Login

नमुनेदार बाई... पमा ताई भाग -२

स्त्री स्वभाव नाना तर्हा
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय-दिव्याखाली अंधार

नमुनेदार बाई... पमाताई
भाग-२

पमाताई तशाही बातमीदार म्हणूनच पंचक्रोशीत प्रसिद्ध. त्या दारात दिसल्या की कोणीही विचारायचं," हं ,काय नवीन बातमी?"
तर अशीही सईच्या लग्नाची वार्ताही पमाताई मार्फत सर्व गावभर पसरली.
पण तिखट मीठ लावूनच. 'आधीचच होतं तिचं.'हे प्रत्येक ठिकाणी सांगायला त्या विसरल्या नाहीत.
परिणाम व्हायचा तोच झाला.
सई तिच्या मैत्रिणीकडे गेली. तिच्याकडे शेजारच्या काळे काकू बसल्या होत्या .त्यांनी सईचे अभिनंदन केले आणि म्हणाल्या,"नाव काय ग मुलाचे?"
सई ,"सौरभ"
"कुठे झाली ग तुमची भेट? आधीचीच ओळख होती म्हणे. तुझा कॉलेजमधला मित्र आहे का तो?"काळे काकू खवचटपणे विचारत होत्या.
असे जिव्हारी लागणारे, खोटे, बिन बुडाचे आरोप ऐकून सईची तळपायाची आग मस्तकात गेली.
हा खरे तर तिच्या शालीन संस्कारावरच आरोप होता.

पण सईने शालीन संस्काराचाच परिचय देत तिथे काहीच न बोलता ती सरळ घरी आली.
आणि खोलीत जाऊन उशीत तोंड खूपसून रडत राहिली.

वास्तविक रीतसर चहा पोह्याचा कार्यक्रम झाला .मुलाने मुलगी पाहिली आई वडील मुलगा/मुलगी सगळ्यांची पसंती झाल्यानंतरच रीतसर लग्न ठरलं होतं.

खरे तर एका नातेवाईकाच्या लग्नात मुलाच्या आईवडीलांनी सईला बघितले . त्यांनी उपस्थित नातेवाईकाला विचारले," ही मुलगी कोण?"
नंतर त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून माहिती काढली.आणि त्यांनी मुलाशी बोलून मग निरोप पाठवला.

सईचे बाबा शरदरावांनी सुद्धा एक दोन ठिकाणी चौकशी केली. घर दार ,मुलगा कसा आहे? लोकं कसे आहेत?
दोन्हीकडे समाधान झाल्यानंतरच निरोप पाठवला गेला. दोन्हीकडच्या घरच्या लोकांच्या संमतीनेच लग्न ठरले.

त्यामुळे अशा खोट्या आरोपांनी सई दुखावली गेली.
तिच्या मनावर खूप खोल परिणाम झाला,
' लोकांनी आपल्याला बदचलन मुलगी ठरवले.'

ती घरात गप्प गप्प बसून राही.कुणाशी फारशी बोलत नव्हती. आई बाबांना वाटले हिला मुलगा पसंत नाही की काय?
ही बोलत का नाही आहे. ते काळजीत पडले. आपण तर लग्न ठरवायच्या आधी तिच्याशी बोललो, तिची संमती घेतली आता कुठे काय बिघडले?

शेवटी त्यांनी सईच्या मामाला फोन करून बोलावून घेतले. मामा जेव्हा सईशी बोलला तेव्हा सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.

ही वार्ता कुठून कुठे कशी पसरली? याचा उद्गम कुठून?
मामाने हे कसे शोधून काढले ?
आणि याचा कसा छडा लावला? ते बघूयात पुढील भागात .
क्रमशः
पुढील
भाग- ३ मधे
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all