Login

नकळत सारे घडले - भाग ५८

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ५८

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मल्हार तर केव्हाच झोपी गेला होता आणि मीरा पण त्याला बघून तशीच बसल्या बसल्या झोपून गेली. तासाभराने खाडकन अलार्म वाजला. दोघेही दचकून उठले.


"कोणी लावला हा अलार्म?"
मल्हार उठून मीराकडे बघत बोलला तसे तिने वाजणारा मोबाईल त्याच्यासमोर केला.


"तीन वाजले! इतक्या रात्री उठून काय करणार होती तू?"
त्याला वाटले मीराने अलार्म लावून ठेवला होता.


"नाही, मी नाही लावला हा अलार्म."
मीरा बिचकतच बोलली.


"मग, हा फोन तुझा नाही?"
मल्हार तिच्याकडे बघून विचारतो.


"नाही, माझा फोन तिकडे टेबलवर ठेवला आहे."
मीराने नकारार्थी मान डोलावली.


"हा फोन बहुतेक, दुर्गेशचा असावा मग! त्याच्याकडे आता सकाळी बघतो."
मल्हार त्या फोनवरील फोटो बघून ओळखून जातो.


"नको नको, त्यांनी मस्कारी केली असणार. तुम्ही उगाच ओरडू नका त्यांना."
मीरा त्याला शांत करायला बघत होती.


"आता हा फोन परत वाजला नाही पाहिजे."
असे म्हणून मल्हार तो फोन बंदच करून टाकतो.


मल्हार फोन बंद करून टेबलवर नेऊन ठेवतो जिथे मिराचा फोन ठेवला होता. त्याला धक्का लागताच तिचा फोनवर फोटो दिसला. मीराने दोघांचा लग्नातला फोटो लावलेला होता. ती आणि मल्हार जोडीने उभे होते हातात हात घेऊन. मल्हारने फोटो बघताच मीराकडे बघितले. ती अजूनही उशीला टेकून बसून होती आणि तशीच झोपली होती. त्याला आता ह्या अवस्थेत काय करावे सुचेना. तो जाऊन पुन्हा बेडवर झोपी गेला. मनात मात्र वेगळेच विचार घुमत होते आणि ते बोलणार तरी कोणाजवळ? अशी अवस्था झाली होती.


'कदाचित मीराला सुद्धा वेळ पाहिजे असणार. अचानक लग्न झाले म्हणून आपण तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. तिला ह्या घरात कुठलीही कमी पडू द्यायची नाही ह्याची जबाबदारी माझी. तसे तर तिला इथले सगळे माहितीच आहे; त्यामुळे तिला जास्त जड नाही जाणार. बऱ्याचदा ती राहायला पण येऊन गेली आहे इथे; म्हणून घरातले सगळे माहिती पण आहे. पण मीराकडे याआधी मी त्या नजरेने पाहिलेच नाही.. आणि तिला सुद्धा कधी वाटले नसेल. खरचं मिताली सोबत लग्न नाही झाले; म्हणून माझे कधी लग्नच जमले नसते का?'
मल्हार मनात विचार करत होता, पण त्या विचारात सुद्धा मिताली होती. तो तिला इतक्या लवकर असं सहजासहजी विसरु शकत नव्हता.


त्याने लग्न ठरल्यापासून मितालीला दिवसातून दहा वेळा तरी फोन केला असणार. दोघेही दिवसभर गप्पा मारायचे. मल्हारचे प्रेम जडले होते तिच्यावर..आणि तिने सुद्धा त्याला कित्येकदा बोलून दाखवले होते, पण मग ती अशी का पळून गेली? ह्याचे उत्तर मल्हारला सापडले नव्हते आणि म्हणूनच तो खूप अस्वस्थ होता. त्याला ह्याचा उलगडा हवा होता. त्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हता. कितीही झाले तरी मिताली त्याची होणारी बायको होती. ती त्याच्यासोबत अशी का वागली हे समजणे गरजेचे होते.


लग्नाच्या आधी दोघेही कित्येकदा भेटले होते. तेव्हा तिच्याकडे बघून कधीच वाटले नव्हते, की ती अशी वागू शकते. नेमकं काय कारणं असेल तिच्या पळून जाण्यामागे? समजायला काही मार्गच नव्हता.

फोन करून खूपदा बोलवेसे वाटले, पण तिने मल्हारचा नंबर ब्लॉक करून टाकला होता; त्यामुळे तिला फोन करने शक्य नव्हते. कदाचित तिला पुन्हा कधी मल्हारसोबत बोलयचेच नसेल; म्हणून तिने स्वतः असे केले असणार.


मल्हार विचार करून करून झोपी गेला. मीरा मात्र वेगळ्याच दुनियेत हरवली होती. तिने स्वतः शीचं ठरवले होते. मल्हारला जेव्हा योग्य वाटेल तेव्हाच.. तेव्हाच ते एकत्र येतील. तोपर्यंत ती सुद्धा त्यांच्यातले अंतर राखून ठेवणार, पण बाहेर हे कोणालाच कळणार नाही याची सुद्धा ती काळजी घेणार होती.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.