Login

नकळत सारे घडले - भाग ७४

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ७४


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


गणेश आणि दुर्गेश दुपारीच निघून गेले होते; त्यामुळे मल्हार बेडरूम मध्ये एकटाच होता. त्याला आता कंटाळा येत होता. खरचं मिनू म्हणाली तसे मीराला फोन करून बघुया या का? हा विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता मीराला फोन लावला.


तिकडे फोनवर मल्हारचे नाव बघताच मीरानेही पटकन फोन उचलला.

"हा हॅलो, बोला ना!"
मीरा फोन उचलताच बोलू लागते.

"मीरा, तुला उद्या घ्यायला आलो तर चालेल का? नाही म्हणजे मला उद्या सुट्टी आहे म्हणून.. बाकी काही नाही."
मल्हार उगाच सफाई देत बोलत होता हे तिच्या लक्षात आले.


"हो चालेल, पण मी अजून बॅग नाही भरली."
तिनेही क्षणाचा विलंब न करता हो चालेल म्हंटले तेव्हा कुठे मल्हारला बरे वाटले.


"बरं मी उद्या सकाळी लवकरच निघतो. तू आवरून बस."
मल्हार अगदी उतावीळ झाला होता.


"हो, आईला सांगते मी तसे तुम्ही येणार आहात घ्यायला."
मीरा त्याला सांगते तेव्हा त्याला आठवण होते की आई बोलली होती मामींसोबत.


"अग ह्या दोघींचं बोलणं झालच असणार. तू नको काळजी करू."
मल्हार उगाच काळजी नको म्हणून बोलत होता.


"बरं, तुम्ही जेवलात का? नाही आता रात्र झालीय ना म्हणून विचारले."
मीराला काय बोलावं तेच सुचत नव्हते.


"नाही, दुपारी जास्तच जेवण झाले होते; त्यामुळे आत्ता जास्त भूक नाहीये. तुझं जेवण तर झालंच असणार!" 
मल्हार बराच वेळ झाला बोलत होता; त्यामुळे ती जेवलीच असणार असा अंदाज बांधत बोलत होता.


"बरं, इकडे आमचे जेवण तर केव्हाच झाले. आता झोपायची तयारी सुरु आहे."
मीरा पण तिच्या खोलीत बसून बोलत होती; त्यामुळे इकडे तिकडे करत लाजत मुरडत बोलणे सुरू होते.


"चांगली सवय आहे. अजून बाकी काय?"
मल्हार उगाच तिला केव्हाचपासून आणि काय आणि काय म्हणून विचारत होता. बोलायला जास्त काही नव्हते, पण तरीही त्याला फोन ठेवावा असे वाटतं नव्हते. उशीर पण बराच झालेला, मीराला आता झोप यायला लागली होती, पण ती सुद्धा फोन ठेवत नव्हती. काही ना नाही बोलत राहायचे म्हणून फोन चालू होता.


"हॅलो मीरा, मीरा.. झोपली का?"
मल्हारने दोन तिनदा आवाज दिला पण समोरून काहीच आवाज नाही आला तेव्हा त्याने फोन ठेवला.


रात्र बरीच झालेली, तरीही मल्हारला अजिबात झोप येत नव्हती. मीराचा विचार करून कधी त्याला वाईट वाटायचे तर कधी स्वतः चाच राग येत होता. लग्न अचानक झाल्यामुळे पुरेसा वेळ दोघांनाही देता आला नव्हता, पण तरीही मीरा तयार झाली होती. मल्हार मात्र मिताली नावाच्या कोड्यामध्ये अडकून पडला होता. अशावेळी मित्रांनी साथ दिली. वेळेवर भानावर येताच त्याला अस्पष्ट असलेली मीरा आता स्पष्ट दिसू लागली होती. तिला काय वाटेल याचा विचार न करता तो आता तिला वेळ देऊ लागला होता. फोनवर गप्पा सुरू झाल्या होत्या.


नवीन नवीन लग्न जमल्यावर जे घडते ते लग्नानंतर सुर झाले होते. उशिरा का होईना, पण दोघांना आता याची जाणीव व्हायला लागली होती. हळूहळू प्रेम म्हणजे काय हे उमजायला लागले होते. नव्याने प्रेमाची परिभाषा समजत होती.


मीराचा विचार करत करत रात्री मल्हारचा कधी डोळा लागला त्याचे त्यालाच समजले नाही. उद्या तिला घ्यायला जायचे या विचारानेच त्याला हायसे वाटले होते. ती आल्यावर तिच्यासाठी काय काय करायचे हे आधीच ठरवून सुद्धा ठेवले होते. आता अजिबात वेळ न दवडता तो तिच्यासाठी सगळं काही करायला तयार झाला होता. मनावरचे मळभ दूर झाल्याने त्याला आता हलके वाटतं होते.


मीरा सुद्धा खूप सुखावली होती. तिला ह्या क्षणाची खूप जास्त वाट बघावी लागेल हे वाटतं होते, पण मल्हार इतक्या लवकर तिला समजून घेईल याचा विचार तिने केलाच नव्हता. जे घडले ते चांगल्यासाठीच होते. आता जास्त विचार करायचा नाही असे म्हणून ती सुद्धा गोड स्वप्नात झोपी गेली.


सकाळी लवकरच तयार होऊन मल्हार खाली आला. मीराला घ्यायला जायचे म्हणून मस्त कडक इस्त्रीचे कपडे, परफ्यूम मारून रेडी होता, पण बाकीचे मात्र त्यांचं त्यांचं घरातलं काम करत बसलेले. त्याला विशेष वाटले, त्याने लगेच आईला विचारले.


"अग आज आपल्याला जायचं आहे ना?"
मल्हार न राहवून विचारू लागला.


"कुठे?"
आई पण मुद्दाम बोलल्या.


"अग मीराला घ्यायला आणि कशाला."
मल्हार अजिबात वेळ न दवडता बोलून गेला.


"अच्छा, तिकडे होय. अरे तुझी सासू म्हणे दोन चार दिवसांनी या."
आई आत्ता मुद्दाम त्याची परीक्षा घेत होत्या.


"काय? पण मीरा तर तयार आहे. मी कालच बोललो तिला उद्या घ्यायला येतो म्हणून!"
मल्हारने सगळं घडाघडा बोलून टाकलं.


"अच्छा, म्हणजे तुमचं सगळं ठरवून झालं तर!"
मिनू पण बोलू लागली.


"म्हणजे काय? कालच तर बोलणं झालं ना आपलं सगळ्यांचं!"
मल्हार अजूनही आठवून बोलत होता.


"हो.. हो. आम्ही उगाच तुला चिडवत बोलत होतो.
आई लगेच त्याला सांगून मोकळी झाली.


"ए काय ग आई! अजून थोडा वेळ नाटक करायचं होतं ना! मजा येत होती."
मिनू आईला चिडून बोलत होती, पण इकडे मल्हार मात्र चांगलाच फुगून बसला होता.


"मिनू, तुला तर बघून घेईन मी. थांब तू!"
मल्हार तिला खुन्नस देत बोलला.


"मल्हार, आम्ही काही येत नाही; त्यामुळे तू एकटाच जा तिला घ्यायला."
विलासराव म्हणाले तसे आई पण त्याला जा म्हणून सांगत होत्या.

"हो, तू एकटाच जा ह्यावेळी. आम्ही कशाला कबाब मे हड्डी!"
मिनल बोलली तेव्हा बिचारा लाजतच होता. 


"मिनू, कशाला काहीही बोलत असते. तू जा मल्हार तिला आणायला. मी फोन करून केव्हाच कळवले आहे तसे तिकडे, लवकर जा आणि लवकर या. आम्ही वाट बघतोय."
आईने सांगितले तसे पडत्या फळाची आज्ञा मानून मल्हार मस्त तयार होऊन तिला घ्यायला निघतो.


आज वातावरण मस्त रोमँटिक वाटतं होते. गाडीमधल्या एफएमवर सुद्धा छान छान गाणी सुरू होती. एकंदरीतच मल्हार पूर्ण तयारीनिशी निघाला होता त्याच्या बायकोला घ्यायला. फोन मध्ये सुद्धा त्याने मीराचे नाव बायको म्हणून सेव्ह केले. व्हॉट्स ॲपचा फोटो बदलला आणि मीराने जो फोटो लावला आहे तोच त्यानेही लावला. हे सगळं करताना त्याला खूप आनंद होता होता.


तिकडे मीरा सकाळपासून मल्हारच्याच वाटेकडे डोळे लावून बसलेली. तो पोहोचताच ती खूप खुश झाली. आता काय करावे? काय बोलावे? तिला काहीच सुचत नव्हते.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.