नकळत सारे घडले - भाग ७८
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
पाठमोऱ्या उभ्या असलेल्या मीराला मल्हार तसेच मिठीत घेतो. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने मीरा मोहरुन जाते. थोडा वेळ ते दोघे तसेच उभे असतात. एकमेकांची ऊब अनुभवतात. खरंतर मल्हार तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरीही तिची होणारी धडधड थांबत नाही; म्हणून तो त्याची घट्ट असलेली मिठी सैल करतो.
तिला स्वतःकडे वळवून दोन्ही हाताला धरून बेडवर बसवतो. तिचा चेहरा ओंजळीत धरून तिला शांत करण्यासाठी बोलायला पाहतो, पण ती जास्तच घाबरलेली दिसते.
"मीरा, काही चुकले का माझे?"
मल्हारला वाटतं होते तो जरा जास्त घाई करत आहे; त्यामुळे तो थोडा गोंधळून जातो.
"हा.. नाही ते मी."
मीरा त्याच्याकडे बघत नाही म्हणते. त्याला वाटते ती कदाचित तो नाराज नको व्हायला म्हणून अडवत नसणार.
मीरा त्याच्याकडे बघत नाही म्हणते. त्याला वाटते ती कदाचित तो नाराज नको व्हायला म्हणून अडवत नसणार.
दोघेही खरतर आतून खूप घाबरलेले असतात, पण तरीही एकमेकांना जाणून घेण्यासाठी आसुसलेले होते. दोघांच्या प्रेमाला सुरुवात तर झालेली होती, पण एकमेकांना समजून घेताना कोणत्याही प्रकारची अडचण नको, गोंधळ नको म्हणून सावरून घेत होते.
"मीरा, तुला एक सांगायचे होते."
मल्हार तिला बोलत करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून ती नॉर्मल होईल.
"हम्म.. बोला ना!"
मीरा तशीच त्याला बघून विचारते. तिच्या चेहऱ्यावर लगेच प्रश्नचिन्ह उभे राहते.
"ते मी.. मितालीबद्दल सांगणार होतो.
मल्हार तिचे नाव घेताना चाचरत होता.
"तिचे काय?"
मीराला वाटले तिचे काय झाले असणार ह्या भीतीने ती विचारू लागते.
"तिचा नंबर मी माझ्या फोनमधून कायमसाठी डिलिट करून टाकला आहे; त्यामुळे तुला काळजी करण्याची काही गरज नाही."
मल्हार त्याच्या बाजूने सफाई देत बोलत होता.
"काय? पण मी तिच्याबद्दल काहीच विचारले नाही आणि तरीही तुम्ही मला हे सगळे का सांगताय! नाही म्हणजे मला माहिती नाही तिचे पुढे काय झाले? आणि काही जाणून सुद्धा घ्यायचे नाही. तुम्ही नाही सांगितले तरी काही हरकत नाही."
मीरा त्याला विश्वासात घेत बोलत होती.
"नाही, पण मला आपल्यात आता कोणीच नको आहे. जे काही असेल ते आधीच स्पष्ट झालेले बरे."
असे म्हणून मल्हार तिला तिच्या बद्दल सांगू लागतो.
"मीरा हे बघ, मी मान्य करतो की मितालीचा विचार करूनच मी तुझ्यापासून लांब राहिलो, पण आता मला माझी चूक समजली. ती तिला जसे पाहिजे तसे वागली. मला अंधारात ठेवले. तिचे आधीपासून एका मुलावर प्रेम होते आणि म्हणूनच त्यांनी दोघांनी पळून जायचे ठरवले. हे सगळे मला काहीच माहिती नव्हते. ती मला आवडत होती, पण जेव्हा हे मला समजले तेव्हापासून तिच्याबद्दल असणारे सगळे प्रेम एका क्षणात नाहीसे झाले. डोळ्यांवर चढलेली पट्टी उतरली."
मल्हार बोलत होता आणि मीरा त्याला शांतपणे ऐकून घेत होती. खरंतर तिला हे जाणून घ्यायची ईच्छा नव्हती, पण तरीही त्याच्यासाठी हे सगळं ऐकून घ्यायला तयार झालेली.
"तिचा नंबर जसा डिलिट केला, तसेच माझ्या डोक्यातून तिचे नाव तिचा विचार सुद्धा काढून टाकले आहे. हे सांगणं इतकं गरजेचं नाहीये, पण तरीही आपले नाते सुरू होण्याआधी आपण प्रामाणिक राहिलेलं बरं."
मल्हार खूप काळजीने बोलत होता. त्याला आता त्या दोघांमध्ये कोणीही नको होते. अगदी कालपर्यंत डोक्यात असलेली मिताली सुद्धा. त्याला आता त्यांच्या नात्यात कोणताच अडथळा आणि गैरसमज नको होता.
"मी एक सांगू, तुम्हाला वाटते तसे मी अजिबात विचार करत नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे, की तुम्ही मला त्रास होईल असे कधी वागणार नाही. मीच काय? अगदी आई पण मला हेच समजून सांगत होत्या. आजपर्यंत तुम्ही कधी कोणाचे मन दुखावले नाही, मग मी तर तुमची लग्नाची बायको."
असे म्हणून मीरा त्याला आधार देत होती. तिच्या ह्या शब्दांनी खरचं मल्हारला थोडा आधार वाटतं होता. त्याच्या मनात असलेली अपराधीपणाची भावना आता हळूहळू कमी होत चालली होती.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा