Login

नणंदबाई तुम्ही खास आहात - भाग 1

अदितीचा माहेरी येते
संध्याकाळच्या सुमारास देशमुख वाड्याच्या अंगणात फुलांचा सडा पडलेला होता. तुळशी वृंदावनाजवळ चंदनाचा सुगंध दरवळत होता. आज विशेष कारण होतं  आदिती, घरातली लाडकी लेक, सासरी गेल्यानंतर भावाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच पंधरा दिवसांसाठी माहेरी येत होती. त्यामुळे तिची नवविवाहित वाहिनी अर्पिता आणि घरातले सगळेच खूप खुश होते.


अर्पिताच्या सासूचं तर लेक येणार म्हणून काय करू नी काय नको असं झालं होत. शेगडीवर दूध तापत असताना देखील ती अधूनमधून दाराकडे बघत होती. तिचे सासरे पेपर वाचत असले, तरी त्यांची नजरही वेळोवेळी गेटकडे वळत होती. राहुल तिचा नवरा देखील बहिणीच्या आवडीचे पदार्थ आणायला गेला होता. आणि अर्पिता ती तर घरातल्या सर्वात उत्साही सदस्यासारखी, आदितीच्या स्वागताची सजावट करत होती, तिचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता.


“आई, ही झेंडूची माळ लावू का दरवाज्यावर?”

“ आणि बाबा,ही गुलाबाची फुलं ठेवू का फुलदाणी मध्ये. आदिती ताईंना फुलं आवडतात ना... आवडेल का त्यांना हे?? "


अर्पिता, आदितीला अजून नीट ओळखत नव्हती. पण राहुलकडून आणि तिच्या सासरच्याकडून अनेक वेळा तिच्याबद्दल ऐकलेलं. थोडी तापट असली तरी हसतमुख, आणि हळवी होती ती. त्यामुळेच अर्पिताला आदितीबद्दल एक जिज्ञासा निर्माण झाली होती. आपली नणंद आता आपलीही मैत्रीण होईल, ही गोष्ट तिच्या मनाला आनंद देत होती. फोन वर त्यांचं बोलणे हे जुजबीच असायचं. त्यामुळे एवढी आपुलकी अर्पिताला तरी निर्माण झाली नव्हती.


गाडीच्या हॉर्नने घरातले सगळे बाहेर धावत आले. गाडीतून आदिती उतरली पण प्रवास केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, तरी सुद्धा डोळ्यात समाधान होत आपल्या माहेरच्यांना एवढ्या दिवसातून भेटल्याच. आईच्या मिठीत ती हरवून गेली. तर बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

"माझी आठवण येत नाही ना आता...?? "

तिने राहुलला विचारलं. तसं तो हसून म्हणाला,

“हा मग आता अर्पिता आले, मग तुझी आठवण का येईल???”


ह्यावर सगळेच हसले, कारण सगळ्यांना ठाऊक होत. तो मस्करी करतोय. पण आदितीला मात्र ती गोष्ट खूप लागली. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात विरलं. तिला वाटलं, आपलं या घरातलं स्थान कुठे हरवल तर नाही ना हिच्या येण्याने?


ती काहीच न बोलता आत गेली. तसं अर्पिता पटकन पुढे आली आणि तिचा हात पकडत म्हणाली,


“ताई, खाली खोलीत सगळं लावून ठेवलंय तुमच्यासाठी. तुम्ही फ्रेश व्हा... मी लगेच चहा घेऊन येते.”

आणि हसून चहा बनवायला निघून गेली सुद्धा. पण इकडे अदिती मात्र तिच्याच कडे बघत बसली.

खरच तिचं स्थान हरवलं होत का घरातलं?