Login

नकळत सारे घडले - भाग ६५

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ६५


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


आज पहिल्यांदा मीरा मल्हारच्या इतक्या जवळ होती. हे सगळे मिनलमुळे शक्य झाले होते. मनातून तर खूप खुश होती मीरा, कारण मल्हार तिच्या आसपास जरी असला तरी तिला छान वाटायचे. हळूहळू बोलणे होतं होते, पण बोलण्यात म्हणावा तसा मोकळेपणा अजूनही आला नव्हता.


रात्र झाली, की मीराला ती बेडरूम मधली शांतता बिलकुल आवडत नव्हती. एकाच बेडवर पण तरीही दोघे अंतर ठेवून झोपत होते. मीरा मात्र अर्धी रात्र जागूनच काढत होती; त्यामुळे तिची झोप होत नव्हती आणि डोळे सुजल्यासारखे वाटायचे. मल्हारला पण दिसायचे ते, पण त्याला वाटत होते, की नवीन ठिकाणी लवकर झोप लागत नसणार म्हणून असे होत असावे.


बऱ्याच दिवसांनी गणेश आणि दुर्गेश पण घरी आले होते. लग्नानंतर ते सुद्धा पहिल्यांदाच येत होते. गणेश सारखा वरती जायला बघत होता, पण पुन्हा खाली बसून घेत होता. त्याला बघून आईला हसू येत होते.


"आता तुमची बेडरूम नाही राहिली ती."
आई पटकन बोलून गेल्या तसे दोघेही हसायला लागले.


"हो ना, आता आमचे इथे राहणे, खाणे बंद झाले. मीरा वहिनी, तुम्ही लांब केलं आमच्या मित्राला आमच्यापासून."
असे म्हणून दुर्गेश खोटं खोटं रडायचं नाटक करू लागला.


"नाही हो, तुम्ही पाहिजे तेव्हा येऊ शकता. मी नाही येणार तुमच्यामधे. जा तुम्ही वरती, हे वरतीच आहेत. अजून आवरताय."
मीरा पण त्यांच्याशी मस्करीत बोलत होती.


"मल्हार, अरे वरती एकटा काय करतोय तू? आणि तू बुकिंग केले की नाही अजून? थंडी संपून जाईल."
गणेश बिनधास्त बेडवर लोळत बोलत होता.


"मल्हार, अरे रूम एकदम स्वच्छ आणि सुंदर आवरून ठेवली आहे. लग्न झाले की सगळे बदलून जाते ना! नाही म्हणजे आपण एकटे कसं.. कसेही राहतो. कपडे कसेही पडलेले असतात, पण तुझे आता तसे नाही."
दुर्गेश मस्ती करत बोलत होता.


"अरे ही सगळी वहिनींनी कमाल आहे. मल्हार फक्त तू बदलू नकोस हां! नाहीतर आम्हाला खूप आठवण येईल तुझी."
गणेश पण मुद्दाम रडक तोंड करून बोलत होता.


"गप्प बसा रे, मीरा खूप चांगली आहे."
मल्हार हे बोलत होता तेव्हा मीरा रूम बाहेरच उभी होती. तिने सगळ्यांसाठी चहा नाश्ता वरतीच आणला होता आणि तोच द्यायला ती आली होती. मल्हार जेव्हा हे बोलला तेव्हा तिला खूप छान वाटले.


"अहो, तुमच्यासाठी चहा नाश्ता आणला आहे."
मीरा बाहेरूनच दरवाजात उभी राहून बोलत होती.


"अरे वहिनी, आम्ही आलो असतो ना खाली. तुम्ही कशाला त्रास घेतला."
गणेशने तिच्या हातातून ट्रे घेतला.

"नाही, तुम्ही मस्त गप्पा मारा."
सगळ्यांना बघून मीरा बोलली.


"काही लागले तर सांगा, मी खालीच आहे."
मीरा मल्हारकडे बघून बोलली तसे त्याने हसून हो म्हणून मान डोलावली.


"ओये होय, हा हा हा.. क्या बात है. छान जुळतय की तुमचं. मला वाटलं तू अजूनही.."
गणेश बोलला तसे मल्हार लगेच शांत झाला.


"तुला वाटते तसे अजून तरी काही नाही, उगाच मनात काहीही आणू नको."
मल्हार बोलला तेव्हा त्याच्याकडे बघून दोघांनाही नवल वाटले.


"काय? अरे असा कसा तू? इतक्या दिवसात तुला काहीच वाटलं नाही. तू मनातून आधीचे विचार काढून टाक बरं आता."
गणेश पुन्हा समजावत बोलत होता.


"तू पुन्हा सुरू नको होऊ. पटकन आवरा आणि निघा."
मल्हार एकदम मुड बदलत बोलला.


"हे बरंय तुझं, आठवण आली की लगेच बोलवून घ्यायचं आणि आता लगेच निघा म्हणतोय."
दुर्गेश टोमणा मारत बोलला तसे मल्हारने त्याला बघून लूक दिला.


"बरं ठीक आहे. तुला नाही काही बोलत आम्ही. तुला वाटेल ते कर. निघतो आता आम्ही."
चहा नाश्ता संपवून दोघेही जायला निघाले.


"अरे, लगेच कुठे निघालात तुम्ही दोघे. वहिनी स्वयंपाकाला लागली."
आई बोलल्या तसे दोघेही नको नको म्हणाले.


"नाही नको आई, परत येऊ असच कधीतरी."
असे म्हणून दोघेही निघत होते इतक्यात मीरा बाहेर आली.

"भाऊजी, जेवण करून गेला असतात ना!"


"नाही नको, पण पुढच्या वेळी नक्की. काळजी घ्या आमच्या मल्हारची."
इतके बोलून दोघेही निघून गेले.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.