Login

नणंद बाईंचा मानपान (भाग तीन, अंतिम)

मानपानावरुन लग्नात भांडणारी नणंद बाई वहिनी बरोबर नीट वागत नाही.तिचे लग्न होते आणि तिची नणंद ही तिच्याबरोबर नीट वागत नाही तेव्हा तिला वाटते ,कर्म परतून आलेय, मी वहिनी बरोबर असेच वागले ,तिला तिची चूक कळली आणि वहिनीची माफी मागून, इथून पुढे प्रेमाने नातं जपण्याचा निश्चय करते.
#जलदलेखन स्पर्धा - आक्टोबर२०२५

विषय- 'नणंदबाई येती घरा'

शीर्षक - नणंद बाईंचा मानपान ( भाग तीन, अंतिम)

दोन वर्षांनी पूजाचं लग्न झालं. ती सासरी गेली.
नवीन असताना जेव्हा जेव्हा ती माहेरी यायची, तेव्हा दारात तिच्या पायावर पाणी ओतून भाकरी–तुकडा ओवाळून सरिता तिचं स्वागत करायची.

असं दरवेळी तिचं स्वागत करायचं, तिचा मान मोठा आहे.असं सासुबाईंनी सांगितलं होतं.

पूजाच्या नवऱ्याला चांगली नोकरी होती. दोघेच भाऊ–बहिण असल्यामुळे सगळे म्हणायचे, “पूजाला छान सासर मिळालं.”
पण नऊ दिवसांची नव्हाळी संपताच पूजाला तिच्या नणंद तन्वीच्या स्वभावाची झलक दिसू लागली.

एकदा तन्वीने पूजाच्या ड्रेसिंग टेबलवर एक महागडा परफ्यूम पाहिला आणि विचारलं,

“हा कधी घेतलास?”

पूजा म्हणाली, “तुमच्या दादांनी दिला.”
हे ऐकून तन्वी संतापली —

“आता माझी किंमत राहिली नाही त्याला! तुमच्या लग्नाआधी माझ्यासाठी किती वस्तू आणायचा. आता बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय!”

गोष्ट क्षुल्लक होती पण तिची आई शांत बसली होती, पण तिच्या मनालाही असं वाटू लागलं की 'मुलगा आपल्यापासून दूर जातोय.'

या वर्षावाने पूजा चांगलीच दचकली.

आता तिला आठवलं — लग्न ठरल्यावर आईने सांगितलेलं,

“तापट स्वभाव थोडा आवर.”

ती मनाशी म्हणाली, आता त्याचीच अंमलबजावणी करावी लागेल.

“मी माझ्या वहिनीशी जसं वागले, तशीच माझी नणंद माझ्याशी वागत आहे. कर्म परत येतं,” ती विचार करू लागली.

दोन महिन्यांनी पूजा माहेरी आली. विद्याताईंनी सरिताला आवाज दिला. सरिता धावली.
भाकरी–तुकडा ओवाळताना पूजा म्हणाली,

“हे आता बंद कर वहिनी, मी नवी नवरी नाही आता. माझ्या लग्नाला पुढच्या महिन्यात वर्ष होईल.”

सरितानं तिच्या आवडीचे पदार्थ बनवले.

पूजा म्हणाली, “तू पण आमच्यासोबत बसून जेव.”
सरिता म्हणाली, “नको ताई, तुम्ही आधी घ्या. मी नंतर घेते.”

“नाही वहिनी, आपण तिघी एकत्र जेवूया.”
सरिताला वाटलं — आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतोय!

विद्याबाईंनाही पूजामधला बदल पाहून आश्चर्य वाटलं.

जेवण उरकल्यावर दोघी मायलेकी गप्पा मारू लागल्या. संध्याकाळी स्वयंपाकघरात पूजा सरिताला मदत करत होती.

“तुम्ही बसा, मी करते सगळं,” सरिता म्हणाली.
“नाही वहिनी, मला आता कामाची सवय झाली आहे — आणि माझ्या नणंदेची बोलणी ऐकायचीही,” पूजा हसून म्हणाली.

सरिताला दुपारचं त्यांचं बोलणं थोडं ऐकू आलं होतं.
पूजा पुढं म्हणाली,

"वहिनी, मी तुझ्याशी नेहमी भांडायचे. जेवणात उणदुणं काढायचे.तुझ्या लग्नात मानपानावरून मी रागावले, तो राग कायम ठेवला.
तुझ्याशी चुकीचं वागत राहिले. पण तू कधीच उलट बोलली नाहीस.
आता मला माझ्या नणंदेमुळे कळलं — 'नात्यांची किंमत काय असते.”

ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली,

“मी तुला खूप त्रास दिला वहिनी. तेच आता परतून माझ्याकडे आलं आहे.”
सरिता तिला थांबवत म्हणाली,

“जाऊ द्या ताई, ते सगळं विसरू या. तुमच्या लक्षात चूक आली, तेच पुरेसं आहे.”
पूजा म्हणाली,

“नात्यांची किंमत आता मला कळतेय. नाती जपायची असतात, तोडायची नसतात. आतापासून मी तुझ्यावर कधीच चिडणार नाही.”

“अहो ताई, अशी माफी मागू नका. मी तुम्हाला कधी परकी समजलीच नाही,” सरिता हसून म्हणाली.
“तुम्ही बाहेर गप्पा मारा, मी पटकन जेवण बनवते.”
“नाही वहिनी, आपण दोघी मिळून करू,” असं म्हणत पूजा मदत करू लागली.

घरातील सगळ्यांनी त्यांचं संभाषण ऐकलं.

संजयच्या मनात आनंद दाटला, उशिरा का होईना, पण पूजाला तिची चूक कळली.
जेवण झाल्यावर सगळे एकत्र बसले, हसले–खेळले.

सरिता मनाशी म्हणाली,
“यावेळी नणंद बाई घरी आनंद घेऊन आल्या आहेत. हा आनंद आणि प्रेम कायम टिकून राहो.”
समाप्त
©®सौ. सुप्रिया जाधव
२९/१०/२०२५

0

🎭 Series Post

View all