Login

नणंद माझी लाडकी!

जेव्हा एक नणंद एका भावजयीच्या पाठीमागे उभी राहते, तिला आधार देते, तिचा त्रास समजून घेऊन तिच्याकडून बोलते, तिच्यासाठी स्वतःच्याच आई आणि भावाला समजावते, तेव्हा तिच्यामुळे जे बदल होतात, ते सौ. जानकी कटक लिखित या कथेत वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
लघुकथा लेखन.
शीर्षक - नणंद माझी लाडकी.



"अहो, मी निघाले आहे ऑफिसला. येऊन दार लावून घ्या. दूध तापवून किचन ओट्यावर ठेवलेलं आहे. थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवून द्याल. आधी दरवाजा लावून घ्या पाहू, नाहीतर मांजर घरात शिरेल आणि दूधात तोंड घालेल. अहो ऐकताय का? अहो?" ती आपल्या खांद्यावरची पर्स सावरत आवाज देत होती, पण त्याचा काहीच प्रतिसाद नव्हता.

एकतर आज तिला उशीर झाला होता, त्यात तिच्या नवऱ्याचा असा आळसपणा आडवा येत होता. सध्या ती हॉलमध्ये उभी राहून ओरडत होती, तर तो त्यांच्या खोलीत आरामात लॅपटॉप घेऊन बसलेला होता. खोलीत तिचं आवरत असतानाही तिने त्याला सांगितलं होतं, पण ती बाहेर येऊनही तो तिच्या मागोमाग आला नव्हता. आज विनाकारणच त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. त्याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. आता त्याचं लॅपटॉपवर वेळ घालवणं चालू होतं.

ती म्हणजे शिवानी कार्तिक देशमुख! स्वभावाने शांत, संयमी होती, पण संयम सुटल्यावर तिचीही चिडचिड होत असायची. त्याविरुद्ध कार्तिक होता. कोणाचं काही ऐकायचं नाही, कि कोणाशी सरळ शब्दाने बोलायचं नाही. त्याची आई रेवतीही त्याच्या प्रत्येक शब्दाला दुजोरा द्यायची. यामुळे तर त्याला प्रोत्साहनच मिळत होतं जणू. त्याचा आवाज आणखीनच वाढत असायचा. या पाच वर्षांत त्या दोघांच्या या स्वभावाला शिवानी कंटाळली होती. कधी कधी मग चिडून तिच्याही तोंडून उलट उत्तरे यायची. 'आम्हाला उलट उत्तर देतेस?' असा रागही तिच्यावर निघत असायचा. ते तरी बरं होतं की तिला मारहाण होत नव्हती.

दोन खोल्या, एक स्वयंपाकघर आणि एक हॉल, असं त्यांचं घर होतं. रेवती सहसा त्यांच्या खोलीतच असायच्या. जर आगीत तेल ओतायची गरज पडली, तरच त्या खोलीतून बाहेर यायच्या. साधा इकडचा तांब्या तिकडे करत नव्हत्या. सुनेला त्यांच्याकडून जरा म्हणून कामात मदत नव्हती. ती बिचारी घर, सासू, नवरा, अडीच वर्षांचा मुलगा आणि आफिसचं काम, एकटीने कशीबशी सांभाळत होती. तिची खूप दमछाक होत होती, पण ते पाहूनही रेवती कधीच 'मी स्वयंपाक करू लागते, किंवा तू हे आवर मी ते आवरते', अशा म्हणत नव्हत्या.

असो, सध्या ती घरातलं काम आवरून ऑफिसला निघाली होती. दूध नेमकंच तापवलेलं होतं त्यामुळे गरम होतं. थंड झाल्यावर त्याला फ्रिजमध्ये ठेवायला सांगत होती, पण त्याचा अजिबातच प्रतिसाद नव्हता. आज गरज पडली म्हणून त्याला काम सांगत होती, नाहीतर ती कधीच त्याला हे कर ते कर म्हणत नव्हती. तिचा आवाज ऐकून रेवती खोलीतून बाहेर आल्या.

"त्याला कशाला गं काम सांगतेस? तुझं तुला सगळं आवरून जाता येत नाही का?" रेवती बाहेर येत म्हणाल्या.

"दूध आत्ताच तापवलेलं आहे आई. गरम दूध फ्रिजमध्ये ठेवता येणार नाही आणि दूध थंड होईपर्यंत मलाही थांबता येणार नाही. दरवाजा उघडा दिसला तर मांजर घरात शिरेल, म्हणून मी त्यांना आवाज देत होते." शिवानीने सांगितलं, पण रेवतींच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"एवढीच काळजी आहे तर मग लवकर का नाही तापवलंस दूध? ऐनवेळी धावपळ करतेस आणि मग आम्हाला काम सांगतेस." रेवती चिडून म्हणाल्या, त्यावर तिने मान खाली घातली.

तेवढ्यात...

"मामी..." तीन वर्षांची एक मुलगी शिवानीच्या पायांना बिलगली.

"अगं माझी पिल्लू!" त्या मुलीला पाहून शिवानी आनंदली होती. तिने पटकन तिला उचलून घेतलं. तिच्या गालावर मुके घेतले.

"कशी आहेस शिवानी?" एका स्त्रीचा आवाज आला, तसं शिवानीने मागे वळून पाहिलं.

"ताई, मी एकदम ठीक आहे. तुम्ही कशा आहात?" तिने पुढे होऊन मिठी मारत विचारलं.

ती होती तिची मोठी नणंद सुलभा सोनवणे! ती छोटी मुलगी सुलभाची होती. तिचं नाव आनंदी होतं.

"मीही ठीक आहे. आज जरा वेळ मिळाला तर म्हटलं जाऊन येऊ. आनंदी हट्ट करत होती म्हणून मला कामावरून सुट्टी घ्यावी लागली." सुलभा बाजूला होत हसून म्हणाली.

"आधी का नाही सांगितलंत ताई? आधीच माहित असतं तर मी आज सुट्टी घेऊ शकले असते." शिवानी नाटकीपणे गाल फुगवत म्हणाली.

"अगं त्यात काय एवढं? तू आरामात कामावर जा. आपण संध्याकाळी निवांत गप्पा मारू." सुलभाला तिचं नाटकीपणे गाल फुगवलेलं समजलं होतं, म्हणून ती हसत म्हणाली.

"नाही नाही ताई. असं कसं? तुम्ही घरी आल्यावर मी कामावर जायचं का? अजिबात नाही." शिवानी खांद्यावरची पर्स बाजूला ठेवत म्हणाली.

लगेच तिने ऑफिसमध्ये फोन करून ती येत नसल्याचं कळवलं. सुलभा भारावून तिच्याकडे पाहत होती. नेहमी ती आधीच सांगून यायची त्यामुळे शिवानी सुट्टी घेऊन ठेवायची, पण आज न सांगता आली होती तरीही तिने तिच्यासाठी ऐनवेळी सुट्टी घेतली होती.

"अगं कशाला उगाच माझ्यासाठी सुट्टी घेतलीस? मी रात्री इथून जेवूनच जाणार आहे." सुलभा किंचित रागावून म्हणाली.

"काही होत नाही ताई. एक तुम्हीच आहात ज्यांच्याशी मी मनमोकळ्या गप्पा मारू शकते. तुम्ही कितीही दिवस माझ्याजवळ राहिलात तरी माझ्यासाठी कमीच आहे." शिवानी खाली मान घालून म्हणाली, तसं सुलभाला भरून आलं.

तिने तिच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. दोघीही एकमेकींकडे पाहून किंचित हसल्या. मग सुलभाचं लक्ष तिच्या आईकडे गेलं.

"कशी आहेस आई?" तिने रेवतींजवळ जाऊन मिठी मारत विचारलं.

"खूप लवकर दिसली तुला तुझी आई?" उत्तर द्यायचं सोडून त्यांनी आपला राग व्यक्त केला.

"तुझ्या औषधी घेतल्या आहेस तू?" सुलभाने बाजूला होत विचारलं, तसा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला.

"अगं बाई! विसरलेच मी." असं म्हणत त्या लगेच आपल्या खोलीत निघून गेल्या.

मायलेकी असूनही दोघींमध्ये धरती-आकाशाचं अंतर होतं. त्या अंतरामुळेच शिवानीला सुलभा जास्त प्रिय होती. सुलभाने कधीही तिच्यावर नणंदेसारखी दादागिरी केली नव्हती. उलट दोघी कधीही भेटल्या की मैत्रिणींसारख्या मनसोक्त गप्पा मारत बसायच्या. गप्पांसाठी दोघींना दिवस-रात्र पुरत नसत.

"तुम्ही बसा ताई. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते." शिवानीने तिला सोफ्यावर बसवलं आणि तिच्यासाठी पाणी आणायला निघून गेली.

तिने सुलभाला आणि छोट्या आनंदीला पाणी दिलं. आनंदी आल्यापासून शिवानीच्याच मागे मागे फिरत होती. शिवानी तिला खूप जीव लावायची, त्यामुळे आनंदीलाही ती खूप आवडत होती.

"कार्तिक घरीच आहे का आज? त्याची दुचाकी बाहेर दिसते." सुलभाने विचारलं, तसा शिवानीचा चेहरा उतरला होता.

"आज महत्त्वाचं काही काम नाही म्हणाले होते ते, म्हणून घरीच थांबले आहेत." तिने आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवत सांगितलं, तरीही ते सुलभाला समजलेच.

तिने एक हताश सुस्कारा सोडला, कारण तिलाही आपल्या भावाचा स्वभाव माहित होता. तेवढ्यात तोही बाहेर आला.

"अरे ताई, तू कधी आलीस?" कार्तिकने तिच्या दुसऱ्या बाजूला बसत विचारलं.

"आत्ताच आले रे." दोघांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. शिवानी त्यांच्या गप्पा ऐकण्यामध्ये गुंतली होती.

"मामी, मला काहीतरी खायला द्या ना." आनंदीचा आवाज आला तशी शिवानी भानावर आली. तिने लगेच तिला जवळ घेतलं.

"माझ्या पिल्लूला भूक लागली? काय खाणार माझी पिल्लू?" तिने आनंदीला जवळ घेत पुचकारत विचारलं.

"पोळी भाजी." तिने लगेच उत्तर दिलं, तसा शिवानीने तिच्या बॅगेतला तिचा डबा काढला.

ती पुरेल एवढाच स्वयंपाक करायची, त्यामुळे भाजी शिल्लक असली तरी दुरडीत रेवती आणि कार्तिक दोघांपुरत्याच पोळ्या होत्या. त्यांना कमी पडल्यावर दोघेही तांडव करतील म्हणून तिने स्वतःचा डबा उघडून तिच्यासमोर ठेवला. ते पाहून सुलभाने पटकन तिचा हात धरला.

"काय करतेस शिवानी? हा तुझा डबा आहे." सुलभा तिच्या हातातला डबा खेचत म्हणाली.

"यासाठी विचारलं मी की येताना सांगितलं का नाही? आली ना माझ्या लेकराच्या खाण्याची अडचण?" शिवानी नाक मुरडत म्हणाली, त्यावर सुलभा हसली.

"अगं आम्ही घरून खाऊन आलो आहोत. उगाच नाटकं आहेत तिची. तू खाऊन घे. तिला फक्त दूध दे." ती डबा खाली ठेवत म्हणाली.

"नाही, मला पोळी भाजी खायची आहे." आनंदी रडवेला चेहरा करत म्हणाली.

"खाऊ द्या ताई. भूक लागली असेल तिला. तसंही, ती सगळा डबा संपवू शकणार नाही. एक पोळी मी खाईन." असं म्हणत शिवानीने डबा उघडून एक घास तिला खाऊ घातला, त्यावर सुलभाने सुस्कारा सोडत नकारार्थी मान हलवली.

आनंदीला भरवत असतानाच दोघी नणंद-भावजय गप्पा मारत होत्या. कार्तिक त्याच्या मोबाईलमध्ये गुंगला. थोड्या वेळाने रेवतीही तिथे येऊन बसल्या. त्या फक्त शिवानीला तिथून उठण्याची वाट पाहत होत्या. नंतर त्यांना सुलभाचे कान भरण्याचं काम करायचं होतं. आता संध्याकाळ होत आली होती, तरीही त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. रेवती केव्हाच्या तळमळत होत्या.

त्यांची ती प्रतीक्षाही संपली. आनंदीचं खाऊन झाल्यावर शिवानी उठून स्वयंपाकघरात गेली. संधी मिळाली म्हणून रेवती सुलभाजवळ येऊन बसल्या.

"सुलू, एवढी पण नको तिला डोक्यावर चढवून घेऊस. अगं, तुला नाही माहित ती कशी आहे ते. तिच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला... मला कामं सांगते ती. स्वतः मात्र ऐटीत कामावर जाते आणि माघारी येते. तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. आज तर तिने कार्तिकलाही काम सांगितलं. स्वतःचं काम व्यवस्थित करता येत नाही तिला. मी बोलले तर मला उलट उत्तर दिलं तिने." रेवती बारीक चेहरा करून म्हणाल्या.

कार्तिकने काही न बोलता ओठ दुमडून घेतले. सुलभाच्या चेहऱ्यावरही गंभीर भाव उमटले. तिने स्वयंपाकघराकडे नजर टाकली.

"शिवानी... शिवानी... बाहेर ये." तिने थोडा मोठ्याने तिला आवाज दिला. तीही साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली.

"काय झालं ताई? काही हवं आहे का?" तिने किंचित हसून विचारलं.

"हे काय ऐकलं मी? तू आई आणि कार्तिकला घरातली कामं सांगतेस?" सुलभाने किंचित रागीट भाव चेहऱ्यावर आणत तिला विचारलं, तर शिवानीने लगेच मान खाली घातली.

"तुला माहित आहे? एखाद्या दिवशी जेव्हा मला बरं नसेल ना, तेव्हा माझ्या सासूबाई आम्हा सर्वांचा स्वयंपाक बनवतात. अगदी एक अक्षरही न बोलता हसत-हसत करतात. आई तर मला एकदा म्हणाल्या होत्या की, 'सुलभा, एवढं शिक्षण घेतलंस त्याचा काही लाभ घे. तुझं शिक्षण पाहता तुला चांगली नोकरी मिळेल. आमचं झालं गेलं पार पडलं, पण तुमच्याच संसाराला हातभार लागेल.' त्यावर माझं उत्तर होतं, 'आई, मी जर बाहेर जाऊन काम करायला लागले तर घर कोण सांभाळणार?' त्यावर आई म्हणाल्या, 'मी आहे ना घरी. जेवढं जमेल तेवढं तू कर, बाकी करायला मी आहेच. घरात नुसतं बसून उगाच शरीराला त्रास दिल्यापेक्षा कामाने अंग मोकळं होईल. तू बिनधास्त नोकरी कर. मी घर आणि आनंदी, दोघांना सांभाळेन.' इतकं सगळं त्या म्हणाल्या होत्या."

"हे काय कमी होतं की माझ्या नवऱ्यानेही दुजोरा दिला. मला नोकरीही शोधून दिली. रविवारी घरी असल्यावर हे फरशीही पुसून घेतात. सकाळ-संध्याकाळ मला नाश्त्यासाठीही विचारतात आणि बनवूनही घेतात. का माहित आहे? कारण ते माझी रोजची धावपळ पाहतात. त्यांना ऑफिसचं काम असतं. घरी आल्यावर त्यांना आरामासाठी वेळ मिळतो. मला मात्र रोज घरचं आवरून बाहेरचं काम असतं, बाहेरून येऊन पुन्हा घरचं काम असतं. तेवढा फक्त रविवारचा दिवस मी ऑफिसच्या कामातून मोकळी असते, म्हणून ते त्यादिवशी माझी काळजी घेतात. रोज रात्री आनंदीला झोपूही घालतात, जेणेकरून माझीही झोप होईल. त्या दोघांच्या प्रोत्साहनामुळे आज मी माझ्या संसाराला आर्थिक हातभार लावू शकत आहे." एवढं सगळं बोलून सुलभा शांत बसली आणि तिने रेवती व कार्तिककडे कटाक्ष टाकला.

तिच्या बोलण्यामुळे रेवती आणि कार्तिक विचारात हरवले होते. रेवती असा विचार करत होत्या, की आपण तिला आपल्या घरातलं सांगितलं तर ती तिच्या घरच्यांबद्दल का सांगत आहे? अजूनही सुलभाच्या बोलण्याचा अर्थ त्या दोघांच्या लक्षात आला नव्हता. शिवानीला मात्र बरोबर समजलं होतं. ती खाली मान घालून किंचित हसत आपल्या डोळ्यांत आलेले अश्रू पुसत होती.

"नाही समजला ना माझ्या बोलण्याचा अर्थ?" सुलभाने त्या दोघांकडे पाहून विचारलं.

"आई, जर शिवानी तिच्या संसाराला आर्थिक हातभार लावत आहे, तर तुझंही कर्तव्य आहे की घरातल्या कामाला थोडासा हातभार लावावा. आज-काल सगळ्या गोष्टी पैशांवर चालतात, त्यामुळे घरातली सूनही कमावती असली की बरं राहतं. ठीक आहे, तुला नाही जमलं तर काही हरकत नाही, पण कार्तिकला न जमायला काय झालं? तो तर धडधाकट आहे. जेव्हा मनाला येईल तेव्हा ऑफिसला जातो, जेव्हा वाटेल तेव्हा घरी थांबतो. जर त्याला घरी राहायचंच आहे, तर एखादं काम केल्यावर काय फरक पडणार आहे?"

"माझी सासू वयाने तुझ्यापेक्षा मोठी आहे आई. तू आजही घरी येऊन पाहू शकतेस. कोणालाही वाटणार नाही, की त्यांची सून बाहेर जाऊन नोकरी करते. घर असं नीटनेटकं आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपतील. आज-काल बायका वर्क फ्रॉम होम सुद्धा करतात. त्यांच्याही घरी अशी परिस्थिती असतेच. ज्यांच्या सासूला काम जमत नाही ते कामवाली बाई लावतात. तुला नाही लावायची आहे ना कामवाली बाई? मग तू थोडंफार करू लागत जा. ती सून म्हणून घरात आली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही दोघांनी हात वर करावेत. उलट तुम्ही तिच्यावर जास्त दडपण येऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी."

"जरा बाहेरचं जग फिरून बघ आई. ज्या सुना बाहेर जाऊन नोकरी करत नाहीत, त्या बायका सुद्धा वृद्ध सासू-सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते. त्याउलट तुझी सून बघ. बाहेरही नोकरी करते, घरही सांभाळते, आणि तुलाही सांभाळते. उलट बोलायचं म्हणशील तर घर-संसार आहे. घर-संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच. एवढे तेवढे खटके उडतच असतात. असं एकही घर नाही जिथे भांडणं होत नसतील. आमचीही होतात. मतभेद झाले तर चालतील आई, पण मनभेद व्हायला नकोत."

"शिवानी तुझी सून आहे, पण जर तू तिला एक मुलगी समजून वागवलीस तर ती सुद्धा तुला आई समजून सांभाळेल. आमच्या आई सुद्धा शिवानीचं नाव घेतात, पण मला कधी त्याचा राग येत नाही. उलट मला अभिमान वाटतो की शिवानी माझी भावजय आहे. कार्तिक, संसार दोघांचा आहे तर जबाबदाऱ्या सुद्धा दोघांच्या असतात. मग ते बाहेर जाऊन नोकरी करणं असो, की घरातली एवढी तेवढी कामं. तेवढाच तिलाही आधार वाटेल. आई, या गोष्टी मी तुला सांगायला नको होत्या. आज तूच तशी वेळ आणली आहेस. आता मी काय बोलले ते समजलं ना दोघांना?" सुलभा बरंच काही बोलून गेली होती, त्यामुळे दोघे मायलेक तिच्या बोलण्याचा विचार करायला लागले होते. दोघांनी काहीच उत्तर दिलं नाही म्हणून सुलभाने नकारार्थी मान हलवली.

"शिवानी, आज तुझ्या हातची पनीरची भाजी खाण्याची इच्छा आहे. बनवशील का?" ते दोघे काहीच बोलत नव्हते म्हणून ती शिवानीशी बोलली.

"हो ताई, का नाही बनवणार? लगेच तयारीला लागते." शिवानी हळव्या स्वरात म्हणाली आणि लगेच स्वयंपाकघराकडे धाव घेतली.

हे दोघे अजूनही गप्पच होते म्हणून सुलभा कार्तिकच्या खोलीत त्याच्या मुलाला पाहायला गेली, पण रेवतींच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं.

'खरंच आहे. जर मी घरात एवढं तेवढं करू लागले, तर कुठे माझं काही नुकसान होणार आहे? माझ्या सासूने मला जी वागणूक दिली होती, तशी वागणूक मी माझ्या सुनेला का द्यावी?' रेवती मनातल्या मनात विचार करत होत्या.

विचार करून रेवती उठून स्वयंपाकघराकडे गेल्या. तिथे जाऊन त्यांनी मोठी परात घेतली आणि पीठ मळायला बसल्या. ते पाहून शिवानी त्यांच्याजवळ बसली.

"राहू द्या आई, मी करते." ती त्यांचा हात धरून म्हणाली.

"नको, दोघींनी मिळून केलं तर लवकर आवरेल. आता हे रोजच होत राहणार." रेवती किंचित हसून म्हणाल्या, तशी ती तिथून उठली आणि त्यांच्याकडे पाहतच भाजीची तयारी सुरू केली.

नेमक्याच झोपेतून उठलेल्या कार्तिकच्या मुलाला घेऊन बाहेर आलेल्या सुलभाने तिच्या आईचं बोलणं ऐकलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू पसरलं. सुलभाच्या समजावणीमुळे एवढा बदल घडेल, असं दोघींनाही वाटलं नव्हतं.

स्वयंपाक झाल्यावर सर्वांनी मिळून जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सुलभा तिच्या घरी जायला निघाली. तिघेही तिला वाटी लावण्यासाठी बाहेर गेले. कार्तिकने तिला घरी सोडण्याचा हट्ट केला. तसंही सुलभाचं घर काही जास्त लांब नव्हतं, पण रात्र होती आणि तिच्यासोबत छोटी आनंदी होती त्यामुळे तिला एकटीला पाठवणं कोणालाही ठीक वाटत नव्हतं.

ती गेल्यानंतर शिवानी पुन्हा स्वयंपाकघरात गेली. किचन ओटा साफ करायचा पडला होता. तिने रेवतींनी खूप काम केलं होतं म्हणून त्यांना आराम करण्यासाठी पाठवलं. तिचा मुलगा हॉलमध्ये खेळत होता. किचन ओटा साफ करताना ती स्वतःशीच बडबडत होती.

"लवकर लवकर आवर शिवानी. आज सुट्टी झाली पण उद्या पुन्हा लवकर उठायचं आहे. किचन ओटा साफ करायचा आहे, हॉल झाडून घ्यायचा आहे, बाहेरचं गेट लावून यायचं आहे, बाळाला झोपू घालायचं आहे, खूप कामं बाकी आहेत अजून." ती एकटीच बडबडत भरभर आवरत होती. आवरून झाल्यानंतर ती हॉलमध्ये आली तर लाईट बंद होता.

"मी तर लाईट बंद केला नव्हता." विचार करत तिने लाईट लावला तर हॉलमधला सगळा केर काढलेला दिसला. ते पाहून तर ती आश्चर्यचकित झाली.

"आईंनी केलं का हे? असो, हे तर त्यांनी केलं असेल, पण बाहेरचं गेट त्यांना थोडी लावता येणार आहे." असं म्हणत ती दरवाजाकडे गेली, तर दरवाजाला आतून टाळा लावलेला दिसला. झोपताना घराच्या दरवाजाला नेहमी ते आतून टाळा लावून घेत असायचे.

आत्ता कुठे तिला थोडा थोडा अंदाज यायला लागला होता. तिने खिडकीचा पडदा बाजूला करून गेटकडे नजर टाकली, तर गेटलाही टाळा दिसला. ती स्वतःशीच हसत लाईट बंद करून तिच्या खोलीत गेली, तर तिथे कार्तिक त्यांच्या मुलाला झोपू घालत होता. ती हळूच येऊन पलंगावर आडवी झाली. झोपण्यापूर्वी तिने आपला मोबाईल हातात घेतला. व्हॉट्सॲप वर जाऊन तिने सुलभाला एक संदेश पाठवला.

"खूप खूप धन्यवाद ताई!"

तिचा संदेश पाहून तिकडे सुलभा गालातल्या गालात हसली.


सुलभा म्हणाल्याप्रमाणे खरंच सून आली म्हणजे घरातील इतर सदस्यांची कर्तव्ये संपली असं होत नाही. घर सर्वांचं म्हटल्यावर घरातील कामेही सर्वांची असणारच, हे लक्षात घेतलं तर कुठल्याही सासू-सुनेमध्ये, नवरा-बायकोमध्ये मनभेद किंवा वाद होणार नाहीत.


समाप्त!


लेखिका - सौ. जानकी नारायण कटक.
0