Login

नकळत सारे घडले - भाग ६९

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ६९

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


"मिताली.. ती का गेली पळून? हे मला अजूनही समजले नाहीये. काही कमी होती माझ्यात? मी तिला हवं तसं वागत होतो. तिला फिरायला घेऊन जायचो, तिला ड्रेस घ्यायचा, साडी घ्यायची, कानातले, बांगड्या अगदी सगळं घेऊन द्यायचो. सगळीकडे शॉपिंगला घेऊन जायची. ती म्हणेल तिचं लग्नाची तारीख ठरवली होती. सगळं काही तिच्या म्हणण्यानुसार चाललं होतं. मग तरीही ती का गेली मला सोडून?"
मल्हार अगदी हायपर होऊन बोलत होता.


"अरे पळून गेली ती. तिचे प्रेम होते आधीच एका मुलावर. हे समजले होते ना आपल्याला लगेच, मग तरीही आणखी काय जाणून घ्यायचं आहे तुला? मीरा किती चांगली मुलगी आहे. ती आहे म्हणून.. नाहीतर दुसरी असती तर काय केलं असतं काय माहिती."
गणेश अजूनही मीराबद्दल खूप आपुलकीने बोलत होता.


"लग्नाला इतके दिवस झाले आणि तुम्ही साधे फोनवर सुद्धा बोलत नाही म्हणजे कमाल आहे. ती मिताली पळून गेली लग्नाच्या दिवशी तरी सुध्दा तुझ्या डोक्यातून ती जातच नाही म्हणजे किती मूर्खपणा म्हणावा हा."
दुर्गेश पण मध्ये मध्ये बोलत होता.


"मग काय करू? सारखा तोच तिचाच विचार डोक्यात यायचा; त्यामुळे माझी सतत चिडचिड व्हायची. उगाच रागाच्या भरात मीराला काही बोलून बसलो तर! म्हणून मी तिच्याशी काही बोलत नव्हतो. अंतर ठेवून राहत होतो."
मल्हार आता अगदी मोकळेपणाने बोलत होता. इतके दिवस मनात साठवून ठेवलेले हळूहळू बाहेर पडत होते.


"अरे तुझं आम्ही सगळं समजू शकतो, पण मीरा.. यात मीराची तरी काय चूक? तिच्याशी तर चांगले बोलत राहिले पाहिजे."
दुर्गेश सुद्धा तिच्या बाजूने बोलत होता.


मित्रांसोबत बोलता बोलता मल्हार मोकळा होत होता.
"पण ती का गेली असेल? तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते हे आधीच ठरले होते, मग माझ्यासोबत हे नाटक का केले? मी जेव्हा तिला भेटायला जायचो तेव्हा माझ्या बरोबर बाहेर फिरायला यायची. त्यावेळी पण तिच्या वागण्या बोलण्यावरून कधी असे जाणवले नाही. मी कधीच तिला दुखावलं नाही, तरीही ती माझ्याशी अशी वागली! बरं तिला कित्येकदा फोन करून विचारावे वाटले, पण माझा नंबर पण तिने ब्लॉक करून टाकला आहे." 
मल्हार फोनकडे बघून बोलत होता.


"अरे पण तिचा इतका विचार का करतोय तू? ती नाहीये आता तुझ्या आयुष्यात; त्यामुळे तिला पहिले डोक्यातून काढून टाक आणि मीराकडे लक्ष दे. ती आता तुझी बायको आहे. तिला काय हव नको ते बघ. तिची काळजी घे. हे बघ.. जे झालं ते विसरून जा आणि पुढच्या भविष्याचा विचार कर. मिताली तुझा भूतकाळ होती आणि आता मीरा तुझा वर्तमान आहे. हे स्वीकार कर. तेव्हाच तू शांत होशील. इतके दिवस ती काय विचार करत असणार, की मल्हार असा का वागतो माझ्याशी? तिच्याशी चार शब्द तरी नीट प्रेमाने बोलास का तू? काय वाटत असेल बिचारीला? ते काही नाही. इतके दिवस तू तुला पाहिजे तसा वागला, पण आता अजिबात नाही हा.. तिच्याशी बोल. नवरा आहे तू तिचा. तिला काय हवं नको ते तुला बघायला पाहिजे. बायको म्हणून तिचा स्वीकार कर."
गणेश खूप शांतपणे त्याला समजावून सांगत होता. मल्हार पण त्याच सगळं ऐकून घेत होता.


"पण तरीही मला कळलेच पाहिजे की मिताली माझ्यासोबत अशी का वागली?"
मल्हारची गाडी अजूनही तिथेच अडकली होती.


"बरं ठीक आहे. आम्ही तपास लावतो तिचा, पण तू आधी मीरा वहिनींना फोन केलास तरच!"
गणेश त्याच्याकडून कबूल करून घेतो.


मल्हार लगेच फोन हातात घेतो. फोनमध्ये मीराचा नंबर शोधतो. किती वेळ तो नुसताच नंबरकडे बघत बसतो. लावू की नको ह्या विचारात आणि लावला तरी काय बोलायचं? शेवटी गणेशकडे बघून तो हिंमत करून फोन लावतो.


"हा, हॅलो मीरा.."
मल्हार हळू आवाजात बोलतो.


"हा बोला ना! इतक्या रात्री फोन केला काही पाहिजे होते का?"
मीराला वाटले तिने त्याचे सामान लावले होते. एखादी वस्तू सापडत नसणार म्हणून फोन केला असावा.


"नाही, काही नाही. असच सहज फोन केला. जेवण झाले का?"
मल्हारला काय बोलावे तेच सुचत नव्हते.


"हो, झाले केव्हाच. इकडे लवकर झोपतात; त्यामुळे जेवण साडे सात आठपर्यंत होऊन जाते."
मीरा पण त्याने विचारले तितकेच उत्तर देत होती.


"अच्छा, मग आता तर बराच उशीर झाला. झोप तू."
इतके बोलून मल्हार गणेशकडे बघतो.


"हो, तुम्ही पण झोपून घ्या उशीर झाला आहे. गुड नाईट."
मीरा इतके बोलून फोन ठेवून देते. तिला खरं वाटतं नव्हते की मल्हारने तिला पहिल्यांदा फोन केला आणि ते ही फक्त जेवण झाले का हे विचारायला. ती खुश तर होतीच, पण तिला समजत नव्हते नेमकं काय झालं असावं.
'नक्कीच काहीतरी काम असावं, नाहीतर लग्न झाल्यानंतर त्यांनी आजपर्यंत मला कधी फोन केला नाही. मेसेज करून बघू का? पण उत्तर देतील का ते!'
मीरा स्वतः शीच बोलत होती आणि मनातल्या मनात खुश होतं होती. काही का असेना मल्हारकडून बोलायला तरी सुरुवात तरी झाली होती. मल्हारच्या विचारात मीराला आज छान झोप लागणार होती.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.