Login

नकळत सारे घडले - भाग ६६

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ६६

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


"ताई, मी काय म्हणतो.. मीराला दुसरे मुळ करायला पाठवते का? नाही म्हणजे आम्ही गावाकडे जाऊन येणार आहोत देवाला. तर म्हटले मीराचे ही जाऊन होईल आमच्या सोबतच."
तात्यांनी सकाळी सकाळी फोन केला होता कल्पना ताईंना.


"अच्छा, गावी तर मी पण गेले नाहीये खूप वर्ष झाले. तू जाऊन येतोस तेच खूप आहे."
कल्पना ताई पण गावची आठवण काढून बोलत होत्या.

"अरे मग तुम्ही पण या सोबत, सगळेच जाऊन येऊ."
तात्या लगेच सोबत यायला बोलले.

"नको अरे, घरात तसेही खूप कामं बाकी आहेत. बरं तू कधी येणार मग मीराला न्यायला? मी सांगून ठेवते तसे तिला. ती पण आवरून घेईन."
कल्पना ताई लगेच हो बोलल्या मीराला माहेरी जायला.


"आम्ही परवा गावी जायला निघणार आहे तर मग उद्या संध्याकाळी येतो तिला न्यायला. चालेल ना! नाहीतर भाऊजींना फोन करतो मी तसा."
तात्या बोलत होते.


"अरे हे काय इथेच आहेत ते पण.. तुला बोलायचे असेल तर देते मी त्यांना. त्यांचे पण तसे काही नाही. मी सांगते पाहिजे तर त्यांना आणि मल्हारला. तू वहिनींना सोबत घेऊन ये."
कल्पना ताई बोलल्या तेव्हा विलासरावांना पण लगेच समजले होते. त्यांनी पण लगेच होकार दर्शवला होता.


"मीरा, अग तुझे बाबा यायचं म्हणाताय तुला घेऊन जायला. म्हणजे तुझे दुसरे मुळ होऊन जाईल. गावी जाणार आहे म्हणत होते."
कल्पना ताई मीराला सांगत होत्या.

"हो, आई विचारत होती तसे मला, पण मला काही सांगता आले नाही."
मीरा अजूनही थोडी घाबरत होती बोलायला.


"अग मग सांगायचं ना मला तसे, मी काय नाही थोडीच बोलणार होते. तुझे माहेर म्हणजे माझेही माहेर आहेच की ते. माहेरी जायला परमिशन कसली त्यात. फक्त मल्हारला सांगत जा. आमचं तसं काही नाही."
कल्पना ताई तिला अगदी जवळ घेऊन सांगत होत्या.


"हो, मला सांगायचे होते तुला.. पण बोलू की नको असे वाटतं होते उगाच."
मीरा बोलायला लाजते की घाबरते हेच कळत नव्हते.

"हे बघ, मी सासू जरी असली तुझी तरी पाहिले आत्त्या आहे. आपण आधीसारख्याच आहोत, फक्त त्यात अजून एक नात्याचे नाव लागले. बाकी आहे तसेच राहायचे. लहान होतीस तेव्हा तर माझ्याकडे यायला किती हट्ट करायची. सारखं आत्याला फोन लावून दे म्हणायची."
कल्पना ताई मीराच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना हरवून गेल्या होत्या.


"हो, एकुलती एक आत्त्या. मी तर सगळ्यात पहिले आई म्हणायच्या आधी आत्त्याच तर म्हणायला शिकले होते. दिवसभर आत्या आत्या करत फिरायचे."
मीरा पण आता जरा बिनधास्त बोलत होती.


"बरं, आता उद्या तुला घ्यायला येणार आहे ते मल्हारला सांग. त्याच्याशी पण आधीसारखेच बोलत जा, उगाच घाबरत बसू नको."
कल्पना ताई मीराला अगदी लेकीसारखे समजावून सांगत होत्या.


"हो, आता वरतीच जात होते मी किचनमधले आवरून."
मीरा पाण्याची बाटली भरत बोलत होती.


"झाले ना आवरून, मग जा लवकर आता. उगाच उशिरापर्यंत काय करत असते तू?"
कल्पना ताई मीराला वरती बेडरूममध्ये पाठवत बोलल्या तशी मीरा खुदकन हसली आणि वरती पळाली.


वरती येऊन बघते तर मल्हार मीराच्या आधी येऊन बसला होता. हातात एक पुस्तक होते. उगाच वाचायचं नाटक सुरू होतं. मीराला ते समजले होते, पण ती खाली आत्यासोबत झालेले बोलणे आठवून हसत होती.


"ते मी.. मला उद्या बाबा घ्यायला येणार आहे."
मीराने बोलणे सुरू केले तसे त्याने तिच्याकडे बघितले सुद्धा नाही. खाली पुस्तकात बघूनच नुसते हम्म्म केले.


"मी जाऊ का?"
मीराने पुन्हा विचारले.


"अरे, त्यात विचारायचे काय? तुला माहेरी जाण्यासाठी परमिशन का घ्यायला पाहिजे."
मल्हार पण तिला तेच बोलत होता.


"नाही तसे नाही, पण तरीही मी विचारतेय."
मीरा अजूनही त्याच्याकडे बघून बोलत होती.


"मीरा, तुला अभ्यासाचे काही लागत असेल तर ते सुद्धा घेऊन ये. नोट्स वगैरे पाहिजे असतील किंवा कॉलेजमध्ये पण जाऊन ये. आता ही तुझी शेवटची परीक्षा असणार; त्यामुळे अजिबात लक्ष विचलित होऊ देऊ नको. अभ्यासावर फोकस कर."
मल्हार तिला दुसरेच समजून सांगत होता, पण ती बिचारी त्याच्याकडे खूप आशेने बघत होती.


"हो, आता गेल्यावर गावी जाणार आहे दोन दिवस मग तिकडून आल्यावर कॉलेजमध्ये चक्कर मारून येईन."
मीरा पण इतके बोलून शांत झाली.


'मला काय सांगायचे होते आणि हे काय बोलत बसले. नुसता अभ्यास अभ्यास.. ते सोडून पण बोलायला बरेच काही आहे, पण नाही. त्यांच्या मनात कधी येणार जे मला बोलायचे असते. निदान अभ्यास सोडून तरी बोलायला पाहिजे. मी रूममधले पडदे बदलले ते सुद्धा नोटीस केलं नसावं. कपाट नीट आवरून ठेवलं ते सुद्धा आवडले नसेल का? ह्यांना बोलत करायला नेमकं करू तरी काय मी?'
मीरा स्वतः शीच बोलत बोलत झोपी गेली.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.