Login

नकळत सारे घडले - भाग ५४

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ५४


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026



घरी पोहोचल्यावर सगळे पुन्हा आपल्या ओरिजनल अवतारात आले, म्हणजेच मेकअप काढून तोंड धुवून आले. कल्पना ताई सगळ्यांना पाणी देत होत्या.


"ताई, निघतो आता आम्ही. खूप उशीर झाला आहे."
तात्या लगेच निघायचं म्हणत होते.

"आता इतक्या उशिरा कुठे जातो? आजची रात्र थांब मग सकाळी चहा नाश्ता करून निघा. तसेही आता सगळे दमलेले आहेत."
कल्पना ताई त्यांना अडवत होती.


"नको ताई, मीरेला घ्यायला पुन्हा यायचंच आहे ना!"
तात्यांना आता राहायला नको वाटतं होते.


"अरे तात्या, इतक्या रात्री कुठे जाता? सकाळी उठून जा."
विलासराव बोलले तसे तात्यांनी उचलून घेतलेल्या बॅगा खाली ठेवल्या आणि सुनिता बाईंना तसे सांगितले.


"झाला कार्यक्रम, आता आली का आपल्या ओरिजनल अवतारात."
मिनल नाईट ड्रेस घालून खाली आली तसे मल्हार तिच्याकडे बघून चिडवू लागला.

सगळे इतके दमलेले होते तरी पुन्हा खाली येऊन गप्पा मारत बसलेले. कोणी काय केले? काय काय खाल्ले? कोण काय बोलले? हे सगळे हसत बोलत होते. एकमेकांना चिडवत हास्याचे फवारे अजूनही चालूच होते.


इकडे कल्पना ताई आणि सविता काकूंनी मल्हारची बेडरूम सजवायला सांगितली होती. ही जबाबदारी त्यांनी मिनलकडे आधीच सोपवली होती; त्यामुळे ती आवरून लगेच वरती निघून गेली. कोणाला काहीच कळू न देता.


कल्पना ताईंनी तसे सुनिता बाईंना सांगून ठेवले होते. दोन दिवसांनी मीराला घ्यायला या म्हणून, पण मल्हारने फिरायला जायचे तिकिटं लग्नाच्या आधीच काढून ठेवलेले होते; त्यामुळे बहुतेक ते उद्या किंवा परवा निघतील असा अंदाज होता. मग आज त्यांची पहिली रात्र; म्हणून सविता काकूंनी मसाला दूध करायला घेतले होते.


मस्त केशराच्या काड्या घालून त्यात बदाम, पिस्ता, चारोळी, काजू, कुटून कुटून घातली होती. वेलदोडे जायफळ पूड घालायला विसरल्या होत्या, पण निवेदिता काकूने आठवण करून दिली.


"थोडी साखर आणखी पाहिजे."
निवेदिता काकूंनी टेस्ट करून पाहिले.


"नाही नको, मल्हारला जास्त गोड आवडत नाही ना! उगाच इतकं मस्त बनवलेले दूध वाया नको जायला."
असे म्हणून सविता काकू मल्हारची काळजी घेताना दिसल्या.


"अरे बापरे! इतकं कमी गोड खातो मल्हार! आमच्या मीराला तर लै गोड आवडतं."
निवेदिता काकू बोलत बोलत काम करत होत्या.


"ए, बरं झालं का तुमचं इथलं काम? लाईट बंद करून घ्या लवकर आणि माझ्या खोलीत या झोपायला."
कल्पना ताईंनी दोघींना आवरायला सांगितले कारण सगळे माणसं बाहेर हॉलमध्ये झोपलेले होते. त्यांना आवाज जात होता.


गणेश, दुर्गेश आणि मल्हार वरती गच्चीवर गप्पा मारत फिरत होते, कारण मिनल मल्हारची रूम सजवतेय हे त्या दोघांना माहिती होते. मल्हारला अजिबात कळू न देता दोघेही त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत होते. मिनलचा फोन आल्यावर खाली जायचं हे त्यांना माहिती होते.


इकडे मीरा मिनलच्या रूममध्ये फ्रेश होतं होती. इतका वेळ हेवी घागरा घालून तिला खूप थकवा आला होता. आल्या बरोबर तिने घागरा काढून फेकला आणि तिचा नाईट ड्रेस घालून झोपायची तयारी करत होती. आरशात बघून ती स्वतःशीचं गप्पा मारत होती.

'मीरा बाई, आज खरचं छान दिसत होतात तुम्ही. मल्हारची सुद्धा नजर हटत नव्हती. फोटो पण खूपच भारी आलेत दोघांचे.'
असे म्हणून तिने लगेच तिच्या फोनचा कव्हर फोटो बदलला. त्यांचा दोघांचा सुंदर जोडीचा फोटो लावला. ती फोन मधल्या फोटोत बघून हसत होती. इतक्यात मिनल रूममध्ये आली.


"मीरा बाई, काय तुम्ही पण! झोपायची तयारी झाली."
मिनल तिला आवरून द्यायला आली होती.


"मग काय करू आता? दमले मी तर सगळ्यांच्या पाया पडून पडून. आता पडल्या पडल्या झोप लागेल."
असे म्हणून मीरा आळस देत होती.


"अग, तुला आईने साडी नेसून खाली बोलवलं आहे."
मिनल तिला अजूनही कळू देत नव्हती.


"आत्ता? इतक्या रात्री!"
मीरा तोंड वाकडं करत बोलत होती.


"हो मग, पाहिजे तर तूच विचारून ये खाली जाऊन. कसली तरी पूजा करायची आहे म्हणे."
मिनल मुद्दाम बोलत होती.


"बरं बरं ठीक आहे, पण साधी साडी नेसली तर चालेल का?"
मीरा तिला विचारत होती.


"थांब मी काढून देते तुला साडी."
असे म्हणून मिनल तिच्या बॅग मधून एक सुंदर जॉर्जेटची बारीक बॉर्डर असलेली साडी काढून देते.


"हा.. ही साडी मस्त आहे. जास्त हेवी नाही आणि जास्त साधी पण नाही. तुझ्यावर हा मेहरून रंग मस्त दिसेल."
मिनलला माहिती होते मल्हारला बहुतेक असेच रंग आवडतात.

मिनलचे ऐकून मीराने आवरायला घेतलं, पण तिला खरचं काही समजत नव्हते. खाली जाऊन एकदा विचारून येऊ असे तिच्या मनात आले सुद्धा होते, पण मिनल वर विश्वास ठेवला बिचारीने.. आणि तसेही खालून त्या सगळ्या बायकांचा हलकासा आवाज कानावर येत होता म्हणजे त्या जाग्या असतील हे मीराला कळाले होते. ती पटकन साडी नेसून खाली जाऊ लागली. मिनल पण तिच्या मागे मागे गेली.


"मीरा, थांब. सविता काकू वरतीच येताय."
असे म्हणून मिनलने तिला मध्येच थांबवले.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.