Login

नकळत सारे घडले - भाग ५९

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ५९

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीरा सकाळी लवकर उठली. मल्हार अजूनही झोपलेला होता. तिने तिचे आवरून घेतले आणि खाली जाऊया म्हणून विचार करत होती, पण मल्हारकडे पुन्हा वळून पाहिले. तो झोपेत खूप निरागस दिसत होता, अगदी एखाद्या लहान मुलासारखा. मीरा त्याच्या जवळ गेली. त्याला बघून ती तिथेच थिजली. तिला खूप वाटतं होते त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, पण त्याला जाग आली तर! म्हणून ती तशीच उभी राहून त्याला बघत बसली.


इथे मनाला आवरणे कठीण झाले होते, पण मीरा खाली बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवणार तोच त्याला जाग आली. मीरा एकदम बावरल्या सारखी झाली.
"ते मी तुम्हाला उठवणारच होते, पण तुम्ही गाढ झोपेत होतात."
मीराला काय बोलावं तेच सुचत नव्हते. ती उठून पटकन बाहेर जाऊ लागली. मल्हार मात्र अजूनही झोपेतच होता. त्याला सुद्धा काही कळले नाही, की मीरा अशी का निघून गेली.


मल्हार उठून बघतो तर मीराने सगळी रूम नीट आवरून ठेवली होती. त्याचे इकडे तिकडे पडलेले कपडे तिने नीट घडी करून ठेवलेले होते. अंथरूण घड्या करून ठेवले होते. फुलं सुद्धा गोळा करून पिशवीत भरून ठेवली होती. एकंदरीत रूम मधला सगळा पसारा तिने झटक्यात नाहीसा केला होता. ते पाहून मल्हारला छान वाटतं होते. एरवी आई त्याला बोलत असायची की कपडे नीट ठेवत जा म्हणून, पण कामाच्या घाईत त्याच्याकडून ते नेहमीच राहून जात असे, पण आता मीरा आली होती आणि तिने पहिल्याच दिवशी तिची जादू दाखवायला सुरुवात केली.


मीरा खाली जाताच सगळे जण तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते, पण मीराला मात्र काहीच समजत नव्हते. ती आली आणि पाहिले आजी सासूबाईंच्या पाया पडली. नंतर एक एक करून सगळ्यांच्या पाया पडत होती.

"अग मीरा, रोज रोज पाया पडायची काही गरज नाही. तू देवाला नमस्कार करून आली तरी बास आहे."
कल्पना ताईंनी मीराला जवळ घेत सांगितले.


"अग्गोबाई, सासूबाई फार लाड नका करू हो आमच्या मीरेचे! आधीच इकडे सगळ्यांनी लाडावून ठेवली आहे तिला आणि आता तुम्ही पण."
निवेदिता काकू बोलल्या तशा सगळ्याच हसायला लागल्या.


"कशाला ग, माझी एकुलती एक सूनबाई आहे. लाडाची तर असणारच."
कल्पना ताई तर एकदम मीराच्या बाजूने बोलत होत्या.


"मीरा, आज तू काहीतरी गोड बनव सगळ्यांसाठी."
सविता काकू बोलल्या.


"हा, पण पहिले शेगडीची पूजा करून घे. देवघरातून करंडा आण आणि फुलं पण आहेत बघ आपल्या अंगणातली."
कल्पना ताई मीराला सांगत होत्या तशी मीरा लगेच उठली. गॅसची पूजा केली आणि सगळ्यांना हळदीकुंकू लावले.


आज तिचा स्वयंपाक घरातला पहिला दिवस; त्यामुळे काहीतरी गोड पदार्थ बनवायचा होता. तिला खरंतर सगळंच छान येत होतं, पण इकडे कोणाला काय आवडतं ते माहिती नव्हते. खीर बनवायची की शिरा? हाच विचार तिच्या मनात होता. तितक्यात सविता काकू जवळ आल्या आणि तिच्या कानात सांगू लागल्या.


"मीरा, मस्त बारीक शेवयांची खीर बनव. मल्हारला खूप आवडते."
सविता काकू बोलल्या तशी मीरा गालातल्या गालात लाजली. तिला तसे पाहून सगळ्या नुसत्या गोंधळ घालत होत्या.


"काय उगाच चिडवता ग माझ्या पोरीला. मीरा तुला लागणारे सामान सविता काढून देईल आणि काही मदत लागली तर सांग."
कल्पना ताई बोलल्या तशा सगळ्या जणी गप बसल्या.

एका बाजूला चहा उकळत होता आणि एका बाजूला खीर बनवायचे चालू होते. सामान तर काढून दिले लगेच, पण मीराला साडीमध्ये काम करायला जमेल की नाही शंकाच होती. तिला असे पाहून काकूंनी तिचा पदर कमरेत खोचून दिला. पहिल्यांदा सगळ्यांसाठी काहीतरी बनवणार; म्हणून मनात थोडी भीती होतीच, पण सगळे छान होणार हे ही माहिती होते.


स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्यात पहिले तूप घालून सगळे काजू बदाम भाजून घेतले. नंतर त्यातच शेवया पण थोड्या परतून घेतल्या. गरम दूध घालून साखरेचा गोडवा त्यात उतरला आणि वेलची पावडरने तर कमालच केली. केशराने देखील त्याचे रंगकाम दाखवून दिले होते. भरपूर काजू बदाम चारोळी घातली; त्यामुळे खीरीवरती जणू नक्षीच काढल्या सारखे दिसतं होते. घरभर खिरीची सुगंध दरवळत होता. मीरा अगदी मन लावून बनवत होती. तिला असे काम करताना पाहून सुनिता बाईंना पुन्हा भरते आले.


"काय झालं वहिनी, डोळ्यातून पाणी का?"
सविता काकूंनी विचारले तसे त्यांनी लगेच पाणी पुसले.


"अग काही नाही, ते असचं जरा."
त्यांना काय बोलावे सुचत नव्हते.


"वहिनी, तुम्ही मीराची अजिबात काळजी करू नका. तिला इकडे कसलाच त्रास होणार नाही."
सविता काकू बोलत होत्या तशा कल्पना ताई पण जवळ आल्या. त्यांनी पण सुनिता बाईंना डोळ्यांनीच काळजी नका करू म्हणून सांगितले.


"मला माहिती आहे. माझी मीरा इथे खूप सुखात राहील, पण शेवटी आईची माया आणि काळजी.. सुटता सुटत नाही."
सुनिता बाईंना आता खरचं खूप भरून आले होते. आपली लेक सासरी सुखात राहील याची खात्री असली, तरीही आईची काळजी काही मिटत नसते.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.