Login

नणंदबाई तुमचाही अधिकार आहे...भाग 3 अंतिम

थोडं समजून घेतलं की नातं घट्ट होतं
नणंदबाई तुमचाही अधिकार आहे...भाग 3 अंतिम

श्वेताचे सासू-सासरे तीर्थयात्रेला गेले, श्वेता घरूनच काम करायला लागली.
आता सकाळी उठून आरवची मालिश, आंघोळ पासून सगळं श्वेताला करायला लागायचं. आरवच्या मागे तिचा बराच वेळ निघून जायचा, त्यामुळे श्वेताची आता चिडचिड व्हायला लागली होती.

अलका घरातली सगळी कामं करायची आणि श्वेता तिचं आणि तिच्या बाळाचं करायची.

बाजार आणणे, वाण सामान आणणे सगळं काम अलका करायची. श्वेताला अलकाच्या हातचा स्वयंपाक आवडायचा नाही त्यामुळे ती सतत जेवणाच्या टेबलवर चिडचिड करायची. एकदा श्वेता आणि आरव बाहेर गेल्यानंतर अलका राजीवशी बोलायला त्याच्या खोलीत गेली.


"राजीव येऊ का आत?"

"अग ताई ये ना, बोल काय म्हणतेस."

"काही नाही रे सहज बोलायला आले होते."

"बोल ताई, काही हवंय का तुला पैसे हवेत का घरखर्चाला?"

"आई देऊन गेली आहे मला. श्वेता कुठे गेली रे?"

"श्वेता तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, दिवसभर घरी राहून ती बोर होत होती म्हणाली की थोड्यावेळ मैत्रिणीकडे जाऊन येते."

"राजीव हल्ली श्वेताची चिडचिड खूप वाढलीये ना."

"हो दिसतेय ग मला, मी दिवसभर घरात नसतो पण संध्याकाळी आलो की सगळं लक्षात येतं माझ्या. ताई तुला त्रास होत असेल ना गं."

"त्रास असा नाही रे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून आनंदात राहायला हवं."

"मी बोलतो तिच्याशी, तू काळजी करू नकोस."

श्वेता घरी आल्यानंतर,
राजीव श्वेताशी बोलायला गेला.

"श्वेता काय चाललय तुझं? का चिडचिड करत असतेस?"

"राजीव तुला माझी चिडचिड दिसते पण माझ्या मागे जी काही कामे लागली ती तुला दिसत नाही. तू दिवसभर ऑफिसला असतोच मी माझं काम करून आरवला सांभाळते. त्याच्या आंघोळी पासून त्याच्या खाण्या-पिण्या पासून सगळं मी करते मग थोडी तर चिडचिड होणारच ना आणि मी नसताना तुझे कान भरले वाटतं कुणीतरी."

"श्वेता चुकीचा अर्थ काढू नकोस, असं काहीही नाहीये. श्वेता मला ऑफिसच्या कामाने आठ दिवस बाहेर जावे लागणार आहे त्यामुळे तुला अलकाताईशी जुडवून घ्यावं लागेल. कितीही चिडचिड झाली तरी तू चिडचिड करायची नाहीस कारण घरात आता तुम्ही दोघीच असणार आहात, ठीक आहे? आणि मला सांग ताईने थोडावेळ आरवचा सांभाळ केला तर काय बिघडते? तू उगाच तिचा राग राग करतेस."


"राजीव पॅकिंग करायला घे मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये."

राजीव ऑफिसच्या कामासाठी निघून गेला, आता घरात अलका आणि श्वेता दोघीच असायच्या.

एका सकाळी बराच वेळ झाला श्वेता रूममधून निघाली नव्हती. ती का आली नाही हे बघायसाठी अलका तिच्या खोलीत गेली.

आरव खेळत होता पण श्वेता अजून झोपलेली होती. ती हळूच तिच्याजवळ गेली तिच्या माथ्यावर हात ठेवला तर तिचं डोकं गरम होतं.

'बापरे हिला तर ताप आहे.'

तिने श्वेताला आवाज दिला, श्वेताने डोळे उघडले.

"अग तुला ताप भरलाय, मी तुला काहीतरी खायला आणते. गोळी घेतली का?"

तिने नकारार्थी मान हलवली.

"उठ उठ मी तुला काहीतरी खायला आणते त्यानंतर तू गोळी घेऊन घे."

अलकाने गरम गरम खिचडी बनवली, श्वेताला खिचडी भरवली आणि गोळी दिली, त्यानंतर श्वेता झोपली. श्वेता झोपल्यानंतर अलकाने आरवचं सगळं केलं, दुपारपर्यंत श्वेताचा ताप कमी झाला.


ताईंनी आरवचं सगळं केलं हे तिच्या लक्षात आलं.
दुसऱ्या दिवशी श्वेताला पुन्हा ताप आला तिला अपेक्षा होती की अलका खोलीत येईल पण अलका तिच्याच कामात होती. श्वेताच्या डोळ्यात अश्रू आले तिला अलकाबद्दल आपुलकी वाटायला लागली. मी ताईशी वाईट वागले, चुकीचे वागले हे तिच्या लक्षात आलं.

तिने अलकाला आवाज दिला, अलका खोलीत गेली.

"श्वेता अग आवाज दिलास का? काही हवंय का तुला?"

"हो ताई मला तुम्ही हव्या आहात."

अलका तिच्याकडे बघतच राहिली.

"काय? काय म्हणालीस तू?"

"तुम्ही जे ऐकलं तेच मी म्हणाले, मी खरंच चुकले. तुमच्याशी खूप वाईट वागले. तुमच्या फॅमिली मध्ये तुमचा नवरा, मुलगा नाही म्हणून माझ्या मनात नेहमी हीच भावना असायची की तुम्ही आरवला माझ्यापासून दूर तर करणार नाही ना, आरववर अधिकार तर गाजवणार नाही ना. मी त्याची आई आहे ना माझ्या मनात नको नको ते विचार यायचे.
ताई खरंच मला माफ करा मी तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं, मी चुकले ताई, खरंच मला तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी सारख्या आहात. मी तुम्हाला समजून घेण्यात चुकले.

ताई आरववर जितका माझा अधिकार आहे ना तितकाचं तुमचाही आहे.

श्वेताने अलकाचा हात हातात घेतला, आणि हसून

"नणंदबाई तुमचाही अधिकार आहे"

असं म्हणून दोघींनीही एकमेकांना मिठीत घेतलं.

समाप्त:

©®ऋतुजा वैरागडकर

कथा कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा, लाईक करायला विसरू नका धन्यवाद.


🎭 Series Post

View all