Login

नकळत सारे घडले - भाग ५६

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ५६


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीरा बेडरूममध्ये येऊन दुधाचे ग्लास खाली टेबलावर ठेवून मल्हार येण्याची वाट बघत उभी होती. मनातून तर ती खूप घाबरली होती. तिला स्वतःचीच हृदयाची होणारी धडधड स्पष्ट ऐकू येत होती.

मल्हार बेडरूम बाहेर उभा आहे हे तिला त्याच्या बोलण्याचा आवाजावरून समजले तसे ती एकदम पाठ फिरवून गॅलरीमधे बघू लागली. ती खूप बावरून गेली होती. गच्च डोळे मिटून ती स्तब्ध उभी होती.


मल्हार बेडरूम मध्ये येताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. मीराचे डोळे अजूनही बंदच होते. तो आत येण्याची चाहूल तिला अगोदरच लागली होती; त्यामुळे ती तशीच त्याला पाठमोरी उभी होती.
इकडे मल्हारला पण समजत नव्हते, मीरा सोबत काय आणि कुठून बोलायला सुरुवात करायची. दोघांचेही लग्न अचानक झाले होते; त्यामुळे दोघांना कळतं नव्हते, की नेमकं आत्ता ह्या क्षणी काय बोलायचं?


आजूबाजूला फुलं, मेणबत्त्या आणि अत्तराचा मादक सुवास दरवळत होता. ही सगळी तयारी मिनलने केली असावी हे त्याला लगेच समजून आले होते. दोघेही आत्ता ह्या क्षणी खूप अवघडल्या सारखे उभे होते.

"मीरा."
मल्हारने बोलायला सुरुवात तर केली होती, पण ती अजूनही त्याला पाठ करून उभी होती.


"हम्म्म."
मीराने फक्त हुंकार दिला. मल्हारला कळून चुकले होते, की मीरा खूप घाबरली आहे.


"दमली असशील ना खूप? हे सगळं मिनूने काय पसारा करून ठेवलाय."
मल्हारला काय बोलावे तेच कळतं नव्हते. तो बेडवरच्या गुलाबाच्या पाकळ्या बाजूला करत बोलत होता.


"नाही, तसं काही नाही."
असे म्हणून मीरा पटकन त्याच्याकडे वळली.


मल्हारची नजर तिच्यावर गेली तसे तिने खाली पाहिले. मीरा खूप जास्त सुंदर दिसत होती. फिकट आकाशी रंगाची जॉर्जेटची साडी आणि अगदी साधा मेकअप. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि हातावर मेहेंदी.. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या सुंदरतेेत आणखी भर घालत होत्या. तिच्याकडे बघून मल्हार काही क्षण हरवून गेला होता; पण अचानक त्याला पुन्हा तेच आठवले. 'मामाची मुलगी होती म्हणून झाले ह्याचे लग्न, नाहीतर कधी झाले असते काय माहिती.' हे सगळे आठवून तो पुन्हा खाली बघू लागला. त्यात मितालीची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो कोणालाच बोलून दाखवत नव्हता, पण मनातून मात्र खूप बेचैन होता.

मल्हारला आलेले बघून मीराने पटकन टेबलवरचा दुधाचा ग्लास त्याच्या पुढे केला. त्याने तो घेतला आणि पटकन एका घोटात पिऊन टाकला. ती त्याच्याकडे बघतच राहिली. 'असा कसा हा? एका घोटात इतकं गरम दुध पिऊन संपवलं.'


"तू?"
मल्हारने तिच्याकडे बघून म्हंटले तशी तिने मान डोलावली.


"मी काय भूत दिसतोय का?"
मल्हार तिला बघतच बोलत होता. तिने पुन्हा नकारार्थी मान डोलावली.


"अग मग अशी काय मला कधी न पाहिल्यासारखी एकदम घाबरून बघतेय. मी काय खाणार आहे का तुला?"
मल्हार तिला थोड नॉर्मल करण्यासाठी बोलत होता. त्याला माहिती होते मीरा थोडी घाबरलेली दिसतेय.


"नाही.. ते."
मल्हारचे असे बोलणे ऐकताच तिला हसू आले. ती खरचं आता थोडी नॉर्मल झाली होती.


"मीरा, हे बघ.. आपण एकमेकांना अगदी चांगले ओळखतो, पण तरीही मला असे वाटते की आपण थोडा वेळ द्यायला पाहिजे एकमेकांना. तुला काय वाटतं?"
मल्हारने आता सरळ मुद्द्यालाच हात घातला.


"हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे."
मीरा पण त्याच्या हो ला हो करत बोलत होती. खरंतर मीरा पूर्णपणे त्याची व्हायला तयार होती, पण मल्हार असे बोलल्यामुळे तिचा गोंधळ उडाला. कदाचित त्याला स्वतःला वेळ पाहिजे असेल म्हणून असं बोलला असेल. हे मीराला सुद्धा समजले होते.


"तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी ह्या बाजूने झोपतो आणि तू त्या बाजूने झोपलीस तरी चालेल."
मल्हार बेडच्या एका साईडला उशी करत बोलला.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.