नकळत सारे घडले - भाग ७५
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीराची लग्नाच्या पहिल्या रात्री जितकी धडधड वाढली नव्हती तितकी आज वाढली होती. मल्हार तिला न्यायला येणार होता; त्यामुळे ती खूप जास्त खुश होती.
आज मीराला बघून मल्हार भलताच खुश होता. सासरी पोहोचताच त्याचा जोरात पाहुणचार चालू होता. मामा मामी अजिबात कसलीच कसर सोडत नव्हते. एकुलता एक जावई म्हणून लाड सुरू होते. जावई होताच म्हणा तसा गुणाचा; त्यामुळे काही विचारायलाच नको. मीरा ते सगळं बघून खूप खुश होती. तिच्या चेहऱ्यावरचे गोड हसू बघून मल्हार सुद्धा सुखावत होता.
मल्हार मीरासोबत कधी एकांतात बोलणे होईल याची वाट बघत होता, पण ती एकटी काही त्याला सापडत नव्हती. आजूबाजला कोणी ना कोणी असायचेच.
गप्पा, गोष्टी आणि इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर मल्हारला आळस यायला लागला. जेवणं तर भरपूर झाले होते; त्यामुळे त्याला आता झोप येत होती, पण लगेच निघायचे सुद्धा होते. रात्र व्हायच्या आत घरी पोहोचले पाहिजे; म्हणून तो मीराकडे बघत होता. त्याने एक दोनदा इशाऱ्यात सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण तिला ते समजलेच नाही.
"मामा.. बरं आता येऊ का आम्ही? पुन्हा उशीर होईल."
मल्हार असे म्हणून उठून उभा राहिला.
"हो हो, ताईने फोन करून सांगितले होते तसे. तुम्ही जाता जाता मंदिरात दर्शन घेऊन मगच पुढे जा."
तात्यांनी त्यांना दोघांना सांगितले. मीराची ओटी भरली आणि मल्हारला छानसा ड्रेस दिला. तो नाही नाही म्हणत होता. दरवेळी हे करायची गरज नाही, पण तरीही जावयाचा मान म्हणून तात्यांनी आग्रहाने सगळे केले.
"अजिबात घाई करू नका आणि गाडी हळू चालवा. पोहोचले की पाहिले फोन करा."
सुनिता बाई मल्हारला काळजीने सांगत होत्या.
सुनिता बाई मल्हारला काळजीने सांगत होत्या.
"मीरा, तू सासरी खूप आनंदात राहशील ते आम्हाला माहिती आहेच, पण तरीही काळजी घे स्वतः ची आणि घरातल्या सगळ्यांची. एकुलती एक लाडकी सून आहेस; म्हणून आत्या तुझे लाड तर करणारच, पण तूही सर्वांचे मन जपून रहा. मल्हारची काळजी घे, कधी काही बोललेच तर खूप मनाला लावून नको घेत जाऊ. समजून घेत जा."
आई तिला बाजूला घेऊन खूप छान समजावून सांगत होती. मीराला हे सगळे पुन्हा पुभा ऐकावे लागत होते, पण तिला आईची काळजी दिसून येत होती; त्यामुळे ती फक्त हो हो म्हणत होती.
मीरा तिची बॅग घेऊन आली. सासरी निघताना लग्नाला कितीही दिवस झाले तरी डोळे गच्च भरून येतात. मीरा सुद्धा रडवेली झाली होती. मल्हार आणि मीरा दोघेही घरी जायला निघाले.
आज पहिल्यांदा मीरा आणि मल्हार गाडीत दोघे एकटेच होते. एफएम सुरू होता. त्यावर लागणारे प्रत्येक गाणे जणू त्या दोघांसाठीच वाजत होते. मल्हार अधूनमधून हळूच तिच्याकडे बघत होता, पण मीरा बिचारी घाबरत होती. मल्हार तिच्याकडे बघतोय, तिच्याशी बोलायला बघतोय ही फिलिंग तिच्यासाठी खूप खास होती.
आज दोघेही पहिल्यांदा सोबत जात होते आणि भाजीला नाही, तर खरचं मंदिरात आणि नंतर गार्डनमधे फिरायला. मंदिरात बरीच गर्दी होती, पण मल्हार तिला पुढे घेतो. तिला कोणाचा धक्का लागणार नाही असे तिच्या मागे उभे राहतो. तिचा हात धरुन तो गर्दीतून बाहेर आणतो. तिला खूप छान वाटत असते, की मल्हार तिची काळजी घेतोय. उशिरा का होईना, पण मल्हार तिच्याकडे हळूहळू ओढल्या जातोय ही जाणीव तिच्यासाठी खूप मोलाची होती. देवाचे दर्शन घेऊन ते पुन्हा घरी जायला निघतात. आता दोघांमध्ये थोडे थोडे बोलणे सुरू झाले होते. घरातल्यांची, मैत्रिणींची आणि कॉलेजची चौकशी करून झाली होती. मध्येच मल्हारने अचानक गाडी थांबवली. काय झाले म्हणून मीरा त्याच्याकडे बघू लागली.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
