Login

नणंद बाईंचा मानपान (भाग दोन)

मानपानावरुन लग्नात भांडणारी नणंद बाई वहिनी बरोबर नीट वागत नाही.तिचे लग्न होते आणि तिची नणंद ही तिच्याबरोबर नीट वागत नाही तेव्हा तिला वाटते ,कर्म परतून आलेय, मी वहिनी बरोबर असेच वागले ,तिला तिची चूक कळली आणि वहिनीची माफी मागून, इथून पुढे प्रेमाने नातं जपण्याचा निश्चय करते.
जलदलेखन स्पर्धा - आक्टोबर२०२५

विषय- 'नणंदबाई येती घरा'

शीर्षक - नणंद बाईंचा मानपान ( भाग दोन)


दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली.
सरिता आणि संजय महाबळेश्वरला फिरायला गेले. तिकडे गप्पा मारताना संजयने सरिताला पूजाच्या स्वभावाबद्दल सांगितलं,

“तिला लगेच राग येतो, ती शीघ्रकोपी आहे. तू तिच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.”

हे ऐकून सरिताला खूप दिलासा मिळाला,
आपल्याला समजून घेणारा, आपली काळजी करणारा नवरा मिळालाय, असं तिला वाटलं.
सरितानं तिकडून येताना नणंदेसाठी काही वस्तू आणल्या, पण त्या पूजाला अजिबात पसंत पडल्या नाहीत.

पूजा सरिताशी कधीच चांगलं वागत नसे. तिच्या आईचीही तिला फूस असायची. कधी “भाजी बेचव झाली” तर कधी “मीठ कमी आहे” असं म्हणून ती सरितावर अद्दातद्दा ‌बोलत असे.
सरिता मात्र निमूटपणे सगळं सहन करत होती.
तिच्यावर काहीच फरक पडत नाही हे पाहून पूजाचा जळफळाट व्हायचा.

कॉलेजमधून पूजा आली की सरितानं लगेच तिच्या हातात पाण्याचा ग्लास द्यायचा.
जरा उशीर झाला की आई म्हणायची, “अशी कुठला डोंगरं उपसतेय? माझी मुलगी बाहेरून आलेली दिसत नाही का तिला?”

सरिता सगळं ऐकूनही शांत राहायची. तिच्या आवडी–निवडींना तिनं मुरड घातली होती.
दिवाळीचा सण आला. संजयनं तिघींनाही साड्या आणल्या.

पूजाला सरितासाठी आणलेली साडी आवडली.
संजयने सरिता आणि पूजासाठी डिझायनर साड्या, आणि आईसाठी नारायण पेठ साडी आणली होती. पण पूजाने आईला म्हणाली “वहिनीसाठी आणलेली साडी तुझ्यासाठी ठेव.”
संजय काहीच बोलला नाही; त्याला वाटलं काही बोललो तर पुन्हा वाद होईल. तेव्हापासून त्यानं सगळ्यांसाठी एकसारख्या वस्तू घेऊन यायला सुरुवात केली.

सरिताच्या भावाचे लग्न होते म्हणून सरिताच्या घरी तिचे सासू-सासरे, नणंद यांना लग्नाचे निमंत्रण दिले. त्यांना योग्य तो मानपान मिळावा ,उगाच लग्नात रूसवे फुगवे नको म्हणून त्या सर्वांना सरिताचा भाऊ लग्नाची पत्रिका घेऊन आला तेव्हाच सर्वांना उंची कपडे,पोषाख घेऊन आला होता.

"एवढे कशाला केले?..
असे संजय बोलला तेव्हा,

"मुलीच्या सासरकडील लोकांचा योग्य तो मानपान करावाच लागतो त्यात एवढे काय मोठे केले? असे अनिताताई म्हणाल्या .
यावेळी पूजाला चांगली साडी दिली होती,तिलाही ती आवडली होती पण तिने तसे बोलून दाखवले नाही. शेवटी स्वभावाला औषध नसते.
लग्न मात्र निर्विघ्नपणे पार पडले. सरिताला बहिणीचा मान मिळाला, पण ती लग्नात मान- पानासाठी अजिबात अडून बसली नाही. दोन्ही घरच्या नात्यांची प्रेमाने सुरवात झाली.
क्रमशः
©®सौ. सुप्रिया जाधव
२९/१०/२०२५