Login

नणंदबाईंची दिवाळी - २

नणंद भावजय एकमेकींना समजून घेणाऱ्या असतील तर घरात कधीच वाद होणार नाही.
नणंद बाईंची दिवाळी - २
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५


श्वेताचे लग्न झाले आणि इकडे मधुरा एकटी पडली. रोज दोघींमध्ये फोनवर बोलणे होत असे. तिला फराळ बनवायला मधुरानेच शिकवले ते ही फोनवर. घरात काय काय घडले किंवा एखादी नवीन रेसिपी बनवली तर त्या लगेच एकमेकींना सांगायच्या. नणंद कमी आणि एखादी लहान बहीण असती तर अशीच असती, असे नेहमी मधुरा श्वेताला म्हणायची.

दोघींचं छान जमायचं. एकमेकांवर हक्क गाजवणे, एकमेकींच्या वस्तू हक्काने आपल्या म्हणून घेणे हे सोपे होते त्यांच्यासाठी. मधुराने कधीही तिला ओरडले नाही, की तिच्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हटले नाही आणि ह्याच स्वभावामुळे त्या एकमेकींच्या खूप जवळच्या होत्या.

पण, आता दिवाळी आली होती. जशी श्वेता तिची लग्नानंतर पहिली दिवाळी म्हणून घरी येणार होती अगदी तसेच मधुराच्या माहेरी सुद्धा तिची आतुरतेने वाट बघत होते.

दिवाळी छान झाली. सगळीकडे दिव्यांचा प्रकाश पसरला होता. सगळे वातावरण उजळून निघाले होते आणि त्यात मधुरा खुलून दिसत होती. तिकडे श्वेताची दिवाळी सुद्धा अगदी धूमधडाक्यात साजरी झाली. पहिली दिवाळी, पहिला फराळ, नवीन साडी, नवा दागिना. तिच्या सासरी पण तिचे सगळ्यांनी कौतुक केले. लक्ष्मी पूजन झाले, पाडवा झाला आता दुसऱ्या दिवशी भाऊबीज म्हणून तिने बॅग भरायला घेतली होती.

घरी जाताना काय काय भरायचे हे तिने आधीच ठरवून घेतले होते; त्यामुळे जास्त वेळ नाही लागला. सासूबाईंनी भरपूर गिफ्ट आणि मिठाईची मोठं मोठी पाकिटे दिली होती. सगळ्यांसाठी काही ना काही पाठवले होते.

"आई अहो इतके सगळे?"
श्वेताने बॅग भरून मिठाई आणि गिफ्ट बघून बोलले.

"अगं लग्नानंतर पहिली दिवाळी तुझी माहेरी, मग अशी रिकाम्या हाती थोडीच पाठवणार तुला!"
तिच्या सासूबाई म्हणाल्या तशी श्वेता हसली. तिच्या सासूबाई पण छान होत्या. समजून घेत होत्या तिला; त्यामुळे तिच्या माहेरी काळजी करण्याचे काहीच कारण नव्हते.


श्वेता दिसायला अगदी नाजूक गोरीपान होती; त्यामुळे तिच्या अंगावर सगळेच रंग शोभून दिसायचे. भरजरी साडी, गळ्यात मोठे मंगळसूत्र नेकलेस, हातात डझनभर हिरव्या बांगड्या सोन्याचे कडे, कानात वेल आणि झुबे, भांगेत भरलेले कुंकू शोभून दिसत होते तिला.

"मी काय म्हणतो, जास्त दिवस नाही थांबायचं माहेरी. लवकर निघून ये इकडे."
श्वेताचा नवरा तिला बघून म्हणत होता.

"का? मी तर चांगली आठवडाभर राहून मगच परत येणार आहे."
श्वेता मुद्दाम चिडवत बोलली.

"नको ना! मला करमणार नाही तुझ्याशिवाय."
असे म्हणून त्याने तिला गच्च मिठीत कवटाळून घेतले आणि ती सुद्धा जरा वेळ विसावली.
सगळी तयारी करून दोघे नवरा बायको निघाले. माहेरी फोन करून आधीच कळवले होते.

इकडे आई भाऊ आणि मधुरा तिची वाट बघत होते. श्वेता येणार म्हणून मधुराने सगळे तिच्या आवडीचे बनवून ठेवले होते. आई घरातून इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होती. भाऊ तर मुद्दाम तिला चिडवायचे म्हणून तयारीत बसला होता.


क्रमशः