Login

नणंद भावजय-सख्ख्या मैत्रिणी... भाग 2

Nat nanad vahinich


नणंद भावजय-सख्ख्या मैत्रिणी...भाग 2
©®ऋतुजा वैरागडकर

सायलीने  घरात सगळ्यांना गोड बातमी सांगितली. सगळ्यांना खूप आनंद झाला. विवेक घरी नव्हता त्यामुळे विवेकला हे सांगता आलेलं नव्हतं. संध्याकाळ झाली सायलीने सगळं आवरलं आणि खोलीत जाऊन ती छान तयार झाली. रूममध्ये सगळीकडे तिने रेड बलून्सने डेकोरेट केलेलं होतं आणि सगळीकडे कॅन्डल्स लावलेल्या होत्या.

तिला ही गोड बातमी विवेकला सांगितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे होते, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता.

सगळ्यांचं जेवण झालं, सायली वाट बघत बसलेली होती पण विवेक आलेलाच नव्हता. सायलीने फोन केला पण त्याचा फोन लागत नव्हता बराच उशीर झाला रात्रीची अकरा वाजले तरीही विवेक आलेला नव्हता. सायली वाट बघून थकली आणि तशी झोपी गेली.


विवेक घरी आला पण तोही दारूच्या नशेत होता. सायलीला खूप राग आला होता, ती त्याच्याशी न बोलता तशीच उपाशी झोपली.

दुसऱ्या दिवशी आई-वडिलांकडून विवेकला हे सगळं माहित झालं, त्याने सायलीची माफी मागितली. सायलीनेही गोष्ट न वाढवता त्याला माफ केलं. विवेकने यानंतर कधीही दारूला हात लावणार नाही अशी शपथ घेतली.

हळूहळू दिवस सरत गेले, एक दिवस सायलीने सासूबाईंना सासऱ्यांसोबत बोलताना ऐकलं की आपल्याला नातूच हवाय, नाती झाली तर आपण कुठेतरी अनाथाश्रम मध्ये ठेवूया. आपल्या घरात पहिली नाती नकोय, मला पहिला नातूच हवाय. असं सासूबाई सासऱ्यांजवळ बोलत होत्या. 

हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटलं, पण ती कुणाजवळ काही बोलली नाही कारण बोलूनही अर्थ नव्हता. बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि सायलीने गोंडस बाळाला जन्म दिला. देवाच्या कृपेने तो मुलगा होता. सासूबाईला खूप आनंद झाला. त्यांनी सायलीचं सगळं खूप आनंदाने केलं. नातवाचे लाड केले, कोड कौतुकही केलं.

विवेकला बिजनेस मध्ये लॉस होत गेला आणि त्या टेन्शनमुळे तो पुन्हा दारू प्यायला लागला. मित्रांसोबत दारू  पार्ट्या करणे, बाहेर फिरत राहणे, रात्री उशिरा घरी येणे त्याचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला. सायलीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती निष्फळ ठरली. तो तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याची मनस्थिती बिघडत चाललेली होती.

सायलीला या सगळ्यांच खूप टेंशन आलं. तिने काहीतरी करण्याचं ठरवलं. स्वतःच्या पायावर उभ राहण्याचं ठरवलं.