Login

नकळत सारे घडले - भाग ६०

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ६०


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


"मीरा, खीरीची वाटी पहिले देवाला ठेवून ये."
सासूबाई बोलल्या तसे मीराने लगेच एक खीरीची वाटी घेऊन देवाला नैवैद्य दाखवला आणि मग एका मोठ्या ट्रेमध्ये वाट्या ठेवून सगळ्यांना एक एक देत होती.


मल्हार त्याच आवरून खाली येतच होता, की समोर त्याला मीरा दिसली. हातात ट्रे आणि साडीतली मीरा.. दोन्हीही सुंदर दिसत होत्या. मल्हार तिच्याकडे बघतच पायऱ्या उतरत होता तेव्हा मधातच त्याचा पाय अडखळला.


"भाऊ, हळू जरा. नीट खाली बघून पायऱ्या उतरा."
दुर्गेश म्हणाला तसे मल्हार त्याच्याकडे रागाने बघत होता.


"या या बसा, तुमचीच वाट बघत होतो. वहिनींनी मस्त खीर बनवली आहे."
गणेश बोलला तसे मल्हार त्याच्याजवळ जाऊन बसला.

"तुम्ही दोघं इतक्या लवकर कसे काय उठले बरं?"
मल्हार त्यांना बघून बोलला.


"अरे खीरिची वास आला असेल त्यांना; म्हणून लगेच उठून बसले दोघे. नाहीतर अगदी मेल्यासारखे पडले होते."
मिनल बोलली तसे सगळेच खळखळून हसले.


"मिनू, असं नको म्हणू. वहिनींना प्रोत्साहन द्यायला उठलो आम्ही."
दुर्गेश खीर खाता खाता बोलत होता.


"अरे तोंड तरी धुतले का?"
मिनल दोघांकडे बघून बोलली तसे ते दोघेही तिच्याजवळून उठून दुसरीकडे जाऊन बसले.


"वहिनी, खीर खूप भारी झाली. आणखी एक वाटी मिळेल का?"
दुर्गेश बोलला तसे मीरा हसली, पण आईने त्याच्या पाठीत धपाटा दिला.


"मेल्यांनो, जा उठा आंघोळी करून या मग देते तुम्हाला. तसेच पारोसे बसून खीर खाताय आणि अजून मागताय."
दोघेही वाटी घेऊनच तिथून पळाले.


"मीरा, मल्हारला चहा बिस्कीट आणि खीर आण."
आईंनी सांगितले तसे मीराने ट्रे पुढे केला आणि हळूच मल्हारकडे बघितले. तिचे डोळे थोडे सुजल्यासारखे दिसत होते. बाकीच्यांना वाटले तिची काल पहिली रात्र म्हणून चिडवत होते, पण खरे कारण तिलाच माहिती होते आणि तरीही ती सगळ्यांसमोर हसून होती.


मल्हारने खीर खाल्ली. त्याला खीर खूप आवडली होती, पण त्याने तसे बोलून दाखवले नव्हते. फक्त तिच्याकडे बघितले. ती मात्र सगळ्यांना छान हसून आणखी खीर वाढत होती.


विलासराव, तात्या, नाना सगळ्यांनाच खीर आवडली. सगळ्यांनी काही ना काही तिच्या हातावर ठेवले. सविता काकू, निवेदिता काकू, सुनिता बाई आणि कल्पना ताईंनी खीर खाल्ली तेव्हा मीराचे खूप कौतुक केले. तिलाही खूप छान वाटले.


"वहिनी, किती मस्त खीर बनवली आपल्या मीरेने."
सविता काकू खात खातच बोलल्या.


"आईनेच शिकवली मला."
असे म्हणून मीरा लगेच सुनिता बाईंना जाऊन बिलगली.


"बरं चला, आपल्याला आता निघायला हवे."
तात्या बोलले तसे सुनिता बाईंनी आतून बॅग बाहेर आणून ठेवायला सुरुवात केली.


"ताई, मीराला घेऊन जाऊ का? पहिले मूळ होऊन जाईल तिचे. पाहिजे तर उद्या लगेच घ्यायला आले तरी चालेल."
तात्या बोलले तसे कल्पना ताई हो म्हणाल्या.


"अरे विचारतो काय? घेऊन जा तिला आणि हो आम्ही लगेच उद्या संध्याकाळी येऊ. मल्हारने तिकिटं बुक केली आहेत आधीच. दोघेही फिरायला जाणार आहेत."
कल्पना ताई बोलल्या तसे मल्हारने शॉक होऊन बघितले.


"आई, राहू दे तिला काही दिवस माहेरी. मी तिकिटं कॅन्सल केली आहेत."
इतके बोलून मल्हार तिथून निघून गेला. आईला मात्र थोडे वाईटच वाटले. मीरा पण खुश होती, पण हे ऐकताच तिचाही चेहरा पडला.


"तात्या, आरामात घ्यायला येतो आम्ही आमच्या सुनेला. राहू दे तिला चार आठ दिवस. नंतर जातील ते फिरायला."
कल्पना ताईंनी सांभाळून घेतले म्हणून बरे, नाहीतर सगळ्यांचेच चेहरे थोडे नाराज झाल्यासारखे दिसत होते.


वरती येऊन मीराने तिची बॅग घेतली. तिला खूप वाईट वाटतं होते. काल रात्री पण मल्हार नीट बोलला सुद्धा नाही तिच्याशी आणि आज तिकिटं पण कॅन्सल केली. नेमकं काय कारण असेल हे तिलाही समजत नव्हते. तरीही तिने तिच्या मनाला सावरले. स्वतः ला समजावत होती. 'आज नाहीतर उद्या सगळे ठीक होईल. आपल्या नात्याला थोडा वेळ तर दिलाच पाहिजे. एकदम असे अचानक कोणीही नवीन नाते स्वीकारु शकत नाही. कदाचित मल्हारला थोडा जास्त वेळ लागेल, पण मी त्या क्षणाची वाट बघेन.'


मीरा डोळे पुसत स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होती. तिची अवस्था न सांगण्यासारखी झाली होती. नव्या नात्याची सुरुवात तर होती, पण मनात जी हुरहूर जी भीती असते ती मल्हारच्या वागण्यामुळे कमी झाली होती. तिला पटकन समजत नव्हते. नेमकं तिने कसं बोलावं, वागावं त्याच्याशी, पण तरीही ती होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. मनातल्या भावना मनातच दाबून ठेवत होती.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.