Login

नकळत सारे घडले - भाग ४८

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ४८

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


सत्यनारायण कथा तर छान पार पडली. दुपारचे जेवण होत नाही तोपर्यंत संध्याकाळच्या रिसेप्शनसाठी पाहुणे यायला सुरूवात पण झालेली. घरात अगदी मोजकेच पाहुणे होते; त्यामुळे तात्यांनी आता लगेच गाडीत भरून आणलेले सामान काढायला सुरुवात केली.


"बरं ते सामान काढून आणुया का?"
तात्या सुनिता बाईंकडे बघून बोलले.


"हो हो, आपला आहेर आत्ताच देऊन टाकूया सगळ्यांना. संध्याकाळी खूप उशीर होईल."
त्या पण लगेच उठून उभ्या राहिल्या.


"निवेदिता.. मिनू, जरा माझ्यासोबत चला बरं. आपण सामान काढून घेऊया."
सुनिता बाई बोलल्या तसे निवेदिता काकू लगेच उठली.


जवळजवळ दोन गाड्या फक्त आहेराचे सामान होते. घरात होते नव्हते त्यांना सगळ्यांना साड्या, टॉवेल टोप्या आणि नारळाची पोती आणली होती. आणखी गिफ्ट तर वेगळेच होते.


"बापरे! हे इतके काय आणले."
कल्पना ताई तात्यांकडे बघून बोलल्या.


"अग काही नाही, ते जरा सगळ्यांना आहेर आणलेत. लग्नात काही करायला जमले नाही, मग आता आणले."
तात्या बहिणीला सांगत होते.

एक एक करून सुनिता बाई सगळे समान काढून मांडत होत्या. साड्या तर सगळ्याच भारी भारी होत्या. प्रत्येक ताटात त्यांनी पैठणी साडी, माणसांना सफारीचे कापड टॉवेल टोपी आणि नारळ.. असे सगळे मांडून ठेवले.


"ये ताई, दाजी तुम्ही पण या.. बसा या पाटावर."
तात्यांनी कल्पना ताई आणि दाजींना बोलवले. सुनिता बाईंनी हळदीकुंकू लावून त्यांची ओटी भरली आणि तात्यांनी विलासरावांना टिळा लावून त्यांच्या हातात कपडे दिले.


"या सविता ताई, तुम्ही पण या जोडीने."
सुनिता बाईंनी त्यांना पण पाटावर बोलावले. त्यांना पण सेम साडी कपडे सगळे तसेच दिले.
ताईच्या सासूबाईंना पण भारितली नऊवारी आणली होती; त्यामुळे साडी बघून त्या भलत्याच खुश झाल्या.

असे करून तिथे असलेल्या सगळ्यांना त्यांनी आहेर दिला. कल्पना ताईंच्या चुलत मावस सगळया नणंदा हे इतकं सगळं पाहून थक्क झाल्या. तर गणेश आणि दुर्गेशला पण आहेर दिला. मिनलसाठी त्यांनी खास ड्रेस चॉईस करून आणलेला होता जो तिला खूप आवडला. लेकीची एकुलती एक नणंद; त्यामुळे तिचा मान ठेवलाच पाहिजे. आता फक्त मीरा आणि मल्हार बाकी होते.

"मीरा मल्हार, या तुम्ही दोघे बसा आता पाटावर."
तात्यांनी आपल्या लाडक्या लेकीला बोलवून बसवले.

मीरासाठी पण साडी आणलेली. त्यावर सोन्याचा नेकलेस ठेवलेला. मल्हारला एक शेरवानी आणि एक ड्रेस कपडा, त्यावर दोन तोळ्यांची चैन ठेवलेली होती. ते बघून मल्हार स्वतःच नको म्हणायला लागला.

"तात्या, अरे इतकं कशाला आणलं! ह्याची खरचं गरज नव्हती."
असे म्हणून कल्पना ताई बोलू लागल्या.


"अग जावई आहे तो त्यांचा, लग्नात करता आले नाही; म्हणून आत्ता करताय तर करू दे की.. उगा नाही कशाला म्हणायचं."
सासूबाई बोलल्या तसे कल्पना ताईंनी मल्हारला घे म्हणून सांगितले.


"हो मग, मान आहे हा जावयाचा. घ्यायला तर लागणारच! ताई अग लग्न इतक्या घाईघाईत उरकले, मग आम्ही आमच्या जावयाची हौस कधी करणार. म्हणून हे सगळं घेऊन आलोय."
तात्यांनी पण चैन लगेच मल्हारच्या गळ्यात घालून दिली. आईने पण मीराला गळ्यात नेकलेस घालून दिला.


"बरं, आता आमचे पण आहेर लागलीच घेऊन टाका."
कल्पना ताई बोलल्या तसे सविता काकू पुढे आल्या.

"अरे, लगेच तुम्ही पण आहेर."
निवेदिता काकू बोलल्या.


"मग काय तर, एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या."
सविता काकू बोलल्या तसे सगळ्या हो म्हणायला लागल्या.


सगळ्यांना एकमेकांनी केलेले आहेर आवडले. तात्यांनी नाही म्हंटले तरी भरपूर केले होते. तिथे असलेल्या कोणालाच वाटले नव्हते, की हे इतके करतील म्हणून, पण त्यांनी आणलेला आहेर आणि गिफ्ट बघता सगळे खुश झाले.




क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.