जलदकथा
मागील भागात आपण पाहिलं की, विभीताला सगळेच ओटी भरण्यापासून अडवतात. पण आशुतोष त्यांच्या विरोधात जातो. आता पाहूया पुढे,
आशु, अरे बरोबर बोलत आहेत त्या... त्यांच्या मुलीची त्यांना काळजी वाटणं साहजिकच आहे ना रे... मीच जाते इथून,”
विभीता शांत आवाजात म्हणाली, पण त्या शांततेत किती वेदना होत्या, हे फक्त आशुतोषलाच जाणवत होतं.
“आणि तसही मलासुद्धा नाही आवडणार, माझी काळी सावली तुमच्या येणाऱ्या बाळावर पडलेली. मी बाहेर आहे, कार्यक्रम झाला की जाईन.”
असं म्हणून तिने ते ओटीच सामान प्रेरणाच्या आईच्या हातात दिल.
"अग पण ताई... तू का लोकांच्या बोलण्यात येतेस?”
आशुतोष पुढे झाला. आता त्याचा आवाज देखील किंचित थरथरत होता.
“मी सांगतो ना, इथे जमलेल्यापैकी माझं खरं हित जपणारी तूच आहेस! तेव्हा तूच भर ओटी!”
तो काकूळतीला येऊन म्हणाला. तस विभीता त्याच्याकडे पाहून हलकं हसली.
“आशु बाळा, नको हट्ट करूस... मी ठीक आहे…”
असं म्हणून ती हळूहळू दरवाजाजवळ जातच होती की प्रेरणाचा आवाज आला,
"म्हणजे, सगळंच तुमचं तुम्हीच ठरवलं तर पण बाळाच्या आईला न बाळाला काय वाटत हे कुणीच नाही विचारलं...."
ते ऐकून सगळेच तिच्याकडे पाहू लागले...
" ताई, माझी ओटी तुम्हीच भरणार... हा तुमचाच मान आहे. "
"प्रेरणा काय बोलतेस तू डोकं ठिकाणावर आहे का तुझं... सगळ्यात जास्त काळजी तर तुला वाटली पाहिजे ना? त्या बाईच्या हातून…"
प्रेरणाची आई चिडून म्हणाली,
"मग काय ही पोर तर तिला जीव लावतात पण विभीताने आज तरी इथे यायला नको होत ना??"
" मग काय उगाच तमाशा करायला इथे आली. "
आजूबाजूच्या बायका बडबड करत होत्या, आणि ते ऐकून विभीताला सुद्धा आपण उगाच इथे आलो असं वाटुन गेलं.. यानंतर मी इथे कधीच येणार नाही हे तिने मनोमन ठरवलं सुद्धा. मनातच विचार करून तिने पाऊल बाहेर ठेवलं न तेवढ्यात तिच्या हाताला कुणाचा तरी विळखा पडलेला दिसला. तिने पाहिलं तर प्रेरणाने तिचा हात पकडला होता.
"ताई, तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष न देता माझी ओटी भरून द्या. तुमचं इथे असणे आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. हे दुसरं कुणी नाही समजू शकत. चला तुम्ही. " माझ्यासाठी व बाळासाठी तुमचा आशीर्वाद मोलाचा आहे. तुम्हाला ठाऊक नाही, पण तुमच्या हातात देवीचा आशीर्वाद आहे.”
भरलेल्या डोळ्यांनी प्रेरणा तिला विनवणी करत बोलली.
पण विभीता मागे सरली.
“नको बाळा... प्लीज... तुला काही झालं तर मी स्वतःला कधीचं माफ करू शकत नाही. आई होणं म्हणजे काय, ते मी अनुभवलं नाही पण त्याचं मूल्य मी ओळखते... मी येईन नंतर, सगळं झालं की...”
तस प्रेरणानं तिचे हात घट्ट धरले..
“ताई, तुम्हांला बाळाची शपथ! माझी ओटी तुम्हीच भरणार, एवढं तरी करा...”
असं म्हणून तिनं आपला हात घेऊन आपल्या पोटावर ठेवला. आता मात्र तिचा नाईलाज झाला, सगळ्यांच्या बोचऱ्या नजरा सहन करत कशीतरी ती त्या सगळ्या घोलक्यामधून पुढे गेली.सगळीकडे कुजबुज सुरू होती, पण आशुतोषच्या डोळ्यांत मात्र समाधान होतं.
प्रेरणाची आई पुन्हा काही गोंधळ घालेल का??
क्रमश:-
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा