नकळत्या वाटेवर भाग १

स्मार्ट आईचं स्मार्ट कार्ट
नकळत्या वाटेवर
भाग १

"खातापिता, उठता बसता.... मोबाईल मोबाईल मोबाईल, वेड लावलं या मोबाईलने पोरांना. बघितलं कसा उड्या मारून मारून, खेळतोय" सकाळच्या घाईत, मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या कर्ट्ट्याला, सीमा हतबल होऊन बोलत होती.

भिरभिरती नजर आणि हातांची बोटं मोबाइलच्या स्क्रीनवर घुटमळत, "यार.. यार...... भाई.. भाई.... ! आSSबे यार ...!" बडबडत, उत्स्फूर्तपणे गेम खेळण्यात राजस रमला होता.

पलीकडून खेळणाऱ्या, पार्टनरवर कधी ओरडत तर कधी हसून हसून गेममध्ये बाजी मारतोय म्हणून खूश हि होत होता.

"तुलाच हौस होती, स्मार्ट आई बनायची. घे आता! स्मार्ट आईचं... स्मार्ट कार्ट" विनयने सीमावरच डाव उलटवला.

"पर्याय होता का काही?"
"कोव्हिड काळात, ऑनलाईन क्लासेससाठी मोबाईल घेतला. नसता घेतला तर, क्लास कसे केले असते? हल्ली सारं जग मोबाईलच्या तालावर नाचतेय. तुमचं बर, झाल्या गेल्या गोष्टीचं खापर माझ्या डोक्यावर." सीमा करदावली.

"जेवढ्यास तेवढं ठेवलं असतसं, क्लास झाल्यानंतर मोबाईल काढून घेतला असतास. थोडी शिस्तीत वागली असतीस.. तरी बजावत होतो. तुलाच पुळका तूझ्या एकुलत्या एका मुलाचा."

"कुठे बाहेर जाता येत नाही. तेवढीच करमवणुक म्हणून त्याच्या मर्जीने वागलीस. अवाजवी लाड पूरवलेस. नेहमी पोटाशी घालत आलीस.

उलट तूच, फेस बुक, इंस्टा, रील्स वगैरे खूळ भरून घेतलं स्वतःच्या डोक्यात."

"हा कोव्हिड गेला पण.. मोबाइलच वेड मात्र मागे सोडून गेला." विनय ची बडबड सुरू होती.

"दहावीच्या परीक्षेत काय दिवे लावणार, कुणास ठावूक? पुढलं वर्ष बारावीचं. महागड्या फिस भरा. हाडाची काड करा. दिवसदिवसभर राबा आणि घरी आमचे बाळराजे सोफ्यावर उताणे पडून गेम खेळतायत." विनयच्या बोलण्याकडे राजसच कसं म्हणून लक्ष नव्हतं.

"ऐकलंस का काही? अंथरुणातून उठला आणि गेम खेळायला बसलास. ब्रश वगैरे कोण करेन? अंथरूण ही तसच अस्ताव्यस्त पडलंय."
"उठ जा!! तुझी काम आटप पहिले." राजसच्या हाताला जोरात झटका देत, विनयने मोबाईल हिसकावून घेतला.

राजसची तंद्री भंगली तसा तो चिडला. "काय हो बाबा! मला करायला काहीच नाही? बोर होतो म्हणून खेळतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम. शाळा, क्लासेस सुरू झाले की, वेळ मिळणार आहे का मला खेळायला?" राजसने आपली बाजू मांडली.

विनय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने सरळ मोबाईल आपल्या ऑफीसच्या बॅगमध्ये टाकला.

"काय कटकट आहे यार तुमची. चांगला स्कोर बनत होता. जिंकत होतो मी. आता स्कोअर मागे जाईल माझा."

"बाबा,मोबाईल द्या ना प्लीज. मित्र वाट बघत असतील माझे" राजस गयावया करत बोलला.

"मित्र, वाट बघत असतील म्हणतोस ना! जा भेटून ये त्यांना. बाहेर जा, प्रत्यक्षात भेटा, मैदानी खेळ खेळा. कोणी अडवलयं."

"तू जसा तुझे मित्र ही तसेच, एका माळेचे मणी." विनयने, पेपरला झटका देत... पेपर वाचायला बसला.

राजसने टिव्हीचा रिमोट शोधायला सुरुवात केली. रिमोटवरच्या बटना तो रागाने जोरजोरात दाबायला लागला.

"डोळ्यांची ही दोन बटणं आणि हातांची बोट.. आराम दे जरासा. निर्लज्ज कुठला!" राजसला ऐकू जाईल अशा सुरात विनय पुटपुटला.

"काय करू? काय बघू?"

"टीव्ही वर ही काहीच नाही. वायफाय घ्या म्हटलं तर ते ही नाही. यू ट्युबवर किती काय काय असतं इन्फर्मटीव्ह.
माझे सगळे मित्र गेम खेळत बसले असतील आणि तुम्ही माझ्याकडून मोबाईल काढून घेतला. मीच नकोसा झालोय तुम्हाला." राजस सैरभैर झाला होता.

"तुम्ही बाप लेक म्हणजे.. कहर आहात कहर!" दोघे ही सारखेच.. अरे गप्प बसा रे दोघांतून एक तरी.. सीमा शांतपणे बोलली.

"आणि तू.... चिडू नको हा राजस, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. चांगल वाईट कळण्या इतपत मोठा झालायस तू आता.
दहावीची परीक्षा संपली तेव्हापासून बघतेय, क्लासवरून आलास की मोबाईल घेऊन बसतोस. अभ्यास, होमवर्क वगैरे तर तूझ्या नावाला ही नसतो."

"अभ्यास म्हटल की, पंधरा, वीस मिनिटात अभ्यास उरकून, पुस्तक बंद... दिवस दिवसभर मोबाईलवर गेम खेळतोस."

"बाळा, चांगला अभ्यास करशील तर चांगले मार्क्स मिळतील. पुढे चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल. त्यासाठी तर एवढे महागडे क्लासेस लावलेत ना आम्ही तुला." सीमा पोटतिडकिने बोलत होती.

"क्लासेसला सुट्ट्या आहेत. मी सांगितले का तुम्हाला, महागडे क्लासेस लावायला. मला शब्दाने तरी, विचारलं का तुम्ही, तुला काय हवंय ते? इंजिनिअरिंगमध्ये मला इंटरेस्टच नाही. त्यापेक्षा, एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल किंवा आय पॅड घेऊन द्या. यू ट्यूबर व्हायचंय मला." राजस मतावर ठाम असल्यासारखं बोलत होता. क्षणभर, सीमा आणि विनय ला राजसची भीतीच वाटली.

"यू ट्यूबर व्हायचंय म्हणे... दुसऱ्यांच्या भरवशावर पैसा, त्याला काय अर्थ आहे. मेहनत करा आणि पैसा कमवा." विनय पुटपुटला.

"बोर होतंय. करायला काहीच नाही. हा पेपर वाच. जगात काय चालू आहे ते माहिती होईल. चालू घडामोडी, जनरल नॉलेज गरजेचं असतं. न्यूजपेपरच पहिलं पान, सीमाने राजस समोर सरकवलं.

"दे मोबाईल, डिजिटल पेपर वाचतो," राजस बरळला.

"गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता." सीमाने हळूहळू, पेपरच एक एक पान पालटायला सुरुवात केली.

"ऑ.... अरे बापरे हे काय?" कुठलीशी बातमी वाचून विनय सुन्न झाला होता. ताडकन उठला आणि त्याने लगेच मित्राला फोन लावला.

"अवघड आहे सगळं!" फोनवर कुठल्याशा गंभीर विषयावर चर्चा मात्र सुरू होती. चेहऱ्यावर गांभीर्य झळकत होतं.

पेपरमधल्या त्या बातमीवर सीमाची हि नजर खिळली.

"वाचलं का तुम्ही, काय भयंकर आहे, बापरे." न्यूज पेपर मधली बातमी वाचून ती हि स्तब्ध झाली होती.

"हो वाचलं!! वाचावं ऐकावं ते नवलच.......!"
विनय ने ही दुजोरा दिला.

न्यूज पेपरमध्ये सीमा आणि विनयने काय वाचलं? की दोघे ही अस्वस्थ झाले होते.
जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा.
धन्यवाद.

🎭 Series Post

View all