नकळत्या वाटेवर भाग ४

पौराणिक वारसा असलेली बाहुलीची विहीर
नकळत्या वाटेवर
भाग 4...
घरासमोर कर येऊन थांबली. सगळे कारमधून उतरले.

"इडा पिडा टळो" म्हणत, आजीने भाकर तुकडा ओवाळून कुत्र्याला टाकला.

सीमा आणि विनयने आईवडिलांना वाकून नमस्कार केला. आजोबांचे डोळे लाडक्या नातवाला बघण्यासाठी तरसले होते.
आजीने राजसला जवळ घेतलं. पटापटा गालाचे मुके घेतले.

"लहान राहिलो का मी आता?" मित्रांसमोर त्याला थोड ओशाळल्यासारखं वाटलं...

"हि पोरं कोण?" आजोबांनी विनयला विचारलं.

"राजसचे मित्र.. विनयने सर्वांची ओळख करून दिली. हा दीपकचा मुलगा, प्रथमेश." कधी तरी छोटे असताना सर्वांनाच बघितल्याच आजोबांना आठवलं.

"आमच्या गावात तुमच्या सयरावानी सुविधा न्हाईत गड्यांनो. महागड्या गाड्या न्हाईत. सयरापासून दूर शांती मात्र हाय. जी तुम्हासनी सयरात न्हायी भेटाची." आजोबा बोलत होते.

"शांती.. हु इज शांती." तिला भेटणार का आपण.. करणने उत्सुकतेपोटी विचारलं.

"गप्प बे!"... राजस जोरात हसला.

लाकडाची शिडी असलेल्या धाब्यावर भराभर चढला. या घरात, त्याची सर्वात आवडती जागा. त्याच्या मागे मित्र ही धाब्यावर चढले.

"बाबांना, आजोबा शेतात काम करण्यासाठी आग्रह धरायचे. बाबा मात्र धाब्यावर लपून बसायचे आणि ही शिडी गपचूप वर खेचून घ्यायचे. हि माझ्या बाबांची अभ्यासाची जागा." राजस उत्स्फूर्तपणे सांगत होता.

"आSSबे.. एव्हढा अभ्यास करायचे तुझे बाबा आणि तू काहून बे असा.... वाक्याला टपोरी शब्दांचा साज चढवत प्रथमेश बोलला.

"का माहिती यार? पण अभ्यासाचा जाम कंटाळा मले.. असं वाटते कुठं तरी निघून जावं. दूर पळून जावं. जिथं अभ्यास नाही करावा लागणार."

"तसं बी तूले मालूम हाय, मले यू ट्यूबर व्हाचं हाय. त्याच्यासाठी मोबाईल लागते. अन् तोच मोबाईल माया बापाचा दुश्मन हाय. मंग कसं करावं म्हणतो मी करियर."

"काडीचा इंटरेस्ट न्हाई बापा मले इंजिनिअरिंग मधी पण का करू? बापापायी पुस्तकात डोकं खूपसून बसा लागते ना भाई!" गावरान लकबीमध्ये, बोलताना राघवला, गालातून जोरात हसू फुटलं.

करण आणि हिमांशू, बोललेलं काहीच न समजल्यागत दोघांकडे टक लावून बघत होते.

"अरे अभी दादा.. तू.... तू कधी आलास?" अभिकडे, लक्ष गेलं तसं राजसने अभिला विचारलं.

"तू घरून पळून जायच्या गोष्टी करत होता, तेव्हाच आलो. ऐकतोय तुमचं संभाषण." राजसने जीभ दातांमध्ये कचकन दाबली. बाबांना नको सांगू.. कान पकडुन इशारा केला.

"हा माझा अभी दादा, माझ्या मोठ्या वडिलांचा म्हणजे मोठ्या काकांचा मुलगा." आमच्या अभी दादाला पोलीस व्हायचंय.

"ये दादा तुझे बायसेप्ट ट्रायसेप्ट दाखवं," राजसने अभीचे दंड दाबले.

"व्यायामाने कमावलेलं शरीर आहे लेका," अभीने आपले दोन्ही दंड उडवले. घर पाहुण्यांनी गजबजलं होतं. गप्पांमध्ये सगळे छान रमले होते.

"दादा, नवीन मोबाईल.. राजसचं लक्ष अभीच्या मोबाईलवर पडलं. पाचच मिनिट बघू.. राजस ने विनंती केली.

उरेपुरे, चार दिवसांसाठी आलेल्या चुलत भावाला नाही म्हणायला, अभिला जीवावर आलं होतं. हातात मोबाईल बघून, काका उगाच त्याच्यावर रागावतील म्हणून अभिने मोबाईल द्यायचं टाळलं.

सगळ्यांनी मिळून, धाब्यावर छान पैकी पत्त्याचा डाव टाकला.

इकडे, स्वयंपाक घरात सीमा आणि तिच्या जावेने मिळून चुलीवर सर्वांसाठी स्वयंपाक बनवला. स्वयंपाक झाला. घरातली सगळी पुरुष मंडळी एकाच पंगतीत जेवण करायला बसले. हसत खेळत, मज्जा करत चुलीवरच्या जेवणाचा आनंद लुटत होते सगळे.

"आबा.. आपल्या गावातल्या, तलावात असलेली खोताची विहीर." त्या विहिरीची गोष्ट सांगा ना आम्हाला.

पायऱ्या असलेली विहीर, राजसने मित्रांना सांगितलं.

"ती विहीर होय, बावडी.. बाहुलीची विहीर. दोन मजल्यांची हाय. पहिले पाच मजले होते. उन्हाळ्यात, पाणी आटते अन् दोन मजले वर दिसत्यात तीन सदैव पाण्यात डूबलेले."

"पौराणिक वारसा आहे विहिरीले. पूर्वी गुप्त मार्ग होता विहिरीच्या खालच्या मजल्यातून. पन्नास साठ किलोमीटर गुप्त मार्ग, जयाबर्डीच्या वाड्यात जात होता असं म्हणत्यात. दस्तावेजांची ने आण अन् गोपनीय मुलाखती होत होत्या. सरकारने, तलाव बनवला आणि बावडीच वैभवच नष्ट झालं." आबा भरभरून बोलत होते.

"पोहत खाली जावू शकतो का?" राजसने विचारलं

"जावू शकतो. पण जायचं नाही रे गड्यांनो. बावडीत खाली कपाऱ्या हायत. पाय अडकू शकतो, फसू शकतो. अडकले बिडकले तर, फुकटचे जिवानिशी जालं. जायचं नाही. आजोबांनी सक्त ताकिद दिली.

लक्ष द्या रे बाबांनो या पोरांकड. उद्या गर्दीच गर्दी असन तलावावर. यात्रा आहे. आजोबांनी बजावलं.

"गावदेवीच्या पूजेला जाण्यापूर्वी, तलावात अंघोळ करण्याचा रीवाज आहे. शक्य असेल तर डुबकी मारा नाहीतर तलावातलं लोटाभर पाणी घ्या पाय धुवा, गुळला करा अन् या पूजेला. गर्दीत उगा शौर्याची गाथा नग. आलात तसे सुखरूप जा रे बाबांनो." आबांनी सर्वांना समज दिली.

"आजी... चिंचेच्या झाडावरची लावडीन/ चेटकीण तू बघितली आहेस का ग? राजसने आजीला विचारलं.

"शूSS, जेवताना तीच्याबद्दल बोलू नये" ओठांवर बोट ठेवत, आजीने गप्प बसवलं.

अभिसोबत सर्वांची झोपण्याची सोय धाब्यावर करण्यात आलेली होती.

सकाळी सकाळी ढोल ताशांच्या गजरात, गावदेवीची पालखी निघाली. आन्हिक आटोपून सगळे तयार झाले.

"पालखीच्या मागे मागे चला. इकडे तिकडे भटकू नका." आजोबांचं पोरांकडे विशेष लक्ष होतं. वाजत गाजत मिरवणूक गावदेवीच्या मंदिरात पोहचली. अख्खं गाव, गावदेवीच्या मंदिरात गोळा झालं होतं.

पोहता येणाऱ्यानी, तलावात डुबकी मारली. गाव देवीची मनोभावे पुजा केली.

देवीला बोकड देण्याची जूनी प्रथा गावात पहिलेपासून चालत आली होती. परंपरेनुसार देवीला बोकडाचा बळी देण्यात आला. तो बोकड, बंड्याच्या कुटुंबाकडून असायचा. निमित्ताने बंड्याची आठवण झाली...

"बंड्या.... गड्या, असा किती दिवस तू, टेकडीवर भटकत राह्यशिल." बंड्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी गावकऱ्यांनी गाव देवीला प्रार्थना केली.

बंड्याच्या नावावर असलेल्या शेतीच्या तुकड्यासाठी त्याच्याच कुटुंबातले लोक आपापसात कचाकचा भांडत होते. शांत, संयमी आणि निस्वार्थी बंड्याला, म्हणून मुक्ती मिळत नसावी. असा हि कयास गावकऱ्यांनी काढला.

पंगती उठल्या, गावकऱ्यांनी मस्त बोकडाच्या मटणावर उलट्या हाताचा ताव मारला..... पूर्वी विनय मांसाहार करत होता पण हल्ली त्याला शुद्ध शाकाहारी जेवणच आवडतं होतं.

विनय गावकऱ्यांच्या शेवटच्या पंगतीत जेवायला बसला. विनयने ताटात मटण घेतलं नाही.

"अबे लेका, बोकडाचा नैवेद्य खा की जरासा. असं प्रसादाले नाही म्हणू नये. दोन घास तरी खा." पात्र वाढताना गावातल्या एका मित्राने त्याला आग्रह केला.

विण्या, परसादाचा असा अपमान करू नये. बाजूला बसलेल्या वडिलांनी आणि भावाने विनयला समजावलं.

गाव देवीच्या पूजेच्या, प्रसादाचा अपमान करू नये. काही तरी, अपशकुन नक्की होणार. म्हणून अनेकांनी भीती हि भरवली पण विनयने पर्वा केली नाही. मांसाहार सोडल्याच, त्याने स्पष्टच सांगितलं....

रूठी, प्रथा, परंपरांची जपणूक करत, गावदेवीची पूजा संपन्न झाली होती. जुन्या जाणत्या लोकांसोबत गावात आलेल्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. वातावरण भारावून टाकणारं होतं.

गावदेवीचा प्रसाद खाल्ला नाही म्हणून होईल का काही अपशकुन? मिळेल का बंड्याच्या आत्म्याला मुक्ती.

धन्यवाद.



🎭 Series Post

View all