Login

नको नको म्हणताना भाग १२

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं


अदितीच्या आलेल्या प्रतिक्रियेवर आता कुठे शंतनुला तिच्या मनातील विचार समजले होते.

"अगं वाटलं नव्हतं तू इतकी भित्री असशील. लग्नाला कोणी घाबरतं का?" हसून शंतनुने रिप्लाय दिला.

"लग्नाला नाही ओ, सासू लोकांची भीती वाटते मला. कारण सासू कधीच आई होवू शकत नाही हे पर्सनल निरिक्षणातून झालेले माझे मत. याला अपवादही असू शकतात नो डाऊट. पण एकदा का मनात भीती बसली की मग पुन्हा त्याची तयारी व्हायला वेळ तर लागणारच ना."

"मग काय लग्नच नाही का करणार?"

"आतापर्यंत तसेच ठरवले होते. पण अचानक तुम्हाला धडकले आणि माझी विकेट पडली. त्या दिवशी पहिल्यांदा जाणवले, तुमच्यासारखी व्यक्ती लाईफ पार्टनर असेल तर सासू कितीही रागीट, खाष्ट असली तरी काही फरक पडणार नाही त्याने. त्यात तुमच्या नुसत्या एका वाक्याने तुमच्या आई शांत झाल्या. याचे खरंच खूप विशेष वाटले मला."

"हे बघ शेवटी स्वभाव असतो एखाद्याचा. तो नाही कोणी बदलवू शकत. हा आता आई आहे थोडी रागीट पण मनाने खूप चांगली आहे ती. त्यात तुझ्याशी तिचे असे वागणे स्वाभाविक होते, कारण आदल्याच दिवशी आम्ही एक मुलगी पाहायला गेलो आणि तिथे गेल्यावर मुलीचे वडील म्हणतात आम्हाला इतक्यात नाही लग्न करायचे आमच्या मुलीचे, शक्य असल्यास माफ करा. सांग बरं..कसे वाटले असेल तेव्हा आम्हाला? जर लग्नच नव्हते करायचे मग आम्हाला बोलवायचे कशाला ना?"

"एक मिनिट एक मिनिट...त्या मुलीचे नाव काय?"

"ईशा तुमची मैत्रीण.." कुठलेही आढेवेढे न घेता शंतनु उत्तरला.

"आई शप्पथ! किती छुपे रुस्तुम निघालात ओ तुम्ही. म्हणजे तुम्हाला सगळेच माहित आहे तर?"

"हो..कालच समजले सगळे."

"आता ईशा गेली. शहाणीने मला काहीच सांगितले नाही. माझा नंबर पण तुम्हाला तिनेच दिला असेल ना? ओ माय गॉड... आता समजतंय मला सगळं. हे कसं आणि काय झालंय ते??"

"बसला ना आता विश्वास देवाच्या मनात काय सुरु आहे ते?"

"बापरे! अहो शंतनु  खरंच काय सुरू आहे हे? माझ्यामुळे ईशाचे आणि तुमचे लग्न मोडणे, त्याच वेळी माझे तुमच्या समोर येणे, पुन्हा मीच तिला तुम्हाला फोन करायला लावणे."

"ईशाने जर मला फोन केला नसता तर कदाचित आपला कॉन्टॅक्ट शक्यच नव्हता. त्यामुळे भविष्यात तुम्ही पुन्हा धडकला जरी असतात मला तरी कदाचित तोपर्यंत आईने माझे लग्न लावून दिलेही असते. म्हणून त्या वरच्याच्या मर्जीनेच घडत आहे सगळे असेच मला तरी वाटते आहे."

"मलाही आता याची खात्री पटली." अदितीने देखील सारे काही पटले होते जणू.

"काय मग? करशील ना माझ्याशी लग्न? त्याआधी तुला मी माझा बायोडेटा पाठवतो. वाचून घे, सगळी माहिती मिळेल त्यात माझी आणि त्यानंतर उत्तर दिले तरी चालेल. काहीही कर पण ह्या रविवारच्या आधी उत्तर अपेक्षित आहे."

"इतक्या लवकर माझे लग्न? मी अजून विचारही नाही केला ओ तसा."

"कोण म्हणतं लगेच लग्न कर? हवं तर तुला पाहिजे तेव्हढा वेळ घे. मधल्या काळात अजून एकमेकांना जाणून घेता येईल. त्याआधी घरी कल्पना तर देवून ठेवूयात."

"अगोदर एक सांगा मला, तुमच्या आई तयार होतील आपल्या लग्नाला असं वाटतं तुम्हाला? मला पाहताच क्षणी रिजेक्ट करणार त्या. याची खात्री आहे मला."

"पण आई माझे सर्व ऐकते हेही पाहिले आहेच ना तू. आईला मनवण्याची जबाबदारी माझी. तू काळजी करू नकोस."

"मग तुझा होकार समजू मी?" पुन्हा एकदा शंतनुने अदितीच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

"असं कसं सांगू ओ मी. तुम्हाला कळत नाहीत का काही गोष्टी?" थोड्या लाडीक स्वरात अदिती बोलली.

"कसे कळेल मला? मधेच हो म्हणतेस, तर मधेच म्हणतेस माझ्या मनाची अजून तयारी नाही. काय ग तू पण." शंतनुने देखील तिच्या बोलण्याच्या स्टाईलची कॉपी करतच उत्तर दिले.

त्याचे ते बोलणे ऐकून अदितीच्या मनात फुलपाखरांचे थवे अचानक घिरट्या घालू लागले. अंगावर रोमांच उभे राहिले. लाजेने ती अगदी चूर चूर झाली.

"अहो, पण तुम्ही मला सरळ सरळ लग्नाची मागणी घातली. असे कसे हे प्रेम? आठ दिवसांत कुठे प्रेमकहाणी फुलते का?"

"मग घे की वेळ, अगदी हवा तेव्हढा. हळूहळू फुलवू मग आपली प्रेमकहाणी. माझी काही हरकत नाही." शंतनु शब्दांवर जोर देत बोलला.

त्याचे हे बोलणे ऐकून अदितीच्या अंगावर मात्र शहारे उमटले. नव्या प्रेमाची नवी नवलाई नसानसातून वाहत असल्याची जाणीव क्षणभर तिला झाली.

खरंच प्रेम हे प्रेमच असते. एकदा का ते झाले की मग माणूस स्वप्नांच्या दुनियेचा एक भाग होवून जातो. वेळ काळाचे कोणतेही बंधन उरत नाही. कितीही बोलले तरी पोट काही भरत नाही. आपल्या हक्काच्या व्यक्तीला नजरेच्या कप्प्यात साठविण्यासाठी मन आतुर झालेले असते. एकमेकांचा सहवास, पहिला स्पर्श, पहिली मिठी सारे काही हवेहवेसे वाटते.

अदिती आणि शंतनु दोघांचेही अगदी असेच काहीसे झाले होते. जरी अजून प्रेमकहाणी फुलली नव्हती तरी चारच दिवसांत दोनदाच झालेल्या त्या भेटी स्वर्ग सुखाचा आनंद देवून गेल्या होत्या दोघांनाही. मनाने मनाला जणू साद दिली नि सारी सूत्र एकदमच फिरली. नशिबाचे फासेही अचानकच पालटले. जणू परमेश्वर इच्छाच असावी ती.

नको नको म्हणताना अखेर अदितीने देखील हे मान्यच केले होते. अगदी सहजच झालेली ती पहिली भेट; भेट कसली, धडकेतून सुरू झालेली ही प्रेमकहाणी आता हळूहळू फुलू पाहत होती. दोघांच्याही मनात आता जोडीदाराची छबी कोरली गेली होती. अखेर एक होण्याचा निर्णय दोघांनीही एकमताने पक्का केला. .

अदितीचे आई बाबा खुश होणार होते तिच्या या निर्णयावर पण शंतनुच्या आईचे काय? त्यांना तर पहिल्याच भेटीदरम्यान अदिती उद्धट वाटली होती. अखेर त्यांच्याही सुनेबद्दलच्या काही अपेक्षा या होत्याच. पण अदिती तर आधीच त्यात सपशेल नापास झाली होती.

क्रमशः

अदितीच्या आई बाबांची काय प्रतिक्रिया असेल तिच्या या निर्णयावर? शंतनु मनवू शकेल का शामल ताईंना? अदिती आणि शंतनुच्या  प्रेम कहाणीचे पुढे काय होणार? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका..