Login

नको नको म्हणताना भाग ७

शेवटी प्रेन हे प्रेमच असतं


अगदी सहजच शंतनुच्या तोंडून अदितीचे नाव बाहेर पडले. आईने मात्र ते अगदी स्पष्ट ऐकले आणि "ही अदिती कोण?" असा प्रश्न विचारताच, शंतनु मात्र पुरता गोंधळला.

अशा अचानक आलेल्या प्रश्नावर नेमके काय उत्तर द्यावे? ते त्याला समजेना. खरे सांगू शकत नाही आणि खोटे बोलता येत नाही. अशी काहीशी शंतनुची अवस्था झाली.

"कोण अदिती? मी नाही ओळखत." शंतनुही अगदी सहज उत्तरला. माहित नाही कुठून पण खोटे बोलण्याचे बळ अचानकच त्याच्यात निर्माण झाले.

"अरे आताच तर तू बोललास ना, अदिती म्हणून."

"अगं हा.. ते मोबाईल मध्ये गाणं सुरू होतं ना त्या नादात बोलून गेलो असेल."

"असं होय, मला वाटलं की तुझ्या कॉलेजमधील एखादी मुलगी आहे की काय?"

"अगं एवढ्या मुलींमध्ये किती मुलींची नावे लक्षात ठेवणार ना."

"ह्ममम...ते पण आहेच. पण तुला विषय निघाला म्हणून सांगते शंतनु, कॉलेजच्या मुलींपासून थोडे जपूनच राहा बाबा. काही कोणाचा भरोसा नाही. त्या दिवशी पाहिले ना ती कॉलेजची मुलगी कशी आडवी आली आपल्या गाडीसमोर आणि पुन्हा तिचाच रुबाब. कशी उद्धटासाएखी बोलत होती माझ्यासोबत. उगीच तू म्हणाला म्हणून मी गप्प बसले नाहीतर तिला बरोबर दाखवले असते."

शामल ताईंच्या मनात अदितीबद्दल इतका राग आहे आणि अजूनही त्यांनी तो धरून ठेवला आहे. याचे शंतनुला मात्र खूप वाईट वाटले.

"अगं आई असं एखाद्याबद्दल पहिल्याच भेटीत मत नको ग बनवत जाऊस. तुला हे खुपदा सांगितलंय मी. पण तू ऐकतच नाहीस. अगं नाण्याची एकच बाजू आपल्या समोर असते आणि तीच फक्त दिसत असते. त्यामुळे गैरसमज देखील होवूच शकतात ना. काय माहित ती मुलगी खूप चांगलीही असेल. पण त्या दिवशीच्या त्या एका प्रसंगातून तू तिच्याबद्दल वाईट मत करून घेतलेस की नाही. असे करून कसे चालेल तूच सांग."

"शंतनु..अरे तुझे म्हणणे मला पटत नाही असे नाही. पण ह्या आजकालच्या मुली अशाच असतात. त्यांना फक्त स्वतःची पडलेली असते जगाचं काही घेणंदेणं नसतं. आणि त्यात त्यांना त्यांच्या आई वडिलांची फूस असते."

"जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही." म्हणत शंतनु तिथून उठला आणि बाहेर जायला निघाला.

"थांब शंतनु" आईने मात्र त्याला हटकले.

"तुला माझ्या या फटकळ स्वभावाचा नेहमी राग येतो. पण मी खरं बोलते म्हणूनच तर टोचतं ना सगळ्यांना?"

"अगं आई पण प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी बोलून साध्य होतातच असे नाही ना गं."

"मग काल त्या पाहुण्यांच्या घरी जाऊन तिथेही आपलाच अपमान झाला ते कितपत योग्य होतं? तूच सांग. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा मी शांतच बसावं अशी अपेक्षाच कशी करू शकतोस तू? आधी स्वतःच मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरवायचा आणि तिथे गेल्यावर मुलीने सांगायचं की मला इतक्यात लग्न नाही करायचं. ही कोणती पद्धत झाली मग? आई-वडीलांनी आधीच मुलीशी बोलून ह्या सगळ्या गोष्टी ठरवायला नकोत का?"

"मान्य आहे गं. पण...." पुढे काही तो बोलणार तेवढ्यात शंतनुचा फोन वाजला.
"आई एक मिनिट हा." म्हणत शंतनु बाजूला गेला.

"हॅलो.. सदावर्ते सर का?"

"हो...बोलतोय, आपण?"

"सर मी ईशा बोलतिये, दोन तीन दिवसांपूर्वी तुम्ही आमच्या घरी आला होतात मुलगी पाहायला म्हणजे मला पाहायला आला होतात ."

"हो मग आता काय त्याचे? अजून काही अपमान करायचा बाकी आहे का? म्हणून फोन केलात आपण."

"सर खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हणायला फोन केला होता. सर त्या दिवशी जे झालं ते फक्त माझ्यामुळे. माझ्या आई बाबांची त्यात काहीच चूक नाही. उगीच गैरसमज नको आणि त्यातल्या त्यात माझे मन पण मला खूपच खात होते, म्हणून मग न राहवून तुम्हाला फोन लावला."

"कसले गैरसमज?"

"सर ॲक्च्युअली माझे एका मुलावर खूप प्रेम आहे. हे आई बाबांना मात्र माहित नव्हते. त्या दिवशी तुम्ही येणार मला पाहायला तेव्हा मी त्यांना सर्व खरे सांगून टाकले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता या सगळ्याला."

"अहो पण त्यामुळे आम्हाला किती अपमान सहन करायला लागला. याचा विचार केलात का? आम्हाला बोलवायच्या आधीच तुमचे तुम्ही क्लिअर करायचे होते ना मग."

"रिअली सो सॉरी सर. मलाही मान्य आहे माझी चूक. तुम्हाला रागवण्याचादेखील तितकाच अधिकार आहे. पण खरंच जर आपले लग्न झाले असते आणि नंतर ही गोष्ट सर्वांना समजली असती तर? सर त्यावेळी मी स्वतःला कधीच माफ नसते करू शकले. कारण माझ्या एका चुकीमुळे तीन आयुष्य बरबाद झाली असती."

शंतनुला आता कुठे इशाचे म्हणणे पटले होते.

"सर पण माझी अगदी जवळची मैत्रीण अदिती... तिच्यामुळेच हे शक्य झाले. नाहीतर आई बाबांना  ही गोष्ट मी कधीच सांगू शकले नसते."

अदितीचे नाव कानी पडताच शंतनु विचारात पडला. ही अदिती म्हणजे तिच तर नाही ना? कान देवून तो पुढचे बोलणे ऐकू लागला.

"सर तिने जर मला त्या दिवशी समजावले नसते तर मी तुमच्यासोबत लग्नाला होकार दिलाही असता, पण त्यामुळे.. ना मी सुखी झाले असते ना तुम्ही. आणि उगीचच मी स्वतःबरोबरच सर्वांची फसवणूक केल्याची सल आयुष्यभर मनाला बोचत राहिली असती. सर, जमल्यास मला माफ करा.
आजही अदितीच्या सांगण्यावरूनच मी तुम्हाला फोन केला. कारण चूक माझी होती. म्हणजे मीच स्पेशली तुमची माफी मागायला हवी, असे अदितीचे मत होते."

"तुमच्या मैत्रिणीला म्हणजेच...अदितीला माझ्याकडून स्पेशली थँक्स सांगा." हसतच शंतनु बोलला.

"हो नक्कीच सर."

एवढे बोलून दोघांनीही फोन ठेवला. आता कुठे ईशाला हलके वाटत होते.

शंतनु मात्र विचारांत गुंतला. "ही तीच अदिती असेल का? छे! पण हे कसं शक्य आहे? इतका मोठा योगायोग कसा काय असेल?"

तेवढयात आईने त्याला जेवायला हाक मारली आणि त्याच्या विचारांची तंद्री तुटली."

क्रमशः

ही तर तीच अदिती आहे. पण हे समजेल का शंतनुला? पाहुयात पुढील भागात.