नकळत्या वाटेवर भाग 3

वातावरणातला तजेला जाणवला आणि अंगावर शहारा आला
नकळत्या वाटेवर
भाग 3...

शनिवार दिवस उजाडला.

भल्या सकाळी हिमांशू, प्रथमेश आणि करण आपल्या वडिलांसोबत राजसच्या घरी पोहचले.

"अनोळखी ठिकाणी जाताय, उगाच इकडे तिकडे भटकायचं नाही. काका काकूंच ऐकायचं. जास्ती मस्ती करायची नाही. हट्ट करायचा नाही." सूचनांचा भडिमार एकदमच सर्वांनी केला.

दुसऱ्यांच्या मुलांना जबाबदारीवर घेऊन जाणं सोप्प नाही. ऐकणार असालं, तरच या रे बाबांनो. विनयने स्पष्टच बजावलं.

"लहान राहिलीत का आता मुलं. काय चांगलं? काय वाईट? त्यांच त्यांनाच कळलं पाहिजे. मी तर म्हणतो, रिझल्ट लागेस्तोर गावालाचं ठेवा पोरांना. इकडे सगळं हिरवं हिरवं दिसत म्हणून सुचतं सगळं. एखाद दिवशी, शेतात घेऊन जा. दाण्या दाण्यासाठी, शेतकऱ्याची ढोर मेहनत कळेल. त्याच्या घामाची किंमत हि कळू द्या जरा यांना." करणचे बाबा बोलले.

चौघांनी, आपापल्या बॅगा कारमध्ये ठेवल्या. टाटा बाय बाय म्हणत, उत्साहात सर्वांचा निरोप घेतला..

कार हायवेला लागली तशी कारने सुसाट वेग धरला. सोबत आणलेले चिप्स कुरकुरे खातखात मुलांचा प्रवास मजेत सुरू होता. स्पीकर फोनवर,अरिजीत सिंगची सुमधुर गाणी तर दुसरीकडे मुलांच्या गप्पांना उधाण आलं होतं.

हायवेपासून आत गावाकडे कार वळली. उंचच उंच दुतर्फा झाडांमधून प्रवास, विलोभनीय वाटत होता. कारच्या खिडक्या खुल्या केल्या आणि गार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून गेली. वातावरणातला तजेला क्षणात जाणवला आणि एक शहारा आला अंगावर. राजस जोरात ओरडला.. "बाबा! टेकडीवर बंड्या बंड्या!"

"गप्प रे.. काही काय?" विनय राजसवर ओरडला.

"कोण हा बंड्या".. मित्रांनी विचारलं.

"कुणी नाही... कुणी नाही!!" राजस गप्प बसला.

"नाहक गेला बिचारा, लोकांनी जरा समजुतीने घेतलं असतं तर असता आज. चांगला होता स्वभावाने." सीमा विनयशी बोलत होती.

"मुलांनो, या गावात माझं बालपण गेलं. गावात तेव्हा ना रस्ते होते, ना कोणत्या सुखसोयी होत्या. साध्या गोष्टींसाठी झगडावं लागत होतं. पावसाळ्यात परीस्थिती फारच वाईट असायची. शाळेत जाताना, पाय गुडघ्यापर्यंत मातीत रुतून बसायचे. अशा परिस्थितीत शाळा शिकावी लागली."

"बापरे, काका असे कसे राहायचात तुम्ही. आश्चर्यचकित होऊन मुलांनी विचारलं.

"गावात सातवीपर्यंत शाळा. नंतर आठवीपासून पाच सहा किलोमीटर अंतरावर, दुसऱ्या गावी जावं लागतं होतं. शाळा म्हणजे रोज पाच सहा किलोमीटरची पायपीट असायची.
ज्यांना शिकायची मनापासुन आवड हिरी ते शिकत बाकी मुलं बारा पंधरा वर्षाचे झाले की,आईवडीलांच्या मागे मोलमजुरी करायला जात. शेतात राबत." विनयच बोलणं सगळे मन लावून ऐकत होते.

"किती मस्त... मुलांना, शाळेची जबरदस्ती नाही. चांगले मार्क्स मिळालेच पाहिजे अपेक्षा नाही. अभ्यासाचा आग्रह नाही. हाऊ लकी दे आर." चौघांची खुसुरपुसुर चालू होती.

मुलांच्या गोष्टी ऐकून, हसावं की रडावं तशीच परीस्थिती झाली होती. पण उगाच डोज पाजण्यात अर्थ नाही म्हणून दोघेही गप्प बसले.

मागच्या सीटवर दाटीवाटीने बसलेल्या, चौघांना पाय मोकळे करायचे म्हणून विनयने रस्त्यात कार थांबवली.

करंगळीला उंच उडवत!" हिमांशू झाडी आड गेला. चौघे ही, इतरत्र.... इकडे तिकडे जावून मोकळे होऊन आले.

"यार ही टेकडी, किती मस्त आहे. ट्रेकिंगसाठी जावू या का"... प्रथमेशने इच्छा व्यक्त केली.

"गावं चारही बाजूंनी, टेकड्यांनी वेढलेलं आहे. सगळ्याच टेकड्या मस्त आहेत. आमची प्रत्येक सकाळ, टेकड्यांवर उजाडायची. खुले आसमन के निचे मोकळं होण्याची मज्जा काही औरच, काय पोरांनो." विनयने हसत विचारलं.

"गप्प बसा हो, कुठे काहीही बोलता"... सीमा

"अरे, त्यात काय एवढं. नेचर्स कॉल आहे तो! आता, धार मारून आलोच की आम्ही सगळे. हो की नाही रे पोरांनो."

"हो काका!".. सगळ्यांनी विनयच्या होकरात होकार भरला.

"आपल्या घरी संडास नसते तर, किती मज्जा आली असती. आईने पहाटे अभ्यासासाठी उठवलं असतं. आपण शीSS च्या बहाण्याने, बाहेर डब्बा घेऊन गेलो असतो. मी तरी तासभर घरी आलो नसतो."
"येईतोवर सकाळ झाली नसती आणि अभ्यासाला सुट्टी मिळाली असती" हिमांशू दात काढत बोलला.

"मी तर कंटाळा आला अभ्यासाचा, तर संडासातच जावून बसतो. कमोड वर बसून भिंतीवर पाणी मारायचं. मज्जा येते खूप, वेळ ही जातो." करणच्या बोलण्यात प्रथमेश ने ही, मी हि तसाच करतो म्हणत... पुष्टी जोडली...

"आपलं ही ध्यान त्यातलच." सीमाने विनयकडे बघितलं.

गप्पा गोष्टींमध्ये प्रवास कसा संपला कळलच नाही आणि कार, गावातल्या घरासमोर येऊन उभी राहिली.....

काय होईल पुढे.. ही बिलंदर मुलं सापडतील का कोणत्या संकटात.. खरंच असेल का टेकडीवर बंड्याच भूत..

जाणून घेण्यासाठी, कथेचे पुढचे भाग नक्की वाचा.
धन्यवाद.