Login

नकळत सारे घडले - भाग ७९

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ७९

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मल्हार त्यांच्यात असलेले प्रेम प्रत्येक गोष्टीत दाखवून देत होता. मीरासाठी हे खूप अनपेक्षित होते, पण तरीही तिला हवेहवेसे वाटणारे क्षण आता लवकरच तिच्या ओंजळीत पडणार होते.


येणारा प्रत्येक दिवस दोघांची परीक्षा घेत होता. संयम सुटत चालला होता. आता मनाने नाही तर शरीराने सुद्धा एकत्र येण्याची ग्वाही दिली होती. आसुसलेले दोन्ही जीव केव्हाही एकत्र येतील.


इतक्या दिवसांचा दुरावा आता दोघांनाही सहन होत नव्हता. घरात काही ना काही कारणाने दोघेही एकमेकांना खुणावत होते. नजरेने एकमेकांबद्दल असलेले प्रेम दाखवून देत होते. वागण्या बोलण्यातून त्यांच्या प्रत्येक कृतीतून सगळ्यांनाच ते दिसत सुद्धा होते.


तिच्या कपड्यांसाठी त्याने कपाटात केलेली जागा तिला दिसली होती. त्याने स्वतः तिची बॅग रिकामी करून तिला दाखवून दिले होते, की आता तुझी जागा माझ्या कपाटातच नाही तर माझ्या मनात सुद्धा पक्की आहे. त्याच्या अशा छोट्या छोट्या कृतीतून तो त्याचे तिच्यावर असलेले प्रेम दाखवून देत होता. मीरा सुद्धा कसलीच कसर सोडत नव्हती.


मल्हार आता ऑफिसमधून लवकर येत होता. त्याला असे खुश बघून मिनल आणि आई दोघीही आनंदी होत्या.
"चला, आली एकदाची ह्यांची गाडी रुळावर. आता मला कसलीच काळजी नाही."
असे म्हणून आईंनी देवाला हात जोडले होते. मिनल सुद्धा दोघांना चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हती.

जेवणात आता कधी मल्हार तर कधी मीरा एकमेकांची आवड जपत होते. वाढताना सुद्धा मीरा त्याला अगदी आग्रह करून खाऊ घालत होती. यावरून कधी कधी आई आणि मीरा दोघी जणी सारख्या वाटू लागल्या होत्या. मिनल बिचारी त्या तिघांना बघून डोक्याला हात लावून बसत होती.


"मीरा, थांब ना माझ्यासोबत गप्पा मारत. इतक्या लवकर कुठे झोपायला चालली."
मीरा किचनमधले भराभर आवरून घेत होती. असे म्हणून मिनल जेव्हा चिडवायची तेव्हा तर मीराला जास्तच लाज वाटायची. ती उगाच हसून वरती पळून जात होती.

"मिनू, तू पण ना!"
असे म्हणून मीरा तिला टाळत वरती पळून जायची. जिथे मल्हार तिची वाट बघत बसलेला असायचा. तो सुद्धा त्याच्या कामाच्या गोष्टी आता घरात आणत नव्हता. शक्य होईल तितका वेळ फक्त आणि फक्त मीरासाठी राखून ठेवत होता.


दोन्ही बाजूंनी एकमेकांबद्दल प्रेम आणि ओढ जाणवली म्हणजे प्रेम अधिक बळकट होते. दोघांना आता अजिबात धीर धरवत नव्हता. कधी एकमेकांना वेळ देऊ, कधी जवळ येऊ असे वाटत होते.

मिनलला बोलून मीरा वरती अगदी पळत पळत वरती आली तेव्हा मल्हारवर जाऊन जोरात आदळली. त्याने तिला तसेच पकडून ठेवले.


"इतक्या घाईघाईत कुणाला पाहून पळत होती."
मल्हार अगदी तिच्या कानाशी येऊन बोलू लागला. त्याचे उष्ण श्वास तिच्या कानात घुमत होते.


मल्हार हळूच तिचे दोन्ही दंड पकडतो. त्याच्या अशा अचानक पकडल्याने ती जास्तच मोहरुन जाते. तिच्या डोळ्यात पाणी जमा होते. श्वास गरम होतात. ती हलकेच मल्हार म्हणते त्याने तो आणखी तिला घट्ट मिठीत घेतो. तिला जवळ घेत हलकेच कपाळाचे चुंबन घेतो.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.