Login

नकळत सारे घडले - भाग ६१

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ६१

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026



मीरा तिच्या आई वडिलांसोबत माहेरी गेली. तिथून जाताना तिला सुद्धा वाईट वाटतं होते, कारण मल्हार अजूनही तिच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हता. कल्पना ताई मात्र मीराची खूप काळजी घेत होत्या; त्यामुळे सगळेच निश्चिंत होते.


"मल्हार, तू तिकिटं कॅन्सल का केली?"
गणेशने त्याला सगळ्यांसमोर विचारले.


"ते बुकिंग खूप आधी केलेले होते आणि मी लग्नाच्या दिवशीच तिकिटं कॅन्सल केली होती. त्यावर मितालीचे नाव टाकलेले होते. ज्यावेळी समजले मिताली पळून गेली आहे, तेव्हाच मी कॅन्सल करून टाकली होती."
इतके बोलून मल्हार वरती निघून गेला. त्याला कोणाशीच बोलायचे नव्हते.


"मल्हार, अरे थांब तरी."
दुर्गेश बोलत होता, पण तो काही म्हणायच्या आत मल्हार वरती निघून गेला होता.


"आई, तुम्ही काळजी नका करू. त्याला आम्ही समजवतो, नंतर काही दिवसांनी करेन तो पुन्हा बुकिंग. तुम्ही फक्त मीरा वहिनींना लवकर बोलवून घ्या."
इतके बोलून गणेश पण त्याच्या मागे वरती गेला.


"मल्हार, आम्ही निघतो आता. घरी मम्मी पप्पा वाट बघत असतील. चार दिवस झाले इकडेच राहतोय. चल!"
इतके बोलून गणेश आणि दुर्गेशने त्यांची छोटीशी बॅग घेतली आणि जायला निघाले. खाली आल्यावर आईंनी थांबवले.

"अरे जेवून तर जा!"

"नको आई, आता खूप दिवस थांबलो. घरी पण वाट बघत असतील."
इतके बोलून दोघांनी त्यांच्या पाया पडल्या आणि निघून गेले.


मल्हार अजूनही त्याच्या खोलीत एकटाच बसला होता. तिकडे मीरा तिच्या माहेरी पोहोचली की नाही हे विचारले सुद्धा नाही. आईनेच निरोप सांगितला मीरा पोहोचल्याचा. दोघांमध्ये अजूनही फारसे बोलणे होत नाही.. एव्हाना हे आईला सुद्धा समजले होते. 'अजून नवीन आहे म्हणून वेळ घेऊ दे त्यांना त्यांचा.' असे म्हणून आई पण काही बोलल्या नव्हत्या. मिनल मात्र चांगली लक्ष ठेवून होती.


तिकडे मीरा माहेरी गेल्यावर सगळ्या मैत्रिणी तिला भेटायला येतात. खूप गप्पा मारतात. तिचे लग्न कसे घाईघाईत झाले याचे किस्से एकमेकांना सांगतात.

"मग काय? शेवटी आत्त्याच्या मुलाशीच लग्न केलेस ना!"
असे म्हणून मैत्रिणी चिडवू लागतात, पण मीरा मात्र काहीच बोलत नाही.


"काय ग? काही प्रोब्लेम आहे का?"
एका मैत्रिणीला तिच्या चेहऱ्यावरून समजले आणि तिने लगेच विचारले.


"नाही ग! कुठे काय?"
मीरा उगाच हसत बोलत होती.


"मीरा, माझ्याशी खोटं नाही बोलायचं हां!"
तिला आता चांगलेच समजले होते. ती असे बोलल्या बरोबर मीराला रडूच फुटले.

"अग काय झाले? तुला काही त्रास आहे का?"
मैत्रिणी काळजीने विचारत होत्या.


"नाही, त्रास म्हणजे तसा काहीच नाही. घरातले सगळेच चांगले आहेत. आत्त्या तर खूप लाड करते. मिनल पण अगदी मैत्रिणी सारखी आहे."
मीरा सगळ्यांचं सांगत होती.

"अग मग तुला रडायला काय झाले? जीजू काही बोलले का?"
मैत्रिणी आता खोदून खोदून विचारत होत्या.


"ते.. मल्हार पण चांगलेच आहेत. बस फक्त."
इतके म्हणून तिला पुन्हा रडू कोसळले. दोन्ही हात तोंडावर धरून ती रडू लागली तशा मैत्रिणी पण हळव्या झाल्या.


"मीरे, अग तू काही बोलल्याशिवाय आम्हाला कसे समजणार बरं. आधी तू हे रडणे थांबव बरं."
एकीने तिचे डोळे पुसत बोलली.


"त्यांना वेळ हवा आहे. आमच्यात अजून तसे काहीच झाले नाही जे तुम्हाला आल्या आल्या वाटले होते. त्यांच्या डोक्यात अजूनही मिताली आहे."
मीरा हुंदके देतच बोलत होती.


"अग मग जीच्यासोबत आधी लग्न ठरले होते तिच्यासोबत त्यांनी बराच वेळ घालवला असणार ना! ती अशी अचानक पळून गेली मग त्यांना याचा चांगलाच धक्का बसला असणार. तू जरा समजून घे ना! त्यांना खरचं वेळ दे. कदाचित घराच्यांमुळे त्यांनी लग्न केलं असावं, पण तुलाही त्यांनी अंधारात नाही ना ठेवले. सगळे विरोध करत असतानाही ते तुझ्याशी बोलायला आले, हे काय कमी आहे का? प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे. जो माणूस सगळ्यांना विरोध करून बोलायला येतो यातून तुझी काळजी स्पष्ट दिसून येते.. मग तूच बघ ना! आणि त्यांनाच काय तुलाही खरतर वेळ हवाच होता ना! शांत डोक्याने विचार कर. मला तर त्यांचं असं वागणं पटलं. तुला ते कधीच दुखवणावर नाही."
मैत्रिणी खूप छान समजावून सांगत होत्या; त्यामुळे मीराला त्यांचे सगळे म्हणणे पटले.


"आता अजिबात रडायचं नाही. वेडाबाई नुसती. इतकी कशी घाई झाली ग तुला!"
असे म्हणून सगळ्या जणी तिला चिडवत होत्या तशी मीरा आणखी लाजत होती.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.