नकळत सारे घडले - भाग ५२
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा तिचं आवरून खाली आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिर झाल्या. ती खरचं खूपच सुंदर दिसत होती आणि हो.. मल्हारची नजर पण तिच्यावरून हटत नव्हती. आज खरंतर त्यांचा खास दिवस होता. लग्नाचे रिसेप्शन म्हणजे चांगली मोठी पार्टी होती. लग्नात जे जे राहिले ते सगळे जण आज हौस पूर्ण करून घेणार होते.
नवरदेव नवरीची गाडी तयार होती. त्या दोघांना त्यात बसवून गणेश आणि दुर्गेश निघाले आणि विलासराव त्यांच्या मागून दुसरी गाडी घेऊन निघाले. त्यांच्यासोबत तात्या आणि नाना दोघेही थांबले होते.
सर्वजण पोहोचले की नाही कार्यक्रमाच्या ठिकाणी लॉनवर याची खात्री करून मगच ते निघाले होते. घरातून तर काहीच घेऊन जायचं नव्हतं; त्यामुळे सगळे वेळेत पोहोचले होते. पाहुणे पण यायला सुरुवात झालेली होतीच.
कार्यक्रम एका मोठ्या लॉन्स वर ठेवला होता जो घरापासून जास्त लांब नव्हता. मधोमध एन्ट्री करताना दोन्ही बाजूने छान लायटिंग केलेली होती. स्टेज तर खूपच सुंदर सजवलेला होता, तिथे बसायला भारीतले सोफे ठेवलेले होते. त्या दोघांचे लग्नातले काही फोटो मोठे करून बॅनर लावलेले होते. लॉनवर पुढे सोफे तर मागे खुर्च्या मांडल्या होत्या.
गाडीतून लॉन्समध्ये जाताना मधून मधून मल्हार सारखा मीराकडे बघत होता. तिलाही ते समजत होते, पण तरीही ती त्याच्याकडे कानाडोळा करत होती, पण मनातल्या मनात ती खूप खुश झाली होती. मल्हारचे सगळे लक्ष आज तिच्यावर होते हे बघूनच तिला छान वाटतं होते. 'खरचं बरं झालं आज मिनूच ऐकून मेकअप केला. नाहीतर हे क्षण पुन्हा कधी जगले असते. श्वेता खरचं छान मेकअप करते. ही सगळी तिचीच कमाल आहे.'
मीरा मनातल्या मनात श्वेताचे आभार मानत होती.
मीरा मनातल्या मनात श्वेताचे आभार मानत होती.
सगळ्यांच्या गाड्या एकदमच पोहोचल्या गेटवर. त्यांच्या स्वागतासाठी बाकीची मंडळी उभी होती हातात गुलाब घेऊन. दोघांना एकमेकांचा हात पकडायला सांगत होते, पण त्यांना दोघांना लाज वाटतं होती असं सगळ्यांसमोर हात धरायला. इथेही फोटोग्राफर त्यांना बऱ्याच पोज सांगत होते. त्यांचे छान छान फोटो व्हिडिओ घेत होते.
"आता हे काही पिच्छा सोडणार नाही."
असे हळूच म्हणून मल्हार त्यांना टोमणा मारत होता, पण मीराला ऐकू येत होते आणि ती खुदकन हसली.
आजूबाजूला छान गार्डन होते; त्यामूळे तिथे त्यांचे बरेच फोटो व्हिडिओ बनवले. मग तिथून त्यांना स्टेजवर पाठवले. स्टेजवर जाताच भरपूर फोटो शूट झाले. आता खरंतर दोघेही त्या फोटोवाल्याला कंटाळले होते, पण त्यांचे कामाचं होते; त्यामुळे त्याला नाही म्हणून चालणार नव्हते.
घरातल्यांनीच पहिले स्टेजवर येऊन फोटो काढून घेतले. तशी गर्दी व्हायला लागलीच होती; त्यामुळे मिनल पण वरती येऊन दोघांसोबत सेल्फी घेतल्या आणि मग बाजूला जाऊन बसली, कारण तिला मीराने तिच्याजवळच थांबायला सांगितले होते.
एक करून सगळे फॅमिली सोबत येत होते आणि दोघांना गिफ्ट देऊन फोटो काढून मगच खाली जात होते. असे करण्यात तासभर तरी गेला असेल तरीही पाहुणे थांबायचं नाव काही घेत नव्हते. लग्नात कोणीही थांबले नव्हते; त्यामुळे आता गर्दी तर होणारच होती हे त्यांनी गृहीत धरलेच होते. मिनल मध्ये मध्ये दोघांना ज्यूस आणून देत होती. कोणी काही गिफ्ट दिले तर ती नीट ठेवत होती.
"तुम्ही दोघांनी मुद्दाम मला थांबवलं ना इथे! तुमच्या हाताखाली हे सगळं काम करायला."
मिनल आलेले गिफ्ट पिशवीत भरत बोलत होती.
मिनल आलेले गिफ्ट पिशवीत भरत बोलत होती.
"हो मग, तुला काय वाटलं."
मल्हार मात्र तिला आणखी चिडवून देत होता.
मल्हार मात्र तिला आणखी चिडवून देत होता.
"मिनू, मी माझ्यासाठी थांब बोलले होते."
मीराने मात्र लगेच सांभाळून घेतलं, नाहीतर ती खाली जायला निघाली होती.
मल्हारचे सगळे मित्र भेटायला येत होते; त्यामुळे त्याला खूप छान वाटतं होते. कॉलेजमधील गँग, शाळेतली मुलं अगदी आठवणीने आली होती.
मल्हार मीराला त्या सगळ्यांची ओळख करून देत होता. मित्र भेटले की लगेच कसा चेहरा खुलतो हे बघून मीरा हसत होती. तिच्या सुद्धा मैत्रिणी येणार होत्या, पण अजून काही आल्या नव्हत्या.
पाहुणे आता बऱ्यापैकी कमी झालेले होते. सगळे जण जेवायला जात होते. वेळ झाला होता; त्यामुळे मीरा आणि मल्हार दोघांना पण भूक लागली होती. वरती फोटो काढायला कोणी येत नाही म्हंटल्यावर स्टेजवरून ते दोघेही खाली उतरले आणि सगळ्यांशी बोलू लागले. सगळे एकमेकांशी चौकशी करत होते. मधूनच कोणीतरी बोलले, की 'मल्हारच्या लग्नाच्या दिवशीच भर मांडवातून ती नवरी मुलगी पळून गेली आणि त्याच दिवशी संध्याकाळी ही मामाची पोरगी करून आणली. नशीब मामाला पोरगी तरी होती, नाहीतर पुन्हा आणखी किती दिवस याच लग्न रखडलं असतं देवजाने.'
मल्हारने ते सगळं ऐकलं. त्याला खूप राग आला. त्याला पुन्हा मितालीची आठवण झाली.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा