Login

नकळत सारे घडले - भाग ७०

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ७०

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीरासोबत फोनवर बोलून झाल्यावर मल्हार थोडा वेळ विचार करत होता. 'खरचं मीरा खूप साधी आहे. तिच्या सोबत आपण फार वाईट वागलो का?'
"झालं समाधान, बोललो तिच्याशी. झोपली होती बिचारी."
मल्हार त्यांना बघून बोलतो.


"अरे मग तुला हे माहिती पाहिजे ना! आम्हाला काय सांगतो. जरा बोलत जा तिच्याशी. याचा अर्थ तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. ती बिचारी तुला काय आवडतं त्याची सगळी माहिती मिनूकडून घेत असते आणि तेच करत असते. तुला जास्त मेकअप आवडत नाही म्हणून त्या रिसेप्शनच्या दिवशी तयार पण होत नव्हत्या लवकर."
गणेश त्याला एक एक सांगतो तेव्हा मल्हार त्याच्याकडे आश्चर्याने बघतो.


"तुला हे सुद्धा माहिती नसणार, मला मात्र मिनूने सांगितले. ती चांगली काळजी घेते."
गणेश बोलतच होता. तेव्हा त्याला आठवते. लग्नाच्या दिवशी मीरा अगदी साधी सिंपल होती.


"इतकचं नाही, त्यांनी तुझ्यासाठी घरातल्यांना सांगून ठेवले होते, की तुला जास्त दिखावा पण आवडत नाही; त्यामुळे साधेच रहा."


"पण तुला इतके सगळे कसे माहिती?"
मल्हार अजूनही शॉकमध्ये होता.


"हे काय सांगायचं थोडीच असतं, समजून घ्यायचं असतं. मीरा खरचं खुप साधी मुलगी आहे. तुझ्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे."
गणेश त्याला हाताला धरून सांगत होता.


"आता हे तुला मीरा तर बोलली नसेलच ना!"
मल्हार त्याला पुन्हा प्रश्न विचारतो.


"अरे मुलींच्या डोळ्यात बघितले तरी समजून जाते. तू एकदा तरी त्यांच्याकडे बघितले आहे का? त्यादिवशी आम्हाला वरती चहा आणून दिला तेव्हा तुझ्याकडे किती प्रेमाने बघून विचारत होत्या काही लागलं तर सांगा मी आहे म्हणून, यावरूनच समजून घे ना तू!"
गणेश त्याला पुन्हा आठवण करून देत होता.


"ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी नाहीत मल्हार, समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. तू फक्त एकदा मीरासोबत बोलून बघ. तिच्या डोळ्यात बघ, तुझ्याबद्दल किती प्रेम दिसेल. पहिल्या दिवसापासून आम्हाला दिसतंय हे, जाणवतंय त्यांच्या बोलण्यातून आणि तुला अजून कसे समजले नाही!"
गणेश खूप समजुतीने घेत होता.


"मल्हार, मुली खूप पटकन आपलंसं करतात. त्यांना फार वेळ लागत नाही. आता तू जास्त वाट नको बघायला लावू त्यांना. आधीच खूप वेळ घेतला आहे तू, आता आणखी नको. किमान हळूहळू बोलायला तरी सुरुवात कर."


"जे घडलंय ते सोडून दे, जे घडायचं आहे त्याकडे लक्ष दे."
दुर्गेश पण मधेच डायलॉग मारत बोलत होता.


"आता बोलायला ती समोर असली तर पाहिजे."
मल्हारला आता समजत होते.


"अरे फोन तर आहे ना तुझ्याकडे. रोज सकाळ संध्याकाळ फोन करायचा. दिवसभर काय काय केलं ते विचारत राहायचं."
गणेश त्याला छान सल्ले देत होता.


"हम्म्म, बरं ठीक आहे."
मल्हार उगाच नाटक करत बोलत होता.


"आता तुला हे समजावणे शेवटचे राहील. पुढे तुझे तुलाच बघावे लागणार. आम्ही नाही येणार सारखं सारखं तेच समजून सांगत बसायला. आणि आता जर तू सुधरला नाही, तर घरातले नंतर पण त्यांच्याआधी आम्हीच तुला कुटून काढू."
दुर्गेशने तर डायरेक्ट धमकीच दिली होती.


"साल्यांनो, तुम्ही माझे मित्र आहात की शत्रू? असं कोण समजून सांगत बरं धमकी देऊन?"
मल्हारला आता एकदम मोकळं झाल्यासारखे वाटतं होते. मित्रांशी बोलून तो अगदी फ्रेश झाला होता.


"बरं चला आता खाली, झोप लागली मला."
दुर्गेश आळस देत बोलला तेव्हा तिघे खाली गेले.


मीरा माहेरी गेल्यापासून खोलीत तसाच पसारा पडला होता. तिला जाऊन दोनच दिवस झाले होते, तरी मल्हारला तिचा भास होत होता. ती आता इथे असती तर दोन मिनिटांत ही खोली छान आवरून ठेवली असती. बरोबर आहे, व्यक्ती नसल्यावरच तिची खरी किंमत कळते.


"थांब, त्याबाजूने मी झोपणार!"
दुर्गेश झोपणार होता तिथे मल्हार आधीच जाऊन झोपला. का? तर तिथे मीरा झोपायची म्हणून.


"हम्म्म, इतक्या लवकर समजायला पण लागले बघ याला."
असे म्हणून गणेश त्याला चिडवू लागला.


"गप्प बसा रे, पण मला त्या मितालीबद्दल कळलेच पाहिजे. भर मांडवात नाचक्की केली तिने आमची. तिच्यामुळे किती त्रास झाला सगळ्यांना!"
मल्हार आता चिडून बोलत होता.


"डायरेक्ट फोन करून बोलून बघायचं का? विषयच संपवून टाकू तिचा."
दुर्गेश बोलला तसे सगळे पुन्हा उठून बसले.


"तिचा नंबर लागतं नाही. बहुतेक माझा नंबर ब्लॉक केला असणार तिने. तिला माहिती आहे मी फोन केल्याशिवाय राहणार नाही."
मल्हार पुन्हा दात ओठ खात बोलत होता.

"हे बघ, आता तिचा राग राग करून काही उपयोग नाही. तिला जे वागायचं ते तिने केलं, पण तू उगाच स्वतः ची चिडचिड करून नको घेऊ. याने तुलाच त्रास होईल."
गणेश फोनमध्ये काहीतरी बघत बोलत होता.


"मी माझ्या फोनवरून तिचा नंबर लावून बघतो."
असे म्हणून गणेश नंबर डायल करतो, पण फोन लागतच नाही.


"कदाचित तिने हा नंबरच बंद केला असणार; म्हणून हा फोन लागत नाहीये. हाच एक पर्याय होता, पण तो ही बंद झाला. अरे त्या गावात दुर्गेशचा कॉलेजचा मित्र राहत होता. त्याला काही माहिती आहे का म्हणून विचारायला फोन करायचा का?"
गणेश पुन्हा आठवून सांगू लागतो.


"हो, आपण त्याची मदत घेऊ शकतो. भाई, चांगला मित्र आहे तो आपला."
दुर्गेश लगेच त्या मित्राला फोन लावून बोलून घेतो. तो सगळी माहिती काढून देईल म्हणतो, पण त्याला उद्यापर्यंत वेळ पाहिजे.


"उद्या फोन करतो म्हणे तो आणि जे असेल ते सगळे सांगतो. आपल्याला फक्त उद्यापर्यंत वाट बघावी लागणार."
असे म्हणून दुर्गेश दोघांकडे बघतो.


"बरं ठीक आहे. झोपा आता. जास्त विचार नका करू."
मल्हार असे बोलून झोपतो.


"बघा, कोण सांगतय हे आपल्याला!"
असे म्हणून गणेश हसायला लागतो आणि त्याच्यासोबत दुर्गेश आणि मल्हार पण हसायला लागतात.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.