Login

नमुनेदार बाई... पमा ताई भाग -३ अंतिम

स्त्री स्वभाव नाना तर्हा
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय-दिव्याखाली अंधार

नमुनेदार बाई... पमाताई
भाग-३ अंतिम

ज्या काळे काकूंनी सईला टोकले त्या काळे काकू कानावर हात ठेवून म्हणाल्या ,"मला नाही माहित बाबा मी असंच उडत उडत बाहेरून ऐकलं."
सईचा मामा फार हुशार त्याला माहीत होतं कुणीच कुणाचं नाव सांगणार नाही.
पण ठोकताळ्याने त्याने जाणलं ही वार्ता नक्कीच पमा ताईंनी पसरवली असेल.

तो मुद्दाम सकाळी सकाळी ब्रश करत पमा ताईंच्या घरी गेला, " अरे ताई आज तुमच्याच हातचा चहा घ्यावा म्हटलं म्हणत सोफ्यावर ठाण मांडले."
पमा ताईंना खूप खुशी सईचा मामा आता अजून काय नवीन माहिती पुरवतो.
त्यांनी छान चहा, बिस्कीट ,खारी डायनिंग टेबलवर मांडले.
चहाचे घोट घेत घेत गप्पांनाही तरतरी आली.
मामा मुद्दाम म्हणाला,"आजकालच्या पोरापोरींचं काही सांगता येत नाही. भरोसाच देता येत नाही. कुणाचं कुठे काय असेल."
झालं मामाचं हे वाक्य ऐकलं आणि पमा ताईंची गाडी सुसाट पळू लागली.
"हो ना मी तर सईच्या बाबतीतही असंच ऐकलं."

"हो का ? कुणी सांगितलं?"

"कुणी काय सांगावं लागते लक्षातच आलं असं तडका फडकी लग्न पक्क केलं तर."
मामाच्या सर्व प्रकार लक्षात आला होता.
"पमा ताई या ना ताईकडे बोलूयात आपण."
पमा ताईंच्या अंगावर मूठभर मास चढलं. आता आपल्याला अजून नवीन माहिती मिळणार .
पमा ताई घरी आल्यानंतर मामाने बहिणीला, जावयाला आणि सईला दिवाणखान्यात बोलवून घेतले.

आणि सरळ विषयालाच हात घातला.
सई च्या आईचं माहेर आणि पमाताईचं माहेर एकाच गावात.
पमा ताई सईच्या आई पेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान म्हणजे सईच्या मामाच्याच बरोबरीच्या.

त्यामुळे सईच्या मामाला पमा ताई विषयी त्यांच्या लग्नापूर्वीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी सगळीच माहिती होती.

मामाने एकदम तोफ गोळाच डागला पमाताई वर.
पमा ताई सगळ्या मुली काय तुम्हाला तुमच्यासारख्याच वाटल्यात काय ?
तुम्हाला काय वाटते मला काहीच माहिती नाही तुमच्या आणि प्रमोदच्या प्रेम संबंधाबद्दल?

आज जर मी तोंड उघडले तर तुमचीच छी थू होईल.
तुमच्या नवऱ्याला जर माहित झालं तर तुमचाच संसार मोडकळीला येईल.

तो लग्नाआधी करावा लागलेला गर्भपात. कदाचित म्हणूनच आज तुम्हाला मूलबाळ होऊ शकले नाही . खरे कारण जर तुमच्या नवऱ्याला कळले तर...?

पमा ताई जेवढा मोठा दिवा असतो ना तेवढाच मोठा त्याखाली अंधार असतो.
अशा खोट्या बदनाम्या करून तुमच्या 'दिव्या खालचा अंधार' काय कमी होणार आहे काय?
उलट त्याच अंधारात तुमचा आताचा सुखी संसार काळवंडून जाईल.

सईची खोटी बदनामी करू नका.
तिची व परिवाराची क्षमा मागा. आणि ज्या कुणाला हे सांगितलं असेल त्यांना सांगा की," सई संस्कारी मुलगी आहे तिने तिच्या आई-वडिलांनी निवडलेले स्थळ पसंत केले."

पमा ताई एवढेसे तोंड घेऊन निघून गेल्या.
सईला खूप हसू येत होते.
तिला पमाताई विषयी नवीनच माहिती कळाली होती.
समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all