"हे बघ आता हे होणारच आहे पण अगं तुझ्या घरचे तुझा निर्णय ऐकून आनंदी तरी होणार आहेत आमच्याकडे थोडे उलट आहे. असे असले तरी मला थोडी घाई करावी लागणार आहे. आई तर मला घोड्यावर बसवण्याच्याच तयारीत आहे. येत्या रविवारी पर्यंतचा वेळ आहे माझ्याकडे. मला उद्याच करावे लागेल काहीतरी."
"एक सांगू, आधी तुम्ही तुमच्या आईला ही गोष्ट सांगा. काय होतंय पाहू. त्यानंतर मग मी इकडे आई बाबांसोबत बोलते."
"बरं काहीच हरकत नाही."
"अहो वाजले पाहा किती? मला सकाळी लवकर उठून प्रोजेक्ट पूर्ण करावा लागेल आता.आज काहीच नाही केले."
"हुशार स्टुडंट्स असे टेन्शन घ्यायला लागल्यावर बाकीच्यांनी काय बोलावे मग?" शंतनुने हसतच तिची खेचायला सुरुवात केली.
"तसे नाही पण मागच्या आठ दिवसापासून जरा दुर्लक्षच झालंय कॉलेज, लेक्चर आणि स्टडी सगळ्याच गोष्टींकडे. या सर्वाला फक्त आणि फक्त तुम्ही कारणीभूत आहात शंतनु समजलं." अदिती लाडिकपणे बोलली.
"मी काय केले आता? सर्वात आधी तूच तर धडकलीस ना मला."
"तुम्हाला नाही आ, तुमच्या गाडीला. असं म्हणा." वाक्यावर जोर देत अदिती बोलली.
"हो तेच ते."
"तेच ते कसे असू शकते बरं? तरी नशीब तुमच्या गाडीलाच धडकले. प्रत्यक्षात तुम्हाला धडकले असते तर काय झाले असते काय माहित?" थोडी लाजतच अदिती बोलली.
"ते काहीही म्हणा पण एकदम करेक्ट वेळेला तू माझ्या लाईफ मध्ये एंट्री केलीत बरं का. नाहीतर आई पसंत करेल त्या मुलीला होकार देवून मोकळा झालो असतो. अशा नात्यात मात्र माहित नाही किती ॲडजस्ट करायला लागले असते."
"देवाने ऐकले ना तुमचे गाऱ्हाणे. बरं झोपा की हो मग आता . मी पण झोपते. आता नाही ना झोपले तर उद्या माझे काही खरे नाही."
"काय हे...माझी झोप उडवून तू मस्त झोपणार वाटतं?"
शंतनुच्या या वाक्याने अदितीच्या लाजेची कळी मोहोरली.
"फायनली मी झोपते तुम्ही बसा जागरण करत. बाय.. गुड.. नाईट.. स्वीट ड्रीम." लाजतच अदितीने मॅसेज टाईप केला आणि सेंड करून मनाला आवर घालत ती ऑफलाईन गेली.
तिच्या या मॅसेजवर त्याने काहीही न बोलता फक्त खूप सारे हार्ट पाठवले. मनावर दगड ठेवून त्यानेही पुढे एकही मॅसेज नाही केला.
आजची रात्र दोघांसाठीही अविस्मरणीय होती. दोघांच्याही आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात जी झाली होती.
प्रेमाची बाग दोघांच्याही मनात फुलली होती. सोबतीतले अत्यंत दुर्मिळ असे क्षण आठवत दोघेही झोपण्याचा प्रयत्न करू लागले. खूप वेळानंतर एकमेकांच्या सहवासाची स्वप्ने रंगवत दोघेही झोपेच्या अधीन ते झाले.
आता अदिती आणि शंतनुच्या प्रेम कहाणीला सुरुवात तर झाली पण पुढे काय आणि कसे होणार? हा प्रश्न दोघांनाही सतावत होता.
पहिल्याच दिवशी दोघांनीही पोटभर गप्पा मारल्या आणि नुसत्या गप्पाच नाही मारल्या तर एकमेकांच्या आयुष्याचा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णयदेखील घेतला.
दोन ते अडीच तासांच्या चॅटिंगमध्ये शंतनु आणि अदितीचे आयुष्यच बदलून गेले. अजून दोघांच्या नात्यात म्हणावा तितका मोकळेपणा आला नव्हता आणि इतक्या लवकर तो येणार तरी कसा म्हणा?
आता कुठे प्रेमाची पालवी फुटू लागली होती. हळूहळू ती इतक्यातच बहरायला सुरुवात झाली होती. फक्त आयुष्य ज्याच्यासोबत घालवायचे ती व्यक्ती फायनल झाली होती दोघांच्याही दृष्टीने. नाते फुलण्यासाठी एकमेकांना जाणून घेण्याची नितांत गरज असते. जे की आता दोघांनाही हवे होते. त्यामुळेच तर अदिती थोडी बावरली होती लग्न या विचाराने.
परंतु, शंतनुसारखा समजूतदार जोडीदार असल्यावर सारेच कसे सोपे वाटू लागले होते तिलाही.
परंतु, शंतनुसारखा समजूतदार जोडीदार असल्यावर सारेच कसे सोपे वाटू लागले होते तिलाही.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला पोहोचताच अदितीने ईशाची हजेरी घेतली ते वेगळेच पण ते करत असताना तिच्या चेहऱ्यावरून आनंदाचा महापूर ओसंडून वाहत होता. कारण इशामुळेच हे सारे इतक्या लवकर शक्य झाले होते. अदिती स्वतः याची मुख्य सूत्रधार जरी असली तरी ईशा मात्र मुख्य दुवा होती दोघांनाही एकत्र आणण्याचा.
शंतनु मात्र आता आईला ही एवढी मोठी गोष्ट कशी सांगायची याचाच विचार करत होता.
तेवढ्यात आईनेच त्याला विचारले..
"काय रे काय ठरले तुझे? रविवारी जायचे आहे ना मग?"
"आई त्या संदर्भातच बोलायचे आहे थोडे तुझ्याशी."
"अरे! आता इतके चांगले स्थळ आहे म्हटल्यावर नाही नको रे म्हणू बाबा. शेवटी लग्न जमणं न जमणं ह्या नशिबाच्या गोष्टी झाल्या पण मुलगी पाहायला काय हरकत आहे?"
"आई...मला जर एखादी मुलगी आवडत असेल तर आधी तिचा विचार व्हायला नको का?"
"हो, व्हायलाच हवा पण याआधी तुला मी विचारले तेव्हा म्हणाला होतास, मला नाही कोणी आवडत आणि आता अचानक अशी कोणती मुलगी तुला आवडायला लागली रे?"
"काही वेळा अचानकच काही गोष्टी घडतात आणि आपले आयुष्यच बदलून जाते. ध्यानी मनी नसतानाही कोणीतरी ह्रदयाच्या अगदी जवळचे वाटू लागते. आई..तू समजून घेशील असे वाटते."
"हे बघ आयुष्य तुझे आहे. ते कसे आणि कोणासोबत घालवायचे हा जरी तुझा प्रश्न असला तरी पालक म्हणून आमच्याही काही अपेक्षा असूच शकतात आणि हे सर्व तुही समजून घेशील असे वाटते."
"हो आई नक्कीच आणि फॅमिली म्हटले की एकमेकांना समजून घेतच वाटचाल करायची असते."
"बरं कोण आहे ती मुलगी? कय करते? तिचं शिक्षण किती? आपल्या घराला नि महत्त्वाचं म्हणजे तुला शोभणारी हवी."
"अगदी तशीच आहे गं पण तरीही तुला आवडते की नाही, अशी शंका आहे मनात."
"हे तू मी तिला पाहण्याआधीच कसे काय ठरवलेस?"
पुढे कसे आणि काय बोलावे? हेच क्षणभर शंतनुला समजेना.
क्रमशः
आता काय होणार पुढे? ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अदिती आहे हे जेव्हा शामल ताईंना समजेल तेव्हा काय होईल? जाणून घेवूयात पुढील भागात
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा