नामदेवाचे पत्र

नामदेव पाटील सरांचे पत्र मिळाल्यावर दाटलेल्या भावना
नवीन वर्ष आल्या आल्याच एव्हढी सुंदर भेट मला घेवून येईल असं वाटलं नव्हतं. अतिशय सुवाच्य अक्षरात एक पत्र माझ्या नावावर नामदेव पाटील सर यांनी पाठवल होतं.

पत्र पाहिल्यावर अनेक भावना उचंबळून आल्या. एकतर पत्र एव्हढ्या सुरेख अक्षरात होतं की त्या अक्षराच्या मी अक्षरशः प्रेमात पडलो. त्याच वेळी माझ्या अक्षराला आणि मला नीट वळण लावण्यासाठी माझ्या शिक्षकांनी केलेल्या विफल प्रयत्नांची आठवण येऊन डोळयात पाणी आले.

तसं पत्र लेखनाशी माझा संबंध अहीनकुला सारखा. मी लिहीलेल्या पत्रांचे परीणाम होण्या ऐवजी दुष्परिणामचं जास्त झाले होते. माझ्या शुद्ध हेतू बद्दल लोकांनी कारण नसतांना शंका घेतली होती, परिणाम दात  आणि चष्मा फुटण्यात झाला होता. त्या वेळेपासून मी पत्र लेखनाच्या वाटेला गेलेलो नाही. इतकंच काय अजूनही मी कोणाचीही पत्र चोरून वाचत नाही. पण आज हे पत्र माझं हक्काचं अगदी माझ्या नावाने आलेलं होतं. मुख्य म्हणजे हस्ताक्षरात लिहिलेलं.

पत्र म्हणजे काय, अक्षरशः नजर लागेल असा नजराणा आहे. अर्थात ते मी बायकोला वाचून दाखवलं तेंव्हा तिने एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताने आरती ओवाळल्या सारखं केलं. तेंव्हा कुठं मी जमिनीवर आलो.

स्तुती करणं हा नामदेव सरांचा मूळ स्वभाव. पण ती करतांना आपल्याला त्यांच्या साहित्यिक व्यासंगाची, त्यांच्या काव्यमय हृदयाची आणि निर्मळ मनाची जाणीव होते. ते स्वतः मनाने अतिशय निर्मळ असल्याने त्यांना सगळ जग सुंदर दिसते. नाहीतर लॉकडाऊन च्या काळात घरात बसून बसून वजन वाढल्याने मी मोठा आणि वजनदार झालो आहे. त्याचा आणि बुद्धीचा काडीचाही संबंध नाही. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली असती.

काय भयंकर सुंदर पत्र लिहिलं आहे तूम्ही. बापरे मी तर दचकूनच गेलो. सुपर मार्केट मध्ये स्वतःच्या हाताने वस्तू घेतांना देखील, कोणी पाहात तर नाही ना किंवा कोणी ओरडणार तर नाही ना या भीतीने मला घाम फुटलेला असतो. किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा दुकानामध्ये पाटी लिहिलेली असते, तुम्ही सी. सी. टीव्ही कॅमेऱ्याच्या क्षेत्रात आहात तेंव्हा कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेवून आहे या कल्पनेनेच इतकं अस्वस्थ व्हायला होतं की बाथरूमला जायला देखील भीती वाटते. सेम फिलिंग मला आज तुमचं पत्र वाचतांना झाली. कोणी इतक्या मन लावून माझं वेडंवाकडं काहितरी खरडलेलं ( त्याला साहित्य किंवा लिखाण वगैरे म्हणणं म्हणजे फारच मोठा विनोद ) वाचत असेल आणि त्यातून असा काही प्रचंड अर्थ वगैरे निघत असेल ही गोष्ट तर माझ्या बुद्धीच्या पलीकडची आहे.

खरं तर त्यांचं पत्र एव्हढं सुंदर आहे की सहज एखादा झरा वाहायला लागावा इतकं उत्स्फूर्तपणे ते त्यातून व्यक्त झाले आहेत. भले त्यांनी त्यात मला उद्देशून ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी जरी सगळ्याच्या सगळ्या चुकीच्या असल्या तरी पत्र लेखनाला किती मार्क्स मिळतील हे तूम्ही स्वाती मॅडमला नाहीतर सारिका मॅडमला किंवा प्रशांत सरांना विचारा. ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क्स देतील.

कोणालाही तुमचं पत्र वाचून सखाराम गटणेची आठवण होणं साहजिकच आहे. शब्द व्यासंग काय, वाचन काय, भाषेवरती प्रचंड प्रभुत्व काय  वगैरे वगैरे  मोठं मोठे साहित्यिकशब्द तूम्ही लीलया वापरले आहेत. असं काही नसतं हो. माझं भाषेवरच प्रभुत्व पाहायचं असेल तुम्ही माझी तर बायको समोर आणि साहेबा समोर उडणारी तारांबळ आणि वळणारी बोबडी बघा. व्यासंग, वाचन या बद्दल तर माझ्या बायकोचं मतं जास्त चिंतनीय आहे. ती म्हणते डोंगर दुरून साजरे असतात. तुम्ही सगळ्यांना बनवू शकाल मला नाही. दिसतं तसं नसतं. मीच आहे म्हणून टिकली.

पुस्तकं वाचून मला एव्हढच समजलं की पुस्तकं वाचून अक्कल येतं नाही. निदान विद्वानांच्या सभेत तरी मी  गप्प बसावे ना. तर नाही. जित्याची खोडं जाणार थोडीच. तेंव्हा व्यासंग वगैरे काही नाही. आणि ते वाचन वगैरे मी निव्वळ झोप येतं नाही म्हणून केलं होतं.त्यात ज्ञान प्राप्ती वगैरे उदात्त हेतू नव्हता. बाकी जे पुस्तकं वाचल्या वर गाढ झोप लागते ते सर्वोत्तम पुस्तकं अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे.आणि तूम्ही ती लेखकाची उपमा दिल्या पासून बायको तर मला आरती ओवाळल्या सारखे हातवारे करून राहिली आहे. अवघड आहे बाबा.

पण काहीही म्हणा, आज कितीतरी वर्षांनी हाताने लिहिलेलं पत्र वाचून उगाचंच हळव व्हायला झालं आणि पत्रावरची अक्षर पुसट झाल्या सारखी झाली. सगळा भूतकाळ जागा झाला.