Login

नणंदबाईंची दिवाळी - ३ अंतिम भाग

नणंद भावजय एकमेकींना समजून घेणाऱ्या असतील तर घरात कधीच वाद होणार नाही.
नणंद बाईंची दिवाळी - ३ अंतिम भाग
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५


"मधूरा, अगं कधी निघणार आहेस? आम्ही वाट बघत बसलो होतो तुझ्या फोनची."
मधुराने फोन उचलताच समोरून आई बाबा तिला विचारू लागले आणि हेच तिच्या नवऱ्याने ऐकले.

त्यालाही समजले. 'आपली बायको पण भाऊबीजेला दरवर्षी माहेरी जाते. ती सुद्धा एकुलती एक मुलगी आहे. एकुलती एक बहिण आहे. तिच्या माहेरी पण तिची वाट बघत असणार हे साहजिक आहे, पण इकडे श्वेताची पहिली दिवाळी; म्हणून आपण सगळे त्यातच मग्न होतो. मधुराचा जरा सुद्धा विचारच नाही आला मनात.'
असे म्हणून सूरज मनातल्या मनात विचार करू लागला.

"आई, अगं ह्यावेळी थोड्या उशिराने येईन मी. सध्या आमच्या लाडक्या नणंदबाईंच्या भाऊबीजेची तयारी सुरू आहे इकडे. पहिली दिवाळी आहे ना तिची मग सगळं कसं छान झालं पाहिजे ना!"
मधुरा अगदी समजुतीने बोलत होती. तिला फोनवर बोलताना पाहून सूरज मनातून अगदी हळवा होतं होता.

"किती समजूतदार आहे माझी बायको."
असे म्हणून त्याने मधुराला जवळ घेतले.

"हो मग, आहेच मी हुशार."
असे म्हणत मधुरा गोड हसली.


"अगं पण तू तर भाऊबीजेला माहेरी जाणार होतीस ना! दरवर्षी तू पण ह्याच दिवशी जातेस ना! आणि ह्यावेळी तर तुझे दुबईचे काका काकू पण येणार होते ना तुला भेटायला."
सूरजने तिला आठवण करून देत म्हटले.

"हो, मी पुढच्या आठवड्यात जाऊन येईन एक दिवस.. पण आता आपण श्वेता आणि जावयाची पहिली दिवाळी साजरी करूया. त्यांच्यासोबत सुंदर आठवणी साठवूया."
मधुरा बोलत होती आणि सूरज तिच्याकडे बघत होता. इतक्यात बाहेर उभ्या असलेल्या सासूबाई आत आल्या.

"माझं भाग्य किती उजळ, की अशी समजून घेणारी सून मिळाली."
असे सासूबाई बोलल्या आणि सगळे आनंदाने हसायला लागले. इतक्यात बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला तसे तिघे पण बाहेर आले. 

"श्वेता."
असे म्हणून मधुरा पुढे गेली आणि दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली.

"अरे घरात तर या आधी. बाहेरचं सुरू झालं ह्यांचं."
सूरज त्या दोघींकडे बघत भाऊजीना घेऊन घरात आला.

श्वेता आल्याबरोबर चहा पाणी आणि घरातल्या सगळ्यांची चौकशी करून झाली. फराळाचे ताट भरून ठेवले, दोघांना औक्षण केले आणि आहेर दिला गेला. श्वेताने पण सासरहुन येताना भरपूर काय काय आणलेलं ते सगळं दिलं. जेवण पण सगळे दोघांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन बनवले होते; त्यामुळे साग्रसंगीत झाले सगळे. श्वेताला दिवाळीत माहेरपणासाठी सोडून जावई पुन्हा घरी निघून गेले.

संध्याकाळी श्वेताने औक्षणाचे ताट तयार केले आणि सूरजला ओवाळले. दोघा भावाबहिणीची मजा मस्ती सुरूच होती. श्वेता आल्यापासून घरात वेगळाच आनंद जाणवत होता.

आईला तर मुलगी घरी आल्यापासून सारखं तिलाच बघत, ऐकत बसावं वाटतं होतं. श्वेता तिच्या सासरच्या गोष्टी सांगत होती आणि इकडे आई मधुरा दोघी तिला मन लावून ऐकत होत्या. मधेच मधुराचा फोन वाजला.

"भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा लाडके बंधुराजे. अशीच प्रगती करत रहा, खूप मोठा हो. सगळी नाती अशीच मनापासून जपून रहा."
मधुरा फोनवर भावासोबत बोलत होती.

"बरं ते सगळं ठीक आहे, तू कधी पोहोचतेस सांग?"
पलीकडून विचारण्यात आले.

"अरे ह्यावेळी मला नाही जमणार यायला, मी पुढच्या आठवड्यात येईन. आता तुला फोनवरच ओवाळते थांब."
असे म्हणून मधुरा खरचं व्हिडिओ कॉलवर त्याला ओवळत होती. तिला बघून श्वेता पण तिच्या जवळ आली.

"वहिनी, अगं फोनवर काय ओवाळते. तू पण माहेरी जातेस ना आज?"
श्वेताला माहिती होते भाऊबीजेला मधुरा पण माहेरी जात असते.

"नाही, ह्यावेळी आपण इकडे करूया तुमची भाऊबीज आणि दिवाळी. मी पुढच्या आठवड्यात जाऊन येईन एक दिवस."
मधुरा हसून बोलली, पण श्वेताला कळून चुकले की यावर्षी तिची लग्नानंतर पहिली दिवाळी; म्हणून वहिनी तिच्या माहेरी जाणार नव्हती.


श्वेताला थोडे वाईट वाटले. 'आपली दिवाळी छान व्हावी. माहेरपण आरामात व्हावे म्हणून ही गेली नाही.' श्वेता मनातल्या मनात विचार करू लागली. तिला खूप मस्त भन्नाट आयडिया डोक्यात आली आणि तिने ती करायची ठरवले, पण यात तिला आईची आणि भाऊची मदत लागणार होती. ठरवल्याप्रमाणे तिने दोघांना बाजूला घेऊन सर्व सांगितले. मधुराला अजिबात कळणार नाही याची त्या तिघांनी काळजी घेतली.

"बरं वहिनी, आज आपण जेवायला बाहेर जाऊया का? घरात तेच फराळाचं आणि मिठाई खाऊन तोंड खूप गोड गोड झालंय. मला नाही खायचं आता ते. मस्त चमचमीत असं काहीतरी खावंस वाटतंय."
श्वेता बोलली आणि सूरजने लगेच ठरल्याप्रमाणे तिच्या हो ला हो म्हंटले.


"मधुरा आपण बाहेर जातोय रात्री जेवायला; त्यामुळे तू घरात काही बनवू नको."
सूरज तिला बोलून मोकळा झाला.

"बरं ठीक आहे. मी आवरते बाकीचं."
मधुरा असे बोलून निघून गेली, इकडे सूरज आणि श्वेताने एकमेकांना टाळ्या दिल्या.

चौघे जण मस्त तयार होऊन बाहेर जायला निघाले. सूरज श्वेता आई तिघेही एकमेकांना काहीतरी खाणाखुणा करत बोलत होते, पण मधुराला मात्र यातले काहीच कळत नव्हते. थोड्याचवेळात ते एका मस्त हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल खूपच भव्यदिव्य होते. ते सगळे पहिल्यांदाच येत होते त्या हॉटेलमध्ये; त्यामुळे आत जाता जाता जिथे छान वाटेल तिथे फोटो काढत काढत मधे जात होते.

"या सर, इकडे आपला टेबल बुक आहे."
असे म्हणून तिथल्या मॅनेजरने सगळ्यांना टेरेसवरच्या मजल्यावर नेले. जिथे सुंदर लायटिंग केलेली होती आणि आजूबाजूला झाडं ठेवलेली होती. मध्यभागी खूप मोठ्ठा टेबल सजवून ठेवला होता.

"इतका मोठा टेबल!"
मधुरा बघतच राहिली. इतक्यात तिच्या मागून तिचे आई बाबा, दुबईचे काका काकू त्यांची फॅमिली आणि तिचा भाऊ.. असे सगळे एकदमच आत आले. त्यांना सगळ्यांना आलेले बघून मधुरा तर आनंदने आश्चर्यचकित होऊन बघत होती. नंतर सूरजकडे बघून ती त्याला खुणेनेच थँक्यू म्हणत होती, कारण तिला माहिती होते हे सगळं डोकं त्याचच असणार.

"आज मला नाही, तर श्वेताला थँक्यू म्हण. कारण हे सगळं डोकं तिचच आहे. मी तर फक्त तुम्हाला वेळेत इथे घेऊन आलोय आणि यात तुझा भाऊ सुद्धा सामील आहे. हे सगळं त्याने प्लॅन केलेलं आहे. हे हॉटेल त्यानेच ठरवले. सगळी बुकिंग त्यानेच केली दुपारी सांगितल्या बरोबर. जा आता भेटून घे सगळ्यांना."
सूरज तिला जवळ घेऊन सांगू लागला. तिच्या डोळ्यात पाणी यायचं बाकी होत फक्त.

"सूरज, खरचं थँक्यू."
असे म्हणून मधुरा तिच्या माहेरच्याना भेटायला गेली. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. छान पोटभर जेवण झाले आणि नंतर आईस्क्रीम पण झाली.

"श्वेता, ही दिवाळी खूप खास केलीस तू माझ्यासाठी."
मधुरा श्वेता जवळ जात बोलली.

"तू नाही का खास करत माझ्यासाठी दरवेळी. मग इतना तो बनता है ना! माझी भाऊबीज छान व्हावी; म्हणून तू स्वतः च्या माहेरी गेली नाहीस. मला नाही आवडलं हे. मी इकडे मजा करू आणि तिकडे तुझेही आईबाबा वाट बघत होते, मग म्हटल सगळ्यांनाच एकत्र आणुया आपण; म्हणून मग हे सगळं ठरवलं आम्ही. हे सरप्राइज आवडले ना तुला?"
श्वेता अगदी मधुराच्या खांद्यावर हात ठेवून हक्काने बोलत होती. मधुरा तर तिच्या गळ्यातच पडली आणि तिची पप्पी घेतली.

"आई अगं ह्या दोघींची नजर काढ घरी गेल्यावर. इतक्या चांगल्या नणंद भावजय पाहिल्यात का कधी कोणी? ह्यांच्याकडे बघून मलाच रडू येईल आता." असे म्हणून सूरज मुद्दाम खोटं खोटं डोळ्याला रुमाल लावत बोलला तसे सगळे हसायला लागले.


समाप्त