नकळत- एक प्रेमकथा भाग 1

Ek Prem Kahani


"ओ, मिस तुमची बॉटल इथेच राहिली." नीरज ओरडून म्हणाला आणि आपल्या खिशातून
रुमाल काढून घाम टिपत तो तिथल्या मोकळ्या बेंचवर बसला.
आवाजासरशी शिखाने मागे वळून पाहिले. तशी नीरजने तिला तिची बॉटल उंचावून दाखवली.

"थँक्स." शिखाने दोन पावलं मागे येत आपली बॉटल घेतली आणि ती तशीच पुढे जाऊ लागली.

इतक्यात तिला भोवळ आली आणि ती झाडाचा आधार घेत तिथेच खाली बसली.

"ओ मिस, काय होतंय तुम्हाला?" नीरज पट्कन पुढे होत म्हणाला. त्याने बाटली तिच्या तोंडाला लावली आणि त्यातले थोडे पाणी हातावर घेऊन तिच्या तोंडावर शिंपडले. 
शिखाला काहीच समजत नव्हतं. काही मिनिटं ती तशीच स्तब्ध बसून राहिली. शिखा काहीच हालचाल करत नाही हे पाहून, नीरजने पुन्हा थोडे पाणी हातावर घेऊन तिच्या तोंडावर शिंपडले. 
मिटलेल्या डोळ्यातून तिची अस्वस्थता त्याला जाणवत होती. श्वास भरून घेण्यासाठी होणाऱ्या नाकपुड्यांची मंद हालचाल तो निरखत होता. चेहऱ्याचा मूळचा गोरा रंग जाऊन, तिचा चेहरा लाल पडला होता. 
काही वेळाने शिखाने हळूच डोळे उघडले, तसा नीरज मागे सरकला. "आज पहिल्यांदाच एका परक्या स्त्रीच्या इतक्या जवळ गेलो आपण!" त्याला कसंतरीच वाटलं.

"बरं वाटतंय आता?" शिखापासून काही अंतर लांब बसत नीरज म्हणाला.

"हो." शिखा गटागटा पाणी पिऊ लागली.
"पुन्हा एकदा थँक्स." शिखाने उठण्याचा प्रयत्न केला, पण तोल जाऊन ती परत खाली बसली. 

"रोज येता ना इथे मॉर्निंग वॉकला? मी पाहतो तुम्हाला. काल रात्री काही खाल्लं की नाही? अशी कशी चक्कर आली अचानक?" नीरजने पळत जाऊन कसलासा ज्यूस आणला. 
"हे पिऊन घ्या. बरं वाटेल." 

शिखाने ज्यूस पिऊन संपवला आणि पुन्हा ती त्याला थँक्स म्हणाली. "आता थँक्सचा जप करणार आहात का? चला, मी सोडतो तुम्हाला घरी." नीरजने शिखाला आधार देऊन उठवले. दोघेही जवळच्या गेटमधून बाहेर पडली. नीरजने पळत जाऊन आपली कार आणली आणि दार उघडून तो शिखासमोर उभा राहिला.

"अहो, बसा लवकर. किती वेळ विचार करणार आहात आता?" नीरज वैतागून म्हणाला.

शिखा गाडीत बसली, तशी नीरजने घाईघाईने गाडी सुरू केली. 
"माझ्या अंदाजाप्रमाणे तुमचे घर इथेच जवळपास असावे, हो ना? कारण तुम्ही रोज इथे चालत येता म्हणून म्हटलं. आता फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या घराचा पत्ता सांगायचा. बाकी तुम्ही सीट मागे करून निवांतपणे बसू शकता."
शिखाने कसाबसा आपल्या घराचा पत्ता सांगितला आणि ती सीट मागे करून निवांतपणे बसून राहिली.

पाच एक मिनिटांत शिखाचे घर आले. गाडी एका बंगल्यासमोर उभी करून नीरजने गेटवरची पाटी वाचली. "मनोहर मार्तंड. हेच घर ना?" शिखाने मान हलवली. तसा नीरज झटकन् खाली उतरला आणि तिला आधार देत गाडीतून खाली उतरवले.


"शिखा, काय झाले बेटा? काही अक्सिडेंट वगैरे?" शिखाचे वडील मनोहर पुढे होत म्हणाले.

"नाही. ट्रॅकवर धावताना त्यांना चक्कर आली. मी रोज पाहतो त्यांना बागेत..म्हणजे आमची तशी ओळख नाही. पण मीही मॉर्निंग वॉकला येतो रोज त्यामुळे एकमेकांना पाहून ओळख आहे तशी. म्हंटल घरी सोडून येऊ, म्हणून आलो. पण तसं काळजीचं काही कारण नाही." नीरजने घाईघाईने स्पष्टीकरण दिले. 

"ओ, मि.. जंटलमन, नो. प्रॉब्लेम. प्लीज बसा." मनोहरनी शिखाला खुर्चीत बसवले आणि एक खुर्ची नीरज समोर सरकवली.

इतक्यात एक पन्नाशीच्या आसपासची बाई बंगल्यातून धावत आली. "काय झालं?"

"काही नाही थोडीशी चक्कर आली. जा, तुम्ही दोन कप चहा आणि बिस्कीटं घेऊन या लगेच." 
मनोहरनी त्या बाईला आत पाठवले.

"बाय द वे, मी मनोहर मार्तंड. शिखाचे वडील.एका बँकेत काम करतो. आपली ओळख?"

"मी नीरज. आपली छोटीशी टेक्सटाइल कंपनी आहे." 

"अच्छा, आडनाव काय म्हणालात?" मनोहर सहजच म्हणाले.

"अग्निहोत्री..नीरज अग्निहोत्री."

"अरे..म्हणजे तुम्ही दिलीप अग्निहोत्री यांचे सुपुत्र का? ज्यांचा टेक्सटाइलचा मोठा बिझनेस आहे?" मनोहर उत्साहाने म्हणाले.

"हो."

"अहो, मग अशी काय ओळख करून देता? मस्त अटीट्यूडमध्ये ओळख करून द्या. मोठी माणसे तुम्ही. तुमची ओळख झाली, हेच आमचे भाग्य म्हणायचे." मनोहर हसत हसत म्हणाले.

इतक्यात चहा आला. 
"या शिखाच्या आई. अजून एक मोठा भाऊ आहे तिला. त्याचे नुकतेच लग्न झाले. तो सध्या आपल्या बायकोला घेऊन फिरायला गेला आहे." मनोहरनी सर्वांची ओळख करून दिली.

"..आणि थँक्स बरं, माझ्या मुलीची मदत
केल्याबद्दल!" मनोहरनी नीरजचे आभार मानले.

"यांची थँक्स म्हणण्याची सवय बहुतेक खानदानी दिसते." नीरज मनातल्या मनात म्हणाला.
"सर, सारखे आभार नका मानू. तुमच्या मुलीने ते मगाशीच मानले आहेत. मला लाजल्यासारखं होतं मग." नीरजच्या या वाक्यावर मनोहर दिलखुलास हसले.

आता शिखाला बरीच हुशारी आली होती. चहा पिऊन सर्वांचा निरोप घेऊन नीरज तिथून निघाला.

"मोठी उमदी पर्सनलिटी आहे याची. अगदी आपल्या बापासारखीच." मनोहर पाठमोऱ्या नीरजला जाईपर्यंत न्याहाळत राहिले.

क्रमशः


🎭 Series Post

View all