नकळत्या वाटेवर भाग २

जिथे कुठे जातील पोरांच्या हाती दिसतील मोबाईल
नकळत्या वाटेवर
भाग 2...

"पेपर वाच म्हणायची हि सोय राहिली नाही हो हल्ली.
मोबाईलमध्ये गेम खेळण्यावरून आई रागावली आणि पंधरा वर्षाच्या मुलाने चक्क गळफास लावून आत्महत्या करावी." किती विचित्र आणि भयंकर आहे हे."

"केवढा हा टोकाचा निर्णय"

"मिळालेल्या सुंदर आयुष्यापेक्षा मोबाईल महत्वाचा वाटत असेल का मुलांना. जीवन संपवून मिळाला का मोबाईल? का मुलं सारासार विचार करत नसतील?"

"काय वाटलं असेल त्या आईवडिलांना? काय परीस्थिती झाली असेल त्या आईवडिलांची, बापरे!!" विचार ही करवत नाही. सीमाच्या डोक्यात विचारांचं चक्र भिर्भिरायला लागलं.

"माझ्या, ऑफिसमधल्या एका कलीग मित्राची भाची" "आईवडील मोबाईल देत नाहीत. सतत अभ्यासाचा तगादा लावतात म्हणून, घर सोडून निघून गेली." आठ दिवस झाले, पत्ता नाही." विनय ने सांगितलं.

"असो, जास्ती विचार नको करू? ऐकायचं, वाचायचं आणि सोडून द्यायचं. यावरून चर्चा तर मुळीच नको?" पेपरमधलं ते पान काढून त्याने हळुच पेपरच्या रद्दीत टाकलं. पटापटा आवरून, विनय ऑफिसमध्ये निघून गेला.

मुलांसोबत कसं वागावं, नाजूक विषय कसे हाताळावे. विचारातच दिवस गेला होता.

विनय ऑफिसमधून घरी परतला. आल्या आल्या राजसने पहिले बाबांकडून मोबाईल काढून घेतला.

उगाच वाद न घालता, विनयने मुकाट्याने राजसला मोबाईल दिला.

मोबाइल मिळाल्या लगेच, त्याने गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळताना सोडलेले मित्र, अजून हि गेममध्ये रमले होते. या गोष्टीचं विनयला विशेष आश्चर्य वाटलं

"जिथे कुठे जातील'
पोरांच्या हाती दिसतील मोबाईल.'

'आपल्याच घरात नाही. जगात हेच सुरू आहे.
"टेक्नॉलॉजीच्या जगात जन्मलेली ही पिढी.... एकदम बेदरकार, बेजबाबदार!' तो मिश्किल हसला.

"सुट्ट्या आहेत तोवर, मग बंदच करते मोबाईल."

"ना रहेगा बास ना बजेंगी बासुरी" सीमा पुटपुटली.

ट्रिंग.. ट्रिंग..
विनयच्या मोबाइल ची रिंग वाजली.

"हॅलो!! हॅलो विनू... बाबा बोलतो."

"हा बाबा, नमस्कार!" विनयने उत्तर दिलं..

"अरे, गावदेवी ची यात्रा आहे. येणार आहेस ना!"

"दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा नव्हती. मागचं वर्ष राजसचं दहावीच वर्ष, म्हणून आला नाहीस. यावर्षी जमलं तर येऊन जा पुढच्या वर्षी पुन्हा त्याची बारावी, तुम्हाला जमणारच नाही यायला." बाबांनी गावी येण्याचा आग्रह केला.

शक्य झालं तर शनिवारी सकाळी निघू. दोन दिवस शिवाय सुट्ट्या टाकतो. विनयने वडिलांना आणि सीमाला ही सांगितलं.

"शिकलो आणि नोकरीमुळे शहरात आलो नाहीतर गावीच शेतीत राबत राहावं लागलं असतं. मग समजलं असतं तूझ्या या कार्टयाला "डाळ आट्याचा भाव." उताणा पडलेल्या राजसकडे बघून विनयच्या डोक्यात तिडीक गेली होती. सकाळची बातमी वाचल्यापासून, रागावर नियंत्रण ठेवण्याचा, तो पुरेपूर प्रयत्न करत होता.

"गावी जायचयं, यात्रेला" विनयने राजसला सांगितलं.

"यार बाबा, गावात नेट नसतं. ओSSयोयो ला असतं, आपण घ्यायचं का? राजसने उपाय सुचवला.

विनयने, स्पष्टच "नाही" म्हणून सांगितलं.

"गावात, आबा मला एकट्याला मनसोक्त फिरू देत नाहीत."

"जुन्या गावाकडे, चिंचेच्या झाडावर चेटकीण आहे म्हणून धाक भरवतात"

"पोहायला गेलो तर, मनसोक्त पोहू देत नाहीत. हे नको ते नको, इकडे नको.. तिकडे नको. सूचनाच सूचना.. अजूनहि मी लहान असल्यासारखे वागतात माझ्याशी." राजस चिडला होता.

"आम्ही छोटे होतो तेव्हा, गावातल्या काही लोकांच्या शेत्या गेल्या तलावात. त्यात आमच्या वडिलांची शेती गेली. खोल खोल मोठमोठ्या विहिरी आहेत तलावात. त्यामुळे, आबा नाही म्हणतात. तुलाच काय? आम्हाला ही तिकडे पोहायला जावू देत नाहीत."

"शेती तलावात गेली म्हणून मला सरकारी नोकरी मिळाली. नाही तर आज शेतात राबराब राबवं लागलं असतं."

"का कुणास ठावूक? दादासाठी मला नेहमी वाईट वाटतं. माझी सरकारी नोकरी त्याला मिळूच शकत होती. मोठा होता तो. त्याचाच हक्क होता, खरं तर या नोकरीवर. पण बाबांच्या इच्छेचा मान त्याने हि राखला. पूर्वी वहिनी कटकट करायची पण नंतर झाली शांत." खऱ्या वास्तविकतेच दर्शन विनयच्या बोलण्यातून होत होतं.

"बाबा, गावाला टेकडीवर गुफा आहे. तिकडे जायचं नाही, सक्त ताकीद असते. तिकडे का कुणीच जात नाही? खरंच बंड्याच, भूत आहे का तिकडे?" राजसने शंका बोलून दाखवली.

"तो बंड्या, शहरात आला होता. अचानक लॉकडाऊन लागलं. तिकडे गावकऱ्यांनी त्याला, तू शहरातून कोरोना घेऊन आलास, म्हणून गावात येऊच दिलं नाही. टेकडीवरच्या गुहेमध्ये तो अनेक दिवस राहिला. थंडी पावसाचे दिवस. खायला प्यायला काही मिळालं नाही आणि एक दिवस मेला बिच्चारा. एकुलत्या एका मुलाच्या जाण्याने त्याचे आईवडील खचले. धक्क्याने ते हि मेले. संपूर्ण कुटुंबाचा असा वेदनादायी दुःखद अंत. शेतीचा छोटासा तुकडा होता नावावर, कुटुंबातले झगडतात आहेत त्या तुकड्या साठी. विनयने हळहळ व्यक्त केली.

"चार दिवस, मला गेम खेळायला मिळणार नाही. स्कोअर खूप खाली निघून जाईल. माझे मित्र पुढे निघून जातील." खूप काही हातातून निसटून जात असल्यासारखं, राजस बोलत होता.

"तू असाच राहिलास राजस, तर तुझे मित्र खरंच पुढे निघून जातील. काळजी वाटतेय रे तुझी. तुलाच कसं उमगत नाही रे बाळ," सीमाच्या शब्दात काळजी ओथंबून वाहत होती.

"विक एंडला मी गावाला जातोय," राजसने मित्रांना कॉल करून सांगितलं.

प्रथमेश, राजसचा जिगरी दोस्त. प्रथमेशचे बाबा दीपक आणि विनय एकाच ऑफिसमध्ये त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री होती.

दोघेही मुलांच्या, मोबाईलच्या वेडापायी परेशान होते. लंच टाईममध्ये दोघांच्या बोलण्याचा, विषय बऱ्याच वेळा हाच असायचा.

"विनय तू सुट्ट्या टाकल्यास".. दीपकने विचारलं.

"हो गावदेवीची यात्रा आहे. गावी जातोय." विनयने सांगितलं.

"या वर्षी आईच्या दुख्ण्याखूपण्यामुळे कुठे जाताच आलं नाही. म्हणून ही प्रथमेश चिडचिड करत असावा कदाचित. घेऊन जा आमच्या प्रथमेशला तूझ्या बरोबर. वातावरणात बदल होईल. निदान चार दिवस मोबाईल पासून लांब राहिलं. शक्य असेल तर घेऊन च जा." दीपकने आग्रहाने म्हटलं.

राजस आणि प्रथमेश एकाच वर्गात. चांगले मित्र तर होतेच शिवाय गेम पार्टनर हि होते. प्रथमेश येणार कळताच, राजस च्या गालावर खळी खुलली.

ग्रुपवर, राजस आणि प्रथमेशच्या गप्पा सुरू झाल्या. वर्गातले, हिमांशू आणि करण सुद्धा राजसच्या गावी जाण्यासाठी हौसले.

राजस, प्रथमेश, हिमांशू आणि करण.. चौकोनाच्या चार बाजुंसारखे होते. नर्सरी पासूनचे मित्र. सोबत सोबत मोठे झाले. समर कॅम्प, शाळेच्या ट्रीपला सोबतच असायचे. चौघांचे परेंट्स ही खूप चांगले ओळखत होते एकमेकांना.

हिमांशू आणि करणच्या वडिलांनी, फोन करून खात्री करून घेतली. एकमेकांना चांगले ओळखत असल्याने काळजीच नव्हती. 'बारावी नंतर, नशिब कुणास ठावूक, कुठे घेऊन जातं, सर्वांचे मार्ग वेगळे होतील.' विचाराने विनय हि हळवा झाला.

गावी मज्जा मस्ती करण्यावरून, चौघांच्या गप्पा रंगल्या. स्पोर्ट्स शूज, चप्पल घ्या. घालायला हलके आणि साधे कपडे घ्या. एकमेकांना सुचवलं जात होतं.

"आशूदादा असेल का हो बाबा." राजसने विचारलं

"आशू दादा असला की, आबा माझ्यावर जास्ती लक्ष ठेवून नसतात. दादा असेल तर, माझ्या मित्रांना तर मज्जा येईल." राजसच्या अंगात उत्साह संचारला होता.

चिंचेच्या झाडाखाली का नसेल जावू देत आबा...
विहिरीत असलेल्या बावडीच असेल का काही रहस्य.
टेकडीवर असेल का बंड्याचे भूत.
जाणून घेण्यासाठी, कथेचा पुढचा भाग नक्की वाचा.
धन्यवाद

🎭 Series Post

View all