Login

नको नको म्हणताना भाग २० अंतिम

एक हलकी फुलकी प्रेमकथा


अदिती आणि शंतनुचे कॉलेज रूटीन पुन्हा नेहमीसारखे सुरू झाले. नवीन नवीन अदितीला खूप जड जात होते एकाच वेळी दोन्ही गोष्टी सांभाळताना. त्यात शामल ताई थोड्या हटकून वागत असल्यामुळे अदितीला कसा त्रास होईल यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असायचे.

असे असले तरी शंतनु आणि अनंतराव यांची भक्कम साथ तिच्यासाठी लाखमोलाची होती.

सकाळी कॉलेजला जायच्या आधी शक्य तितकी घरातील कामे आवरुन मगच तिने कॉलेजला जायचे असा जणू नियमच केला होता शामल ताईंनी. सायंकाळी घरी आल्यावर पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावरच होती.

अदितीला शामल ताईंचे हे वागणे समजत नव्हते असे नाही. पण तीही सहजासहजी हार मानणाऱ्यातली नव्हती. तसेही सोशिक सून बनून शांतपणे त्रास सहन करणे तिच्या तत्त्वात बसतच नव्हते. एक ना एक दिवस आईंना जाणीव होईल त्यांच्या चुकीची." असे मनापासून अदितीला वाटत होते. 

रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर पुन्हा सकाळच्या डब्याची आणि स्वयंपाकाची तयारी करण्याच्या नादात अदितीचा अभ्यास आणि प्रोजेक्ट वर्क याकडे मात्र दुर्लक्ष होत होते. कामामुळे वेळ कमी पडायचा तिला. त्यामुळे रात्री जागून रोजचा स्टडी ती करत असे. शामल ताई मात्र तिच्यावर सगळे सोपवून झोपायला निघून जायच्या.

शंतनु आणि अनंतराव मात्र अदितीच्या पाठी भक्कम उभे होते. तिची धावपळ त्यांना बघवत नव्हती. दोघांनीही मग एक युक्ती केली. बोलून वाद होण्यापेक्षा आपले काम कसे होईल याचा त्यांनी पूर्ण प्लॅन केला. शक्य तितकी अदितीला कामात मदत करण्याचे दोघांनीही ठरवले. तेवढाच तिला अभ्यासाला वेळ मिळेल आणि रात्री जास्त जागरण करावे लागणार नाही.

"अदिती...तू जा बेटा आम्ही करतो हे तुझे काम." अदितीच्या हातातील मेथीची भाजी घेत अनंतराव आणि शंतनु बोलले. टिव्ही पाहता पाहता सकाळच्या डब्याची ती तयारी करत होती. त्या नादात तिचा प्रोजेक्ट अपूर्ण राहिला होता. आता रात्री जागून ती तो पूर्ण करणार होती. शामल ताई मात्र त्यांच्या रुममध्ये मोबाईल वर टाईमपास करत बसल्या होत्या.

"बाबा..राहू द्या मी करते. तुम्ही जा बरं झोपायला."

"एक काम कर जा बरं तू तुझा प्रोजेक्ट पूर्ण करून घे आधी. पुन्हा हे सगळं आवरून जागरण करत बसतेस. उगीच आजारी पडशील.आजपासून रोज रात्री हे काम बाबा आणि मी मिळून करत जाईल. त्या निमित्ताने आम्हालाही एकमेकांसोबत थोडा टाईम स्पेंड करता येईल." शंतनुच्या शब्दांनी अदितीला खूपच धीर आला.

"उठ बेटा जा पटकन. आम्ही करतो अगदी तुला हवं तसं मग तर झालं."

"बाबा...पण आई...त्यांना नाही आवडणार हे आणि विनाकारणचे वाद मला नको आहेत. त्यामुळे राहू द्या. मी माझं करेल मॅनेज."

"अगं तुला कळत नाही, तिला वठणीवर आणण्यासाठीच आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. आता घरातील कामाचा तुझ्या अभ्यासावर अजिबात परिणाम नाही होणार याची आम्ही मिळून काळजी घेवू. तसेही आता आम्हाला काय काम आहे ग. तेवढीच तुला मदत होईल."

अदितीलाही आता हसू आले. "किती भाग्यवान आहे मी." मनातच ती बोलली.

आता रोजच हे असे घडू लागले. एक दोन दिवस शामल ताईंनी सर्वांची गंमत पहिली आणि त्यानंतर अदितीला खूप काही सुनावले.

"तुम्हाला नाही पटत मग तुम्ही मदत करा मला आई. मीही माणूस आहे आणि मलाही दोनच हात आहेत. हेच जर तुम्हाला मुलगी असती आणि तिची सासू तीच्यासोबत अशी वागली असती तर आई तुम्ही काय केले असते ओ?"

अदितीने स्पष्ट बोलून शामल ताईंना त्यांची चूक दाखवून दिली. यावर त्यांच्याकडे मात्र काहीच उत्तर नव्हते.

"तुम्ही सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली ना मग आता मी ती माझ्या पद्धतीने पूर्ण करेल. काळजी करू नका."

"तू उद्धट होतीस आणि आहेसच हे आधीपासूनच मला माहित होते. पण ह्या दोघांना नाही ना समजले ते."

"याला उद्धटपणे वागणं नाही म्हणत ओ आई. आपल्यावर जर कोणी विनाकारण अन्याय करत असेल तर शांत बसून तो सहन करणं हे माझ्या तत्वात बसत नाही आणि तसेही मी नाही सांगितले कोणाला मला मदत करा म्हणून. हे माझ्यावर असलेले माझ्या माणसांचे प्रेम आहे. जे की गरजेच्या वेळी मला कामी येते." अगदी शांतपणे अदितीने सासूला समजावून सांगितले.

असे बोलून अदितीने सासूची बोलती मात्र बंद केली. आता शंतनु आणि अनंतराव रोजच तिला कामात मदत करू लागले. त्यामुळे आता शामल ताईंनाच स्वतःची लाज वाटू लागली.

"आजपासून तुम्ही दोघांनीही ही कामे करायची नाहीत. मी अजून जिवंत आहे, समजलं...." त्यांच्या पुढ्यात असलेल्या वाटाण्याच्या शेंगांची टोपली ओढून घेत शामल ताईंनी कडक शब्दात नवऱ्याला आणि लेकाला सुनावले.

शंतनु आणि अनंतरावांनी एकमेकांना अंगठा दाखवत हसून डोळा मारला.

"त्यात काय एवढं आम्ही करतो की मदत."हसतच त्यांनी वाटाणा सोलायला पुन्हा सुरुवात केली.

"पण मला अजिबात नाही चालणार. तुमच्या सुनेला चालत असेल ते पण मला नाही चालणार. उठा दोघेही पटकन, करते मी राहू द्या."

अगदी आठच दिवसांत शामल ताईंना बदलण्यास शंतनु आणि अनंतरावांनी भाग पाडले होते.

लग्नाआधीचा तो एक प्रसंग सोडला तर अदितीनेदेखील सून म्हणून प्रत्येक जबाबदारी अगदी आनंदाने आणि मोठ्या हिमतीने पेलली होती. घर सांभाळून कॉलेज, अभ्यास सारे काही पाहताना तिची तारांबळ उडत होती खरी पण शांतपणे कामाचे योग्य नियोजन करून ती ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असायची.

नशिबाने नवरोबा आणि सासरेबुवा यांचा भक्कम पाठींबा होता तिला. त्यामुळे सासू कितीही हटकून राहिली तरी अदितीला त्याने जास्त काही फरक पडत नव्हता. उलट ह्या तिघांच्या गप्पा, मजा, मस्ती पाहून शामल ताईंनाही हेवा वाटायचा. आपण जास्त ताणत आहोत याची जाणीव त्यांना वरचेवर होत होती.

"खरंच अदिती म्हणते त्याप्रमाणे मला लेक असती आणि तिची सासू जर तिच्यासोबत असं वागली असती तर मला खूप त्रास झाला असता. मला अजिबात नसते आवडले ते. मग मी अदिती सोबत वागते ते योग्य आहे का?" शामल ताईंना त्यांच्या चुकीची मनातून कुठेतरी जाणीव झाली होती.

सायंकाळी अदिती घरी यायच्या आत त्यांनी मग अर्धा अधिक स्वयंपाक करून ठेवला. अदितीची बरीचशी कामे त्यामुळे हलकी झाली. लवकर आवरून अभ्यास करावा म्हटले तर उद्याच्या डब्याची काळजी तिला सतावत होती. त्यात आता परीक्षा पण जवळ येत होती तिची. त्यामुळे कामे करून अभ्यासाला म्हणावा तितका वेळ ती देऊ शकत नव्हती. पण आता शामल ताईंचीदेखील तिला मदत होत होती.

शामल ताईंमधील हा बदल अदितीला अगदीच सुखावून गेला. रात्री जेवण आटोपल्यानंतर त्यांनी उद्याच्या डब्यासाठी भाजी निवडून ठेवली.

असे असले तरीही त्या अदितीसोबत अजूनही तितक्या मोकळेपणाने बोलत नव्हत्या. फक्त कामाशी काम ठेवायच्या. कामापुरतेच बोलायच्या. अदिती मात्र काम असो अगर नसो आई आई करत काही ना काही त्यांना विचारत राहायची. त्यांना बोलते करण्यासाठी प्रयत्न करतच रहायची. त्यामुळे त्यांना उत्तर देणेही भागच पडायचे.

पुढे हळूहळू शामल ताई देखील सारे काही विसरून तिच्याशी प्रेमाने वागू लागल्या. तसेही एकाच घरात राहून त्या तरी अशा किती दिवस हटकून वागणार होत्या म्हणा. अखेर अदितीने ही लढाई देखील जिंकली.

"एकमेकांच्या चुका असतील तर मनात अढी ठेवून वागण्यापेक्षा आणि गैरसमज करून घेण्यापेक्षा जे आहे ते प्रत्यक्ष बोलून प्रश्न सोडवायचे," हा नियम आता अदितीने सर्वांनाच लागू केला. घरातील वातावरण त्यामुळे फ्री झाले.

नको नको म्हणताना अदितीने प्रेमही केले आणि लग्न देखील. सासू बद्दल मनात भीती बाळगून लग्न या भानगडीत पडायचेच नाही असे तिने मनोमन ठरवले होते. परंतु, शंतनु तिचा आयुष्यात आला आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. त्यातच शंतनु आणि अनंतरावांच्या सपोर्टमुळे सारे कसे अगदी सोप्पे होवून गेले.

रोजच नव्याने प्रेमाची उधळण करत अदिती आणि शंतनुचा संसार आनंदाने बहरत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काही दिवसांतच अदितीला एका नामांकित कंपनीत जॉब मिळाला. फॅमिली सपोर्टमुळे एक एक करत यशाची पायरी ती चढत होती.

प्रो.शंतनु सदावर्ते यांच्या नावापुढेदेखील आता डॉक्टर ही पदवी लागली होती. प्रत्येक स्वप्न आता सत्यात उतरत होते. परंतु तरीही आयुष्यात काहीतरी उणीव ही भासतच होती.

पुढे लहानग्या परीच्या आगमनाने सदावर्ते कुटुंबातील तसेच अदिती आणि शंतनुच्या आयुष्यातील उरली सुरली कमी देखील भरून निघाली. घराचे अगदी गोकुळ झाले. शामल ताईंचा आनंद आता गगनात मावत नव्हता. एकंदरीतच आनंदाचे वारे साऱ्या घरभर वाहू लागले होते.

नको नको म्हणताना सारे सुख आता अदितीच्या पायाशी लोळण घेत होते.

समाप्त

अदिती आणि शंतनुची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा.