Login

नणंदबाईचे माहेरपण भाग -३(अंतिम)

नणंदबाईला तिचे माहेरपण अनुभवायला मिळेल का?
#जलदलेखनस्पर्धा

विषय: नणंदबाई येती घरा.
शीर्षक: नणंदबाईचे माहेरपण-भाग ३(अंतिम)

सकाळी लवकर उठून निशाने रांगोळी काढली होती आणि तसेच देवाला प्रार्थना करून तिने आपल्या नवऱ्याला सुद्धा उठायला सांगितले.

"हे काय अजून तुम्ही उठले नाही आहात? अहो, लवकर उठा." तो अजूनही झोपलेला आहे, बघून ती म्हणाली.

" माझ्यासाठी दिवाळी ही कालच संपलेली आहे." असे म्हणून तो उठून आंघोळ करण्यासाठी गेला.

तिने नाही मध्ये मान हलवली आणि बाहेर सर्वांना नाष्टा देण्यासाठी गेली.

" आई आणि बाबा तुम्ही परवानगी घेतलेलीच आहे. फक्त काही झाले तर तुम्ही माझ्यासोबत असा. " निशा आपल्या सासू-सासऱ्यांकडे बघून म्हणाले.

" ती येणार आहे ना?" त्यांच्या डोळ्यांमध्ये तिच्या येण्याची आस त्यांना लागून राहिली होती.

" हो, मी आता निघते आणि त्यांना घेऊनच येते." ती म्हणाली.

नाश्ता करण्यासाठी बाहेर आलेला रोशन भिरभिरत्या नजरेने आपल्या बायकोला शोधत होता.

" निशा, कुठे गेली आहे? मला तर दिसत नाहीये. नाश्ता होऊन सुद्धा ती अजून कुठे दिसत नाहीये." म्हणून त्यांनी आपल्या आईला विचारले.

"ती बाहेर गेली आहे. एका तासाभरामध्येच येईल."  नजर चुकवत रोशनची आई म्हणाली.

" अशी कुठे गेली आहे ती? मला काही सांगितलं नाही. जर काही सामान राहिले असेल, तर मी सुद्धा तिच्यासोबत गेलो असतो ना ." तो म्हणाला.

" ती लगेच येईल." त्याचे बाबा म्हणाले.

मामांच्या दुसऱ्या बहिणीकडे सुद्धा जायचे होते, म्हणून लवकरच रोशनच्या आईने आपल्या भावाचे औक्षण केले आणि त्यानंतर ते दोघेजण दुसऱ्या बहिणीकडे गेले.

दाराची घंटी वाजली आणि आपली बायको आली असेल म्हणून रोशनने घराचे दार उघडले.

समोर आपल्या बायकोला बघून त्याचा आनंदी झालेला चेहरा, तिच्यामागे असलेल्या व्यक्तीला बघून मात्र पडला होता.

"ताई , आतमध्ये चला." निशाने तिचा हात धरत घरामध्ये येण्यासाठी सांगितले.

" खबरदार निशा, जर तू तिला आतमध्ये घेतलेस तर !" रोशन रागाने म्हणाला.

" अहो, त्यांचा पण या घरावर हक्क आहे आणि त्या त्यांच्या माहेरी का येणार नाहीत ?" निशा विचारत होती.

" तो हक्क तिने कधीच गमावला आहे, त्यामुळे तिच्यासाठी ह्या घराचे दार बंद आहे." तिच्यावरून नजर फिरवत निशाला तो म्हणाला.

" वहिनी, यासाठीच मी इथे नको यायला म्हणत होते. उगाचच तुमच्यावर दादा ओरडत आहे."  ती म्हणाली.

" मग एवढे माहीत आहे ना? तरीसुद्धा वर तोंड करून इथे निघून आलीस?  रोशनच्या आवाजामध्ये जरब आणि त्याच्या काटेरी टोमण्याने त्याच्या बहिणीला ते मनाला टोचले होते.

मागे उभे असलेल्या त्याच्या आई-वडिलांकडे पाहत निशाने डोळ्यांनीच त्यांना मदतीसाठी आर्जव केला होता.

" शिवू, ये बाळा. आत मध्ये ये." बाबा म्हणाले.

" पण बाबा, दादा..."  तिने एकवार रोशनकडे बघितले.

" जसे हे घर त्याचे आहे, तसे तुझे सुद्धा आहे. मी म्हणतोय म्हणून तू घरामध्ये ये." बाबा आपल्या मुलीला म्हणाले.

ती घरात येते बघून रागाने रोशन तिथून निघून आपल्या खोलीत गेला आणि जोरात त्याने दरवाज्याचे दार आपटून बंद केले.

लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलेल्या आपल्या मुलीची गळाभेट रोशनच्या आईने घेतली. त्या दोघींना अश्रू अनावर झाले होते. तब्बल एक वर्षाने आपल्या मुलीला त्या बघत होत्या.

शिवानीने आपल्या इच्छेनुसार लग्न केले होते आणि त्याला रोशनचा विरोध होता, त्यामुळे तिने पळून जाऊन लग्न केले होते. असे केल्याने कित्येक नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिच्याबद्दल आणि रोशनच्या घरातल्यांबद्दल खूप काही बोललेले त्याच्या कानावर आले होते. आपल्याच घराण्याची इज्जत, आपल्या बहिणीने पळून जाऊन लग्न केले म्हणून गेली; त्याचा राग रोशनच्या मनामध्ये होता आणि त्यामुळेच त्याने तिच्याशी संबंध तोडले होते. तिने इथून पुढे कधीच त्या घरामध्ये पाऊल ठेवायचे नाही, असे सुद्धा त्याने निक्षून सांगितले होते.

निशाला मात्र आपल्या सासू-सासऱ्यांची आणि त्यांच्या मुलीची भेट व्हावी, असे वाटत होते. तसेच तिने तिचे माहेरपण अनुभवावे म्हणूनच त्यांनी सुद्धा निशाने जेव्हा हा विषय काढला, तेव्हा या गोष्टीला होकार दर्शवला होता.

खोलीच्या दुसऱ्या चावीने निशाने दरवाजा खोलला आणि समोर तिला बघून रोशनने बोलायला सुरुवात केली,
"तुला माझ्या विरोधात जाऊन काय मिळालं निशा?  तुला माहीत आहे, मला तिचा चेहरा सुद्धा बघायचा नाही. तरीसुद्धा तू , तिला घरी आणलेस. ज्यावेळेस तिने प्रेमासाठी हे घर सोडले होते, त्यावेळेस तिने घराचा विचार सुद्धा केला नाही. मग आता मी का तिचा विचार करायचा ?

तिच्यामुळे माझ्या आई-वडिलांच्या संस्कारावर बोट ठेवले गेले. अनेक कार्यक्रमांमध्ये आम्हाला येण्यास आमच्याच नातेवाईकांनी मनाई केली होती, का तर माझ्या बहिणीने जातीच्या बाहेर जाऊन लग्न केले होते. त्याचा मनस्ताप आम्हाला किती झाला याची कदाचित तुला कल्पनाही नसेल, परंतु तू हे आज तिला घरात आणले; हे खूपच चुकीचे केले."  तो तिचे दोन्ही दंड हाताने पकडून तिला रागात म्हणाला.

" तुम्हाला दुःखी केले त्याबद्दल मला वाईट वाटते, परंतु आई-बाबांचा आनंदाने भरलेला चेहरा मला बघायचा होता. मला मान्य आहे, ताईंनी चूक केली; परंतु आता त्यांच्या संसारामध्ये त्या सुखी आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा आता तुमचा राग बाजूला ठेवा. तुमची बहीण सुखामध्ये नांदायला हवी हेच तुम्हाला हवे होते ना ? " तिने त्याच्याकडे बघत शांतपणे विचारले.

" पण त्यामुळे आम्हाला किती मनस्ताप झाला हे कसं तुला कळत नाही?"  तो अजूनही त्याच गोष्टीवर अडून होता.

" हे बघा, आता त्या इथे आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या. मोठ्या भावाचं कर्तव्य असतं आपल्या लहान भावंडांना समजून घेणे आणि  त्यांच्याकडून चुका झाल्या तर माफ करणे. प्रत्येक कर्तव्य तुम्ही नीट पार पाडता. त्या सुद्धा तुमच्या प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. त्यामुळे एकदा तुम्ही त्यांच्याकडून ओवाळून घ्या. बघा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल." 

" म्हणजे तुला हीच पाडव्याची भेट हवी होती?"  त्याला आता कुठे समजायला लागले होते.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी तिने ओवाळल्यावर त्याने तुला काय हवे, असे विचारले होते. त्यावेळेस ती वेळ आल्यावर ती मागेल, असे बोलली होती.

" अगदी बरोबर, ताईंना त्यांचं माहेरपण अनुभवायला मिळावं, ह्याच गोष्टीला तुम्ही मान्यता द्यावी आणि हीच माझी पाडव्याची भेट आहे." ती म्हणाली.

" दुसरे काहीतरी माग. मला हे शक्य नाही."  तो अजूनही या गोष्टीसाठी तयार नव्हता म्हणून म्हणाला.

" मला द्यायचं असेल तर हेच द्या. नाहीतर मला दुसरे काही नको. पहिला दिवाळी सण असताना तुम्ही मला या गोष्टीसाठी नकार देत आहात. हे मी कधीच विसरणार नाही." असे म्हणून ती खोलीतून बाहेर निघून गेली.

आधी सर्वांनी आशेने तिच्यासोबत तो सुद्धा येईल म्हणून बघितले, परंतु ती एकटी आलेली बघून रोशनचे आई-वडील आणि त्याची बहीण हिरमुसले.

दाराची पुन्हा घंटी वाजली आणि त्यावेळेस निशाचा भाऊ आलेला होता.

" खरं तर, मी तुला घेऊन जाण्यासाठी आलेलो होतो; पण तूच बोललीस की पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेस. ठीक आहे, काही हरकत नाही. मी पुढच्या आठवड्यात येईन. " औक्षण केल्यानंतर तो तिला म्हणाला.

"हो दादा, ते माझ्या ताई आलेल्या आहेत आणि दोन-तीन दिवस तरी त्या राहणार आहेत. त्यामुळे मी त्या गेल्यानंतरच येईन." ती म्हणाली.

आपली सून समजतदार आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती रोशनच्या आई-वडिलांना आली होती; पण हाच थोडासा समजूतदारपणा आपल्या मुलामध्ये असता तर किती बरे झाले असते. असा सुद्धा विचार त्यांच्या मनाला शिवला होता.

निशा तिच्या हातातील ओवाळणीचे ताट बाजूला ठेवणार तेवढ्यात, " ते ताट शिवानीला दे."  रोशन म्हणाला.

त्याने असे म्हणताच सर्वांना खूप आनंद झाला.

पाटाच्या भोवती रांगोळी काढलेली होती आणि त्या पाटावर पांढरी टोपी घालून रोशन बसला होता आणि शिवानीने भरलेल्या डोळ्यांनी आपल्या भावाचे औक्षण केले.

ओवाळणीचे ताट रिकामे ठेवायचे नसते, म्हणून रोशनने त्याच्या कुर्त्यामध्ये जेवढे पैसे होते तेवढे सगळे त्यात ठेवले. जी काही भेट तिला पाहिजे असेल, ती सुद्धा ती मागू शकते असेही सांगितले.

तिने ओवाळणीचे ताट बाजूला ठेवले आणि उभे राहिलेल्या आपल्या भावाला घट्ट मिठी मारत एवढ्या दिवसांचा दुरावा दूर केला.

भाऊबीजेच्या दिवशी सर्वजण एकत्र जेवत होते.

नणंद घरी आल्यावर झालेला आनंद निशाने पाहिला आणि मनोमन देवाचे आभार सुद्धा मानले.

"वहिनी, खरंच तुम्ही या घराची गृहलक्ष्मी आहात. तुमच्यामुळेच मला माझे माहेरपण अनुभवता येत आहे. त्यासाठी खूप धन्यवाद." आपल्या वहिनीला मिठी मारत शिवानीने सांगितले.

" खरंतर हा तुमचा हक्कच आहे ताई. तुम्ही जरी लग्न केले असले तरी सुद्धा तुम्ही जशा आई आहेत तशा तुम्ही सुद्धा या घराच्या लक्ष्मी आहात. लक्ष्मीला नाराज करणे बरोबर नाही ना!" निशा हसतच तिला म्हणाली.

नात्यातील दुरावा दूर होऊन ते नाते घट्ट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all