Login

नकळत सारे घडले - भाग ७३

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ७३


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


"आई, मीराला घ्यायला कधी जाणार आहेस?"
मल्हार अचानक आईला विचारतो तेव्हा आई खूप खुश होतात, पण त्यांच्या आधी मिनल जास्त आनंदी होते. काही का असेना दोघेही एकमेकांसोबत बोलले पाहिजे, छान आनंदात संसार झाला पाहिजे इतकेच पाहिजे होते सगळ्यांना.


"मीरालाच विचार की तू फोन करून, ती कधी येणार आहे ते."
मिनल मधेच बोलते.


"अरे ते सगळे गावी देवाला जाऊन कालच घरी आले असतील. अजून चार पाच दिवसांनी तिला घेऊन येऊ."
आई बोलल्या तसे मल्हार लगेच नाराज झाला. त्याचा पडलेला चेहरा बघून मिनल मात्र खूप हसत होती.


"तू म्हणत असशील तर आत्ता लगेच फोन करून सांगते मीराला आम्ही घ्यायला येतोय. बोल करू का फोन?"
मिनल फोन पुढे करत बोलत होती आणि मल्हार उगाच चिडत होता.


"आई, मला उद्या वेळ आहे आणि सुट्टी पण आहे. तू विचारून बघते का उद्याच."
मल्हार मिनलकडे लक्ष न देता सरळ आईला सांगतो.


"बरं, मी करते फोन थोड्यावेळाने सुनिता वहिनीला. काय म्हणतात ते बघू मग सांगते तुला तसे."
आई पण मुद्दाम त्याची परीक्षा बघत होत्या.


"हा हॅलो मीरा, अग दादा तुला उद्याच घ्यायला जायचं असं म्हणत आहे. तू तुझं आवरून ठेव. आता जास्त दिवस राहू द्यायचा नाही."
असे म्हणून मिनल मुद्दाम त्याला चिडवत होती.


"मिनू, तू थांब. बघतोच तुला."
मल्हार तिला टपली मारणार तोच मिनल पळून आईच्या मागे लपून जाते.


आई आणि मिनल खरचं खुप आनंदात होत्या. आईंनी तर लगेच देवापुढे साखर ठेवायला सांगितली. देवचं पावला असे म्हणून त्यांनी बसल्या जागी नमस्कार केला. वेळ बरोबर सगळे जुळवून आणते. त्यांना वाटले होते हे दोघे बोलायला इतका वेळ घेताय तर मग एकत्र कधी येतील? पण हा योग लवकरच येईल असे वाटू लागले होते.


तिकडे मीरा पण खुश होती. 'मल्हार असे विचारत होता म्हणजे नक्कीच त्यांना आठवण येत असणार. काल परवापासून मल्हार मेसेज पाठवत आहे म्हणजे नक्कीच त्यांनाही मनापासून वाटतं असणार मी तिकडे लवकर आली पाहिजे. मिनू म्हणाली ते कदाचित खरं ही असेल. ते आता मला जास्त दिवस नाही राहू देणार माहेरी.'
मीरा मनातल्या मनात आनंदी होतं होती. आनंदाच्या भरात तिने खरंच तिची बॅग भरून ठेवली होती. न जाणो कधी घ्यायला येतील तेव्हा तिची लगेच निघायची तयारी पाहिजे.


घरात एकूणच आनंदाचे वातावरण होते. कल्पना ताईंना तर भीती होती, की मल्हार पटकन तिला आपलंसं करेन की नाही याची, पण मीरा आहेच तशी गोड; त्यामूळे आता त्यांचा मनावरचा ताण जरा कमी झाला होता ते ही फक्त मल्हारच्या एका विचारण्याने.


"मल्हार, तुला काय झालं हसायला?"
वरती जाऊन मल्हार एकटाच हसत होता; त्यामूळे गणेश आणि दुर्गेशला काही समजलेच नाही.


"ह्याला काय येडं बीड लागलं की काय? अरे असा का हसतोय तू एकटाच, आम्हाला पण सांग की!"
असे म्हणून गणेश त्याला विचारू लागला.


"काही नाही, ते असच मी आईला मीरा कधी येणार ते विचारले तर दोघी पण खुश झाल्या. मिनू उगाच चिडवत होती."
मल्हार अजूनही हसून सांगत होता.


"अरे वाह! तू तर खूपच फास्ट निघालास."
आता दुर्गेश पण त्याला चिडवत होता.

"हम्म्म, चेहरा तर बघ कसा गुलाबी झालाय. किती लाजतोस."
गणेश आता आणखी बोलत होता तसे मल्हार त्यांना दोघांना गप्प बसा म्हणून सांगत होता.


"ते काही नाही, तू आत्ता फोन लाव मीरा वहिनींना आणि डायरेक्ट सांग, मी उद्या येतोय घ्यायला तयार रहा."
गणेश लगेच त्याचा फोन हातात घेतो.


"अरे थांब, मी करतो ना. तू नको."
असे म्हणून मल्हार त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतो.


"बरं ठीक आहे. आता गाडी बरोबर रुळावर आलेली दिसतेय."
असे म्हणून गणेश दुर्गेश खाली जातात.


"आई, पटकन जेवायला वाढा. खूप भूक लागलीय. हो आणि काहीतरी गोडाच पण पाहिजे बरं."
गणेश आईला सांगतो तसे दुर्गेश पण हो ला हो करत बोलत होता.


"गोड कशाला, स्वयंपाक झालेला आहे लगेच जेवून घ्या."
आई लगेच ताट घेत बोलत होत्या.


"नाही आम्ही थांबतो पाहिजे तर, पण किमान शिरा तरी पाहिजेच. आज आनंद तर सगळ्यांनाच झालाय ना!"
गणेश मिनलकडे बघून बोलतो तसे ती पण लगेच हो म्हणते.


"हो आई, गोड धोड तर झालेच पाहिजे. मल्हारने आज पहिल्यांदा मीराबद्दल आपुलकीने चौकशी केली. आजपासून खरी सुरुवात झाली."
मिनल बोलली तसे मल्हार आणखीनच लाजत होता.

"ए आई काय हे, मी काय आधी बोलत नव्हतो का मीरासोबत."
मल्हार लाजत लाजतच बोलत होता.


"ए माझ्या पोराला कोणीही काही बोलायचं नाही."
आईंनी मुद्दाम त्या तिघांना डोळे दाखवले आणि मल्हारला जवळ घेतले.


आज आईंनी छान जेवण बनवलं होतं. मस्त साजूक तूपातला गोडाचा शिरा पण बनवला; त्यामुळे जेवण जरा जास्तच झालं. सगळे गप्पा मारत हसत होते.


"चला आता आम्ही निघतो."
असे म्हणून गणेश त्याची सॅक उचलतो आणि जायला निघतो.


"अरे, लगेच कुठे निघाला तुम्ही दोघे?"
मल्हार त्या दोघांना विचारतो.


"भाई, आता आपलं इथलं काम झालेलं आहे."
असे म्हणून गणेश त्याला मिठी मारतो आणि सगळ्यांचा निरोप घेऊन घेतो. मल्हारची गाडी रुळावर आणायला खरंतर ह्या दोघांनी खूप मेहनत घेतलेली होती आणि ते काम यशस्वीपणे पार पाडले सुद्धा; त्यामुळे आता त्यांनी घरी जायचे ठरवले होते.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.