अदितीच्या घरच्यांनी पाहुण्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. हे पहिलेच स्थळ होते अदितीला पाहायला येणारे, त्यामुळे सगळेच खूप एक्साईट होते. रत्ना ताई आणि माधवरावांना तर काय करू आणि काय नको असेच झाले होते.
अदितीला तर अजूनही विश्वास बसत नव्हता, इतक्या घाईत सर्व काही होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते कोणाला. तिला स्वतःलाही याचे नवल वाटत होते. शंतनु तिच्या आयुष्यात आला आणि तिचे आयुष्यच बदलून गेले.
नको नको म्हणतानाही अदितीच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली. शंतनुसारखा जोडीदार मिळणार म्हटल्यावर तीही सासूचा विचार सोडून लग्नासाठी तयार झाली. तिच्या अनुभवानुसार तिची होणारी सासू ही कडक शिस्तीची होती. मनातून तिला या गोष्टीची भीतीही वाटत होती. परंतु, शंतनुसारखी व्यक्ती सोबत असताना घाबरण्याची काहीच गरज नव्हती तिला.
निघताना शंतनुने अदितीला फोन केला,"छान आवरुन तयार राहा, आम्ही पोहोचतोच थोड्या वेळात."
शंतनु बोलला तशी तिच्या गाली लाजेची कळी खुलली. आरशात स्वत:ला वरपासून खालपर्यंत तिने संपूर्ण न्याहाळले. साडीत तिचे रूप इतके खुलले होते की ती स्वतःच स्वतःच्याच जणू प्रेमात पडली. आता शंतनु जेव्हा तिला पाहिल तेव्हा त्याची काय रिॲक्शन असेल? याची तिला उत्सुकता लागली होती.
शंतनुच्या प्रेमाचा रंग तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. शंतनुसाठी आज ती तयार होत होती. खऱ्या अर्थाने आज त्यांच्या प्रेमाची सुरुवात होणार होती. नवीन नात्याचा पाया आधीच जरी रचला गेला असला तरी खऱ्या प्रेमकहाणीला खऱ्या अर्थाने आज सुरुवात होणार होती.
फिकट पोपटी रंगाची सिल्कची साडी, त्यावर डायमंडचा नाजूक नेकलेस, मॅचिंग कानातले, कपाळावर नाजुकशी टिकली, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात डायमंडची एक बांगडी, मानेवर रुळणारे केस, अशा साध्या सिंपल लूकमध्ये अदितीचे रुप आणखीच खुलले होते.
थोडयाच वेळात पाहुणे पोहोचले. शंतनु, शामल ताई आणि अनंतराव असे तिघेच आले होते अदितीला पाहायला. माधवराव आणि रत्ना ताईंनी आनंदाने पाहुण्यांचे स्वागत केले. अदितीच्या घरचे वातावरण पाहून तिघांनाही हायसे वाटले. आपल्या तोलामोलाची माणसे आहेत हे पाहून शामल ताईंनादेखील मनातून बरे वाटले. घरातील नीटनेटकेपणामुळे सर्वांनाच अगदी प्रसन्न वाटत होते.
पडद्याआडून अमेय हळूच शंतनुकडे पाहून हसला. तसे शंतनुलाही हसू आले.
"आठ दिवसांपूर्वी हेच सर किती अनोळखी होते आणि आज तेच माझ्या ताईला पाहायला आले." अमेयच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून गेला.
शंतनु आतुरतेने अदितीच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. रत्ना ताईंनी पाहुण्यांना पाणी दिले.पाहुण्यांसाठी बरेच पदार्थ स्वतःच्या हातांनी बनवले होते त्यांनी. या दिवसाची त्या आतुरतेने वाटच पाहत होत्या. पण कांदे पोह्यांशिवाय या कार्यक्रमाची शोभा थोडीच ना वाढणार होती.
थोड्याच वेळात पोह्यांचा ट्रे घेवून अदिती बाहेर आली. तिला पाहून क्षणभर शामल ताई गोंधळल्या.
"ही नक्की तीच मुलगी आहे का?" असा प्रश्न पडला काही क्षण त्यांना.
"ही नक्की तीच मुलगी आहे का?" असा प्रश्न पडला काही क्षण त्यांना.
शंतनुला पाहून रत्ना ताई आणि माधवरावांना देखील खूपच आनंद झाला. इतका हँडसम आणि कर्तबगार मुलगा आपला जावई होणार या कल्पनेनेच ते सुखावले होते.
शंतनुची नजर तर अदितीवरून हटायलाच तयार नव्हती. शंतनुच्या प्रेमाचा रंग तिच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. शंतनु आणि अदितीची आधीच पसंती जरी झाली असली तरी पुन्हा नव्याने तो तिच्या प्रेमात पडला होता.
अदितीने सर्वांना पोहे दिले. शामल ताईंच्या समोर येताच तिचे अवसानच जणू गळून पडले. त्या दिवशीचा प्रसंग झरझर दोघींच्याही डोळ्यासमोर तरळला. अगदी आठच दिवसांत सारी सूत्रे फिरली होती.
मनाची तयारी करत "सॉरी काकू.."म्हणत अदितीने पोह्यांचा ट्रे शामल ताईंच्या समोर धरला. आता सर्वांच्याच नजरा दोघींवर खिळल्या. काय होणार पुढे? याचाच सर्वजण विचार करू लागले.
"छान दिसतीयेस." उसने अवसान एकवटून जणू शामल ताई बोलल्या. त्या दिवशीचा एक प्रसंग सोडला तर मुलीमध्ये नाही म्हणण्यासारखे खरंच काहीच नाही. अगदी शंतनुला शोभून दिसेल अशीच आहे ही. हे जणू शामल ताईंनी मनोमन मान्यच केले होते. त्यांची नजरच सर्वकाही सांगून गेली.
शामल ताईंची रिॲक्शन पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला.अदितीला देखील मनावरचे खूप मोठे ओझे हलके झाल्यासारखे वाटले. तरीही मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना वाटत होती.
"काकूंनी खरंच मला माफ केले असेल का?" हा प्रश्न राहून राहून अदितीला सतावत होता.
तेवढ्यात "बेटा बस ना." समोरच्या खुर्चीकडे इशारा करत अनंतराव बोलले. अदिती लगेचच खुर्चीत टेकली. एकमेकांची जणू जुनी ओळख असल्यासारखे सर्वजण छान गप्पा मारत होते. अधूनमधून अदिती आणि शंतनुची होणारी नजरानजर एकमेकांना आणखीच घायाळ करत होती.
अनंतरावांनी गरजेचे सर्व प्रश्न विचारले अदितीला. तिनेही अगदी बिंदासपणे उत्तरे दिली.
"अशीच चुणचुणीत मुलगी सून म्हणून हवी होती आम्हाला. चला.. मुलांनी आपले काम खूप सोपे केले म्हणायला हरकत नाही." म्हणत अनंत रावांनी अदितीचे कौतुक तर केलेच पण मुलांच्या पसंतीला सर्वांसमक्ष मनापासून पाठिंबा देखील दर्शवला .
माधवरावांनीदेखील शंतनुची आणि त्याच्या कामाची सर्व माहिती घेतली.
साधारणपणे तीन वर्षापूर्वी शंतनु कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झाला होता. सध्या त्याचे पीएचडीचे शिक्षण सुरू होते. काही दिवसांतच तो रसायनशास्त्र या विषयात डॉक्टरकी मिळवणार होता. हे ऐकून रत्ना ताईंना तर होणाऱ्या जावयाचा खूपच अभिमान वाटला आणि अदितीचादेखिल.
साधारणपणे तीन वर्षापूर्वी शंतनु कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झाला होता. सध्या त्याचे पीएचडीचे शिक्षण सुरू होते. काही दिवसांतच तो रसायनशास्त्र या विषयात डॉक्टरकी मिळवणार होता. हे ऐकून रत्ना ताईंना तर होणाऱ्या जावयाचा खूपच अभिमान वाटला आणि अदितीचादेखिल.
नको नको म्हणताना अखेर अदितीने इतक्या कर्तबगार मुलाची जोडीदार म्हणून निवड जी केली होती.
रत्ना ताई आणि शामल ताईंच्या देखील छान गप्पा रंगल्या होत्या. शामल ताई अदितीसोबत मात्र थोड्या हटकूनच वागत होत्या, हे तिलाही जाणवले पण शंतनुने नजरेतूनच तिला धीर दिला.
"तुमचे सर्वांचे झाले असेल बोलून तर नियमानुसार ताईला आणि सरांना देखील बोलू द्यायचे का?" दोघांच्या मनाची होणारी घालमेल पाहून अमेयने मधेच प्रश्न केला. तशी दोघांचीही कळी एकदमच खुलली.
"हो हो आमची काहीच हरकत नाही." म्हणत सर्वांनीच परवानगी दिली.
दोघेही मग बंगल्याच्या पाठच्या बाजूला असलेल्या बागेमध्ये गेले. जाई जुईचा मंद सुवास चहूकडे दरवळत होता. शंतनु आणि अदितीच्या प्रेम कहाणीचा जणू तो आज साक्षीदार बनणार होता.
क्रमशः
अदिती आणि शंतनुच्या प्रेमकहाणीला आता कसा चढेल रंग? जाणून घेवूयात पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा