Login

नकळत सारे घडले - भाग ६२

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ६२

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीरा माहेरी जाऊन दोन दिवस झाले होते आणि तरीही मल्हारने तिला एकदाही फोन केला नव्हता. त्याच्या डोक्यात भलतेच विचार थैमान घालत होते. त्याला त्यातून बाहेर यायलाच पाहिजे होते. नाहीतर नवीन आयुष्याला त्याला सामोरे जायला आणखी कठीण होऊन बसणार होते.

घरातले पण सगळे काळजीत होते. लग्न तर लावून दिले होते त्याचे लगेच, पण त्याने मीराचा स्वीकार केला नाही तर? कल्पना ताईंना ह्याच खूप टेन्शन आलेलं होतं. तो नेहमी गप्प गप्प असायचा. जितकं विचारलं तितकंच उत्तर द्यायचा आणि खोलीत निघून जायचा. थोड्याच दिवसांनी ऑफिसला जायला सुरुवात करणार होता, पण त्याआधी मीराला घरी आणले पाहिजे असे कल्पना ताईंना वाटले.


"मल्हार, मीराला माहेरी जाऊन आता चार पाच दिवस होऊन गेलेत. तिला घ्यायला जायचे आहे. तिकडून फोनवर विचारत होते. आपण उद्या जाऊया का?"
आईने विचारले तसे मल्हार बघतच राहिला.


"आई, तू आणि पप्पा जा. सोबत मिनूला पण घेऊन जा. मला नाही जमणार, जरा काम आहे."
इतके बोलून मल्हार निघून गेला. 


"असं कसं, ते काही नाही. आपण उद्या सकाळी निघतोय. ठरलं माझं."
इतके बोलून आईच तिथून उठून निघून गेली.


आता मल्हारकडे काही पर्याय नव्हता. त्याला जावेच लागणार होते. सविता काकू आणि काका पण मीरा माहेरी गेली त्यावेळी त्यांच्या घरी निघून गेले होते. आता घरात फक्त ते चौघेच उरले होते.


ठरल्याप्रमाणे सकाळी सकाळी चहा नाश्ता झाल्यावर सगळे जण मीराला घ्यायला निघाले होते. तिकडे तसे सांगून ठेवले होते. त्यांनी पण बरीच तयारी केली होती. जाताना भरपूर मिठाई आणि फळं आठवणीने घेतले होते. तिकडे पोहोचताच मीराच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. ते येण्याआधीच तिने तिची बॅग भरून ठेवली होती. दोन चांगल्या मोठ्या मोठ्या बॅग दिसत होत्या.

"मीरा, अग हे इतके सामान!"
मिनू बॅग बघताच बोलली.


"हो, एका बॅगमध्ये कपडे आणि मैत्रिणीने दिलेले गिफ्ट आहेत आणि दुसऱ्या बॅगेत माझ्या अभ्यासाची पुस्तकं आहेत."
मीरा बोलली तसे मल्हारला आठवले, मीरा शेवटच्या वर्षाला होती. तिचे शिक्षण असे मधेच थांबवू शकत नाही.


"मी काय म्हणते, तिला तुम्ही फक्त परीक्षेला पाठवले तरी चालेल. अभ्यास करून घेईल ती; त्यामुळे नुसते पेपर द्यायला आली तरी होऊन जाईल."
सुनिता बाई कल्पना ताईंना बोलत होत्या.


"वहिनी, तुम्ही फार काळजी करतात. मीरा काय परकी आहे का मला. तिला पुढेही शिकायचे असेल तर आमची काहीच हरकत नाही. चांगली शिकू दे तिला आणि जॉब करायचा असला तरी करू दे."
कल्पना ताई बोलल्या तसे सुनिता बाईंच्या मनावरचे दडपण नाहीसे झाले.


गेल्या बरोबर सगळ्यांचे साग्रसंगीत जेवण झाले. जेवण अर्थातच मीराने बनवले होते हे दिसून येत होते. तिला खूप हौस होती छान छान पदार्थ करून खाऊ घालायची; त्यामुळे काळजीचे काही कारण नव्हतेच.

जेवण झाले गप्पा झाल्या आता निघायला हवे; म्हणून मीराला आवरायला सांगतात. सुनिता बाईंनी दोघी सासू सूनांची ओटी भरली. तिथून निघताना मीराला खूप रडू येत होते. आजूबाजूच्या बायका सुद्धा मीराला निरोप द्यायला आल्या होत्या. आईच्या गळ्यात पडून मीरा खूप रडली. तिला मिनलने सावरले. तात्या पण खुश होते. बहिणीच्या घरी आहे म्हंटल्यावर काही काळजीचे कारणच नव्हते.

जड पावलांनी मीरा गाडीत येऊन बसते आणि ते सगळे घरी जायला निघतात. दोघांच्या घरातले अंतर साधारण दोन तीन तासांचेच; त्यामुळे सकाळी येऊन संध्याकाळी पुन्हा घरी असे आधीच ठरलेले होते.


मीरा पुन्हा सासरी येताच तिच्या बॅग मल्हारच्या बेडरूममध्ये ठेवल्या. आता तो तिचाही बेडरूम होता, पण तिला कपडे ठेवायला कपाटात जागाच नव्हती. तिला विचारायला पण भीती वाटतं होती. कपाट तर बरेच मोठे होते, पण अर्ध्याहून जास्त त्यात ऑफिसच्या फाईल्स आणि इतर न लागणाऱ्या वस्तूच जास्त होत्या. तिने कपडे तसेच बॅगमध्येच ठेवले.


रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यावर मीरा सगळं आवरून वरती गेली. मल्हार अजूनही खाली टिव्ही बघत बसलेला. मीरासोबत जास्त बोलायला नको; म्हणून कदाचित मुद्दाम तो तिची झोपायची वाट बघत बसायचा आणि उशिराने वरती जायचा. पण आज मीराला त्याच्याशी बोलायचे होते; म्हणून ती त्याची वाट बघत बसलेली. बॅग मधून काही पुस्तकं काढून वाचत होती.


इतक्यात मल्हार रुममध्ये आला आणि बघतो तर काय! मीरा वाचत बसलेली. तो येताच ती उठून उभी राहिली. तिला काहीतरी बोलायचे आहे हे त्याला समजले होते.

"काय झाले? अशी अचानक उठून का उभी राहीली तू? काही बोलायचं आहे का?"
मल्हारने जणू तिच्या मनातले ओळखले होते.


"हो, दुपारी आत्त्त्या बोललीच की मी परीक्षेला जाऊ शकते. पुढे शिकले तरी काही हरकत नाही, पण तुम्ही काहीच बोलले नाही."
इतके बोलून मीरा खाली बघत होती.


"नाही, माझी काहीच हरकत नाही. आई बोलली ते अगदी योग्य होते."
मल्हार आईचे बोल आठवून सांगत होता.


"आत्या बोलली, पण मला तुम्हाला देखील विचारायचे होते; म्हणून मी वाट बघत होते. पुढे शिक्षण चालू ठेवले तर तुम्हाला काही प्रोब्लेम नाही ना!"
मीराने आता डायरेक्ट मुद्द्याला हात घातला.


"तुला शिकायचं तितकं शिक. लग्न झालं म्हणजे शिक्षण थांबल अस नाही, तू माझी जबाबदारी आहे."
मीराला त्याने पत्नी म्हंटले असते तर जास्त आवडले असते, पण तो तिला फक्त एक जबाबदारी म्हणून बघत होता. ती मनातून खूप दुखावल्या जाते, पण तिला बोलता येत नाही.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.