Login

नणंद बाईंचा मानपान ( भाग एक)

मानपानावरुन लग्नात भांडणारी नणंद बाई वहिनी बरोबर नीट वागत नाही.तिचे लग्न होते आणि तिची नणंद ही तिच्याबरोबर नीट वागत नाही तेव्हा तिला वाटते ,कर्म परतून आलेय, मी वहिनी बरोबर असेच वागले ,तिला तिची चूक कळली आणि वहिनीची माफी मागून, इथून पुढे प्रेमाने नातं जपण्याचा निश्चय करते.

#जलदलेखन स्पर्धा - आक्टोबर२०२५

विषय- 'नणंदबाई येती घरा'

शीर्षक - नणंद बाईंचा मानपान ( भाग एक)


सरिता आणि संजयचं लग्न अतिशय थाटामाटात पार पडलं, पण त्याला थोडं गालबोट लागलं.

लग्नाचे सगळे विधी छान पार पडले. पाहुणे रावळ्यांना घरी परतायची घाई होती म्हणून शेसा भरण्याचा विधी लगेच घेतला. पहिल्या दोघांच्या मामा–मामींनी शेसा भरल्या आणि आता संजयची बहिण, म्हणजेच सरिताची नणंद पूजा हिचा मानपान आधी करा असं सांगितलं. त्याप्रमाणे नवरीच्या काकीनं तिला नवरा–नवरी दोघांच्या मध्ये बसायला पाट दिला आणि तिला ओवाळून साडी–चोळीची पिशवी हातात दिली.
पण तिने पिशवीतून साडी काढली आणि साडी बघून जोरात ओरडली,

“माझ्यासाठी बस्त्याच्या वेळी मी पसंत केलेली साडी ही नाही! तुम्ही ही अशी फडतूस साडी देऊन माझा अपमान केला आहे!”
असं म्हणून तिने पिशवी फेकून दिली.
बाहेरचा आवाज कानावर पडताच सरिताची आई धावत तिथे आली. खरेच पिशवी बदलली होती. घाई–गडबडीत दुसरीच पिशवी दिली गेली होती. सरिताची आई विद्या आत गेली आणि योग्य पिशवी शोधून लगेच घेऊन आली.

“माफ करा, पिशवी चुकून बदलली होती,”
लग्नाच्या गडबड असल्यामुळे हे सारे झाले."
विद्या म्हणाली.

पण पूजाचा राग अजूनही ओसरला नव्हता. तिनं ती पिशवीही रागाने भिरकावून दिली.
वाद चिघळला. मुलीकडच्या मंडळींनी उगाच काही वाद नको म्हणून गप्प बसणंच पसंत केलं.
मुलीकडील लोकांनी लग्नात काही भांडण–तंटा होऊ नये म्हणून चांगली दक्षता घेतली होती, पण शेवटी मान–अपमानाचं नाट्य रंगलंच आणि रुसवे–फुगवे सुरू झाले.

एका मंगलमय, आनंदी सोहळ्याला गालबोट लागलं.

मुलीची पाठवणी करताना पूजाची आई विद्या आपल्या विहीणबाईंच्या पाया पडली आणि म्हणाली,

“माझ्या लेकीला चांगलं सांभाळा, काही चुकलं–माकलं तर पदरात घ्या.”

पण विहीणबाई नाक फुगवून बोलल्या,
चुकांना सुरुवात कोणी केली, तुमीच ना!
दोघी माय–लेकी गळ्यात पडून रडल्या. एका नव्या प्रवासाला, नव्या पर्वाला सुरुवात झाली होती;पण झाल्या प्रसंगाने सरिता थोडी घाबरली होती. तेव्हा नवरा संजय हळूच म्हणाला,

“तू घाबरू नकोस. मी कायम आहे तुझ्या सोबत.”
त्याच्या या शब्दांनी तिच्या मनाला मोठा दिलासा मिळाला.

गृहप्रवेशाच्या वेळी रितीनुसार दार अडवण्याचा मान नणंदेचा असतो, पण पूजा काही पुढे आली नाही. शेवटी तिच्या चुलत बहिणीनं विधी पार पाडला. नवरा–नवरीला ओवाळून, माप ओलांडून गृहप्रवेश झाला.
क्रमशः
©®सौ. सुप्रिया जाधव
२९/१०/२०२५
0

🎭 Series Post

View all