदी कोरीव मुर्त्या होत्या. हे तीनही देव गुरुजींनी तबकात ठेवले आणि त्यांचा अभिषेक करून घेतला. लग्नात मुलीला हे देव देतात, पण लग्नात काही देणं झालं नव्हतं; त्यामुळे मग त्यांनी आता आणले होते.


आरती करायला सगळ्यांना उभे राहायला सांगितले तसे सर्व जण उठले आणि आरती झाली. सगळ्यांचा प्रसाद घेऊन झाला. आता कुठे मीरा मोकळी झाली होती. तिला असे बघून तात्या आणि सुनिता बाईंना खूप आनंद होत होता. सुनिता बाईंचे डोळे तर लगेच भरून येत होते.

"तुला म्हंटले होते ना! आपली लेक सुखात राहील. बघ मीरा किती खुश आहे."
असे म्हणून तात्यांनी पण हळूच डोळे टिपले. सुनिता बाईंना पण तिला इतके छान आवरलेले बघून आनंद झाला होता.


"बरं आता पूजा झालेली आहे. तुम्ही दोघांनी जोडीने थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि एखादे छानसे नाव घ्या."
गुरुजी बोलले तसे सगळे हसायला लागले.


"हो हो, आता उखाण्यात नाव झालेच पाहिजे."
सगळ्या जणी म्हणू लागल्या तसे गणेश आणि दुर्गेश पण आग्रह करू लागले.


मीरा इकडे तिकडे बघत आठवू लागली तसे निवेदिता काकूंनी तिच्या कानात सांगितले.

"देवांचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी
मल्हारावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी"

मीराने खूप सुंदर नाव घेतले; म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता बारी होती मल्हारची, पण त्याला कुठे नाव घेता येतं. तो आपल्या मित्रांकडे बघत बसला तसे गणेश त्याच्याजवळ आला आणि त्याला कानात नाव सांगितले. त्याने फोनमध्ये गुगल मावशींना विचारून घेतले होते.


"ढोल ताशांच्या गजरात लाडका गणपती बाप्पा आला,
मीराचे नाव घेतो झुकेगा नहीं साला."


मल्हारचे नाव ऐकताच सगळे खळखळून हसले. मल्हार पण हसला. त्याला काय नाव घ्यायला सांगितले होते गणेशने काय माहिती. त्याला येत नव्हते; त्यामुळे आता त्याचे ऐकावेच लागणार होते.


"मीरा, कित्ती गोड दिसतेय. साडी पण मस्तच."
निवेदिता काकूंनी तिला जवळ बोलवून कुशीत घेतले. ती पण लगेच त्यांना बिलगली.


"आत्त्याने परवाच ही साडी घेतली माझ्यासाठी पूजेला आणि ब्लाऊज पण लगेच तयार करून घेतले. हे तर काहीच नाही, अजून संध्याकाळी वेगळेच आहे."

"अरे वाह! भारी मज्जा आहे."
निवेदिता काकू पण कौतुक करत बोलत होत्या.

मीरा आत्त्याचे कौतुक सांगत होती, तसे सुनिता बाईंना मुलीचे होणारे लाड बघून छान वाटतं होते. आपली लेक सासरी सुखात आहे हे बघून आई वडिलांना किती आनंद होतो. फक्त लेकीचे सुख बस.. त्यांना अजून दुसरे काही नको असते.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.